छत्रपती संभाजीनगर : शेताचा सातबारा नावावर करता आणि ऊस लावू नका असे म्हणता येणार नाही. त्यामुळे ज्यांना ‘ओबीसी’ चे आरक्षण मिळाले आहे, त्याचा वापर राजकीय करणारच. कुणबी म्हणून असणारे सर्व फायदे मराठा समाजाला लागू आहेत. त्यामुळे राजकीय आरक्षणही हवेच असल्याचे मत मराठा आरक्षण मागणीचे आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी व्यक्त केले. २९ ऑगस्ट रोजी मुंबई येथील आंदोलनाच्या बांधणीसाठी जरांगे यांनी बुधवारी धाराशिव जिल्ह्यात कार्यक्रम घेतले.

गेले काही दिवस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका न करणाऱ्या जरांगे यांनी बुधवारी पुन्हा टीकेची धार वाढवली. आंतरवली सराटीमधील लाठीमार हा त्यांच्याच सांगण्यावरून केला गेला होता, असा आरोप त्यांनी केला. येत्या काळात हैदराबाद गॅझेटसह जुन्या नोंदीच्या आधारे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे तसेच ‘सगेसोयरे’ ची व्याख्या करावी, अशा जुन्या मागण्यांची अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी आहे. त्यासाठी २९ ऑगस्ट रोजी आंदोलन केले जाणार आहे. मुंबई येथे मोठ्या प्रमाणात आंदोलक येतील, असा दावा जरांगे यांनी केला.

मुंबईतील पूर्वीच्या आंदोलनामुळे अधिसूचना निघाली. ती या आंदोलनाची गरजच होती. मात्र, त्यांची अंमलबजावणी करताना फसवणूक झाल्याचे जरांगे यांनी माध्यमांना सांगितले. मात्र, आंदोलनाची माहिती देताना कुणबी प्रमाणपत्राचा राजकीय उपयोग केलाच जाईल, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.

महाग शिक्षण आणि गरीब मराठा या दोन मुद्द्यांना पुढे करून पुकारण्यात नोकरी आणि शिक्षणात आरक्षण मागणी केली खरी पण आंदोलनाच्या तळाशी राजकीय आरक्षण हाच हेतू असल्याचा दावा ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी केला.

धाराशिवपासून ऑगस्टमधील बांधणीस जरांगे यांनी सुरुवात केली आहे. येत्या काळात संपूर्ण ताकदीनिशी आंदोलनाची तयारी केली जाईल, असा दावा केला जात आहे. एकदा कुणबी प्रमाणपत्र मिळाले की त्याचे फायदे हे मराठा समाजास होणार असल्याने स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या गट व गणांच्या जागांवर मराठा नेते ‘ओबीसी’ म्हणून पुढे येतील, असे आता सांगण्यात येत आहे.