राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांबदद्लच्या वक्तव्यावरून त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यपालांची तत्काळ उचलबांगडी करावी, अशी मागणी केलीय. आता औरंगाबादमधील मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी आज (२८ फेब्रुवारी) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्याचा निषेध केला. मात्र, टीका करताना पाटील यांचा तोल सुटला. ते म्हणाले, “गरज पडली तर तुमचं धोतर फेडू”. यावेळी त्यांनी राज्यपालांच्या माफीची मागणी केली.

विनोद पाटील म्हणाले, “महाराष्ट्राचे राज्यपाल यांनी काल (२७ फेब्रुवारी) शिवाजी महाराजांबद्दल वक्तव्य केलं. माहिती नसलेला इतिहास आमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. खरं तर हे बघितल्यानंतर राज्यपालांच्या पोटात जे होतं, ते ओठावर आलेलं आहे. राज्यपालांना छत्रपती शिवाजी महाराज कळले नसतील, तर त्यांनी कृपया त्या विषयात नाक खुपसू नये. चुकीच्या गोष्टी आमच्यासमोर मांडू नका, तुमच्या वयाचा विचार करता, तुम्हाला निवृत्तीची गरज आहे, हे कालच्या वक्तव्यावरून स्पष्ट झालं आहे.”

“…तर तुमचं धोतर फेडू”, विनोद पाटलांचा तोल सुटला

“भारताच्या पंतप्रधानांना विनंती आणि आवाहन आहे की, त्यांनी तात्काळ अशा राज्यपालांची उचलबांगडी करावी. असे राज्यपाल महाराष्ट्राला नको. त्यांना छत्रपती शिवाजी महाराजच कळलेले नाहीत. राज्यपाल महोदय, आपण तत्काळ माफी मागावी, अन्यथा आम्ही तुमच्या वयाचा विचार न करता गरज पडली तर तुमचं धोतर फेडू. एक शिवभक्त म्हणून या ठिकाणी ठामपणे आपल्याला सांगतो,” असा इशारा विनोद पाटील यांनी दिला.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी नेमकं काय म्हणाले होते?

भगतसिंह कोश्यारी म्हणाले, “महाराजा, चक्रवर्ती सगळे झाले. चाणाक्याशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल, समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल? मी शिवाजी किंवा चंद्रगुप्त यांना लहान दाखवत नाही. प्रत्येकाच्या मागे आईचं मोठं योगदान असतं, तसंच आपल्या समाजात गुरूचं मोठं स्थान असतं. शिवाजी महाराजांनी समर्थांना म्हटलं की तुमच्या कृपेने मला राज्य मिळालं आहे.”

हेही वाचा : “छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरु…”, राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यावर खासदार उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“शिवाजी महाराजांनी गुरुदक्षिणा म्हणून समर्थांना राज्याची चावी देऊ केली”

“आता या देशाची परंपरा आहे, गुरू आहे तर त्याला गुरुदक्षिणा द्यावी लागते. त्यामुळे मी जिंकलोय, राज्याची स्थापना देखील झाली आणि मी रायगडावर आलो आहे. आता गुरुदक्षिणा म्हणून या राज्याची चावी तुम्हाला देतो, असं शिवाजी महाराज समर्थांना म्हटले, पण समर्थांनी ती चावी घेतली नाही. समर्थांनी शिवाजी महाराजांना ते या राज्याचे विश्वस्त असल्याचं सांगितलं. हा भाव अशा सदगुरूकडे मिळतो,” असं भगतसिंह कोश्यारी म्हणाले.