सुहास सरदेशमुख लोकसत्ता

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडय़ातील ७५ पैकी केवळ चार नगरपालिकांमध्ये दररोज पाणीपुरवठा होतो. अन्यत्र सर्व महापालिका आणि नगरपालिकांमध्ये सरासरी चार दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. जालना जिल्ह्यातील जाफराबाद, उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा, उमरगा या नगरपालिकांमध्ये सरासरी आठ दिवसांतून एकदा पाणीपुरवठा होत आहे. गेल्या काही दिवसांपासून नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात चांगला पाऊस झाला असला तरी मराठवाडय़ातील अन्य सहा जिल्ह्यांतील  शहरी भागातील पाणीटंचाईचे चित्र आता भयावह दिसू लागले आहे. कुठे पाणी नाही म्हणून टंचाई आहे तर कुठे पुरवठय़ातील अडचणी सोडविता आलेल्या नाहीत.

Water supply stopped in Goregaon Malad Kandivali on Tuesday
मुंबई : गोरेगाव, मालाड, कांदिवलीमध्ये मंगळवारी पाणीपुरवठा बंद
nashik water crisis marathi news,
नाशिक जिल्ह्यात तहानलेल्या गावांच्या संख्येत वाढ, आठवडाभरात ५७ गावे-वाड्यांची भर; धरणसाठा २८ टक्क्यांवर
nashik water crisis marathi news, nashik water scarcity marathi news
नाशिक: प्रचाराच्या धामधुमीत टंचाईचा प्रश्न ऐरणीवर, ६३९ गावे-वाड्यांना टँकरने पाणी
thane district, administration, thane water supply department
लोकसत्ता इम्पॅक्ट : ठाणे जिल्हा प्रशासन जागे झाले, पाणी टंचाई आधीच टँकर सुरू करण्याच्या दिल्या सूचना

कन्नड आणि गंगापूर या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दोन शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या तलावात केवळ वीस दिवस पुरवठा होईल, एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. वैजापूर, खुलताबाद, फुलंब्री आणि सोयगाव या नगरपालिकांनाही दोन दिवसांआड पाणीपुरवठा होतो. १५-१६ वर्षांपासून छत्रपती संभाजीनगर शहराचा पाणीपुरवठा सरासरी तीन ते चार दिवसांआड एकदाच होतो. कधी पहाटे तीन वाजता, तर कधी रात्री बारा वाजता पाणी सोडण्याचेही प्रकार शहरातील विविध भागांत घडतात. पाऊस नसल्याने सध्या धरणातील सरासरी पाणीसाठा जास्तीत जास्त २५ टक्के तर किमान दोन टक्क्यांपर्यंत खाली घसरलेला आहे.

मराठवाडय़ात जालना जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांची परिस्थिती नाजूक आहे. जालना शहराला चार दिवसांआड, भोकरदन, बदनापूरला सात दिवसांआड, जाफराबादला आठ दिवसांआड तर अंबडला तीन दिवसांआड पाणीपुरवठा होतो. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे या जिल्ह्याचे नेतृत्व करतात. पाणीसाठा नसणे आणि वितरण व्यवस्था अपुऱ्या असल्यामुळे कसाबसा होणारा पाणीपुरवठा पाऊस पुरेसा झाला नाही तर पुन्हा आटेल, असे चित्र दिसून येत आहे.

मराठवाडय़ात कुंडलवाडी, किनवट, हिमायतनगर आणि नायगाव या चार नगरपालिकांमध्ये दररोज पाणीपुरवठा होतो. हिंगोली जिल्ह्यात या पावसाळय़ात जोरदार पाऊस झाला, पण हिंगोलीमध्ये दर तीन दिवसांआड, वसमतमध्ये पाच दिवसांआड, कळमनुरी आणि औंढानागनाथ या दोन नगरपालिका क्षेत्रांत दोन दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. या जिल्ह्यात पुरवठय़ाच्या अडचणी जास्त आहेत.

छत्रपती संभाजीनगर, परभणी, लातूर, नांदेड या महापालिका क्षेत्रातील पाणीपुरवठय़ाची योजना राज्य सरकारला गेल्या दोन दशकांपासून सुधारता आलेली नाही. छत्रपती संभाजीनगरच्या पुरवठय़ातील अडचणी सोडविण्यासाठी नेमलेल्या ठेकेदारावर आणि महापालिकेच्या प्रशासनावर थेट उच्च न्यायालयाकडून अंकुश ठेवला जात आहे. तरीही पुरवठय़ातील अडचणी काही दूर झालेल्या नाहीत.

रेल्वेने पाणी आणाव्या लागणाऱ्या लातूर शहराला आठवडय़ातून दोनदा पाणी येते, त्याचेच लातूरकरांना कोण कौतुक आहे. लातूर जिल्ह्यातील निलंगा वगळता औसा, देवळी, उदगीर, अहमदपूर, रेणापूर, शिरुरअनंतपाळ येथे सरासरी चार ते पाच दिवसांआड पाणीपुरवठा होतो. बहुतांश नगरपालिकांनी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान आणि अटल अमृत पाणीपुरवठा योजनेतून निधीची मागणी नोंदविलेली आहे. पण निधी मिळाला तरी त्याची अंमलबजावणी काही नीट होत नाही. जायकवाडीत पुरेसा पाणीसाठा असतानाही जालना आणि छत्रपती संभाजीनगर ही शहरे गेल्या अनेक वर्षांपासून तहानलेलीच आहेत. आता मोठे पाऊस झाले नाही तर मराठवाडय़ातील टंचाई अधिक तीव्र होईल, असे चित्र दिसून येत आहे.

* बीड शहराला आठ दिवसांतून एकदा पाणी मिळते.

* परळी, गेवराई या शहरात सरासरी दोन दिवसांआड पाणीपुरवठा होतो.

* माजलगाव, पाटोदा आणि शिरुरकासार या तालुक्याच्या शहरांना सहा दिवसांतून एकदा पाणीपुरवठा होतो.

* परभणी येथेही गंगाखेड या गोदावरीच्या काठावरच्या शहराचा पाणीपुरवठा पाच दिवसांआड एकदा होतो.

* पूर्णा, मानवत, पाथरी, सेलू, पालम या तालुक्यांच्या शहरांना दोन दिवसांआड पाणी मिळते. * परभणी शहरात सरासरी सात दिवसाला एकदा पाणी येते. पाणी साठवून ठेवणे, यासाठीच्या टाक्या विकत घेणे हा मराठवाडय़ातील जनतेच्या दैनंदिन जगण्याचा भाग झाला आहे.