छत्रपती संभाजीनगर : अतिवृष्टीने पिके पाण्याखाली गेलेली असून त्यामध्ये फुल शेतीचीही अक्षरशः माती झाली आहे. परिणामी बाजारात फुलच येत नसल्याने दरही चांगलेच कडाडले आहेत. फुलांची शेती वाचलेल्या उत्पादकांना ऐन पितृपंधरवड्यातही चांगले दर मिळत असून अवघ्या पंधरा दिवसांवर असलेल्या दसरा सणाला झेंडूच्या दरात मात्र तेजीत राहण्याची शक्यता आहे.

मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण, कन्नड, सिल्लोडसह छत्रपती संभाजीनगर शहराजवळील काही गावांमध्ये व जालन्यातील परतूर, नांदेडमधील काही भागांमध्ये फुलशेती केली जाते. झेंडूसह गुलाब, निशिगंध, गलांडा, ॲस्टर, शेवंतीची शेती केली जाते. मात्र राज्यभरासह मराठवाड्यात १३ सप्टेंबरपासून १८ सप्टेंबरपर्यंत म्हणजे पितृपक्षपंधरवड्यात पावसाचा जोर एवढा वाढला की ३६ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. त्यात पैठण तालुक्यातील दहा मंडळांमध्ये बेफान पाऊस झाला. यातील नांदर मंडळात तर तब्बल २१० मिमी, तर विहामांडवा मंडळात १९९ मिमी पाऊस झाला. या दोन मंडळात येणारे अनुक्रमे खंडाळा (ता. पैठण) व वडजी शिवारात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला असून, १३ सप्टेंबरपासून सुरू झालेला पाऊस १८ सप्टेंबरला थांबण्याचे नाव घेत नव्हता, असे फुलशेती करणारे मनोज गाजरे व शहादेव सुरासे यांनी सांगितले.

वडजी गावातील मनोज गाजरे हे मागील पाच-सात वर्षांपासून फुलशेती करतात. विशेषतः गुलाबाची शेती अधिक असून, सततच्या पावसामुळे फुलशेतीची माती झाल्याचे ते सांगतात. तर शहादेव सुरासे यांनी सांगितले की, खंडाळा येथील अर्धा एकरवर झेंडूची, अर्धा एकरवर गलांडा, १० ते १२ गुंठ्ठयांवर ॲस्टरच्या फुलांची शेती आहे. परंतु तब्बल आठवडा होत आला असून, पाऊस जराशीही विश्रांती घ्यायचे नाव घेत नाही. खंडाळा हे नांदूर मंडळात येत असून १३ सप्टेंबर रोजी या भागात २१० मिमी एवढा तुफान पाऊस झाला. त्यादिवसापासून सातत्याने पाऊस सुरू आहे. संपूर्ण फुलशेतीत अक्षरशः चिखल झाला आहे.

पितृपंधरवड्यात फुलांचे दर कमालीचे घसरलेले असतात. याकाळात झेंडू १० रुपये किलोपेक्षाही कमी दराने विक्री होतो. पण यंदा झेंडूला सध्या ४० ते ५० रुपयांचा दर मिळतो आहे. साधारण २० रुपये किलोने विक्री होणारी शेवंती ८० ते १०० रुपये, ३० ते ५० रुपये किलोचा गुलाब सध्या ८० ते १०० रुपये, ३० ते ५० रुपये किलोने दरवर्षी विक्री होणारा निशिगंध यंदा ८० ते १२० रुपये दराने विक्री होत असून, अतिवृष्टीने ७० टक्क्यांवर फुलशेतीचे नुकसान झाले आहे. – मनोज गाजरे, फुलशेती उत्पादक.