छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा मुक्तिदिनापासून हैदराबाद गॅझेटिअरच्या नोंदीनुसार प्रमाणपत्र देण्याची कारवाई करावी. तत्पूर्वी मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रमाणपत्राबाबतची प्रक्रिया ठरवून द्यावी, गावस्तरावरील समित्यांमध्ये मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे. हे सारे १७ सप्टेंबरपर्यंत करून कारवाई न झाल्यास पुन्हा मोठा निर्णय घ्यावा लागेल. कदाचित राजकीय नेत्यांना बंदी घालण्यापर्यंतचे निर्णय केले जातील, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी दिला आहे.
शासन निर्णयाची अंमलबजावणी करा, तसे न झाल्यास खूप वाईट दिवस पाहायल मिळू शकतात. ही धमकी नाही तर विनंती आहे असे म्हणत जरांगे यांनी नव्या शासन निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी आग्रह धरण्यास सुरुवात केली. खासगी रुग्णालयातून त्यांना घरी जाण्याची परवानगी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना जरांगे यांनी सरकारने कोणाचे ऐकून नवे काही करू नये तर केलेल्या निणर्याची अंमलबजावणी करावी असे म्हटले आहे. हैदराबाद गॅझेटिअरमध्ये किती मराठा हे कुणबी आहेत असे दाखवले आहे.
या निर्णयामुळे मराठवाड्यातील सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळतील. काही लोक बिथरल्यासारखे झाले आहेत. थोडेसे संयमाने घ्या, गॅझिटअरनुसार जर प्रमाणपत्र मिळाले नाही तर नारायणगड येथे होणाऱ्या दसरा मेळाव्यात आम्ही सरकारच्या विरोधात भूमिका जाहीर करू. नारायणगड येथे फार मोठा मेळावा होणार नाही. पण मुंबईत लढाई आपण जिंकलीच असल्याचा दावा जरांगे यांनी केला.