राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी महाराष्ट्रात चुकीची भाषा चालू देणार नाही असा इशारा दिला. यावर मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी प्रत्युत्तर दिलंय. अजित पवार यांनी सर्वात आधी त्यांच्या पक्षातील लोकांना चुकीची भाषा चालणार नाही हे सांगावं आणि मग दुसऱ्यांना उपदेश करावा, अशी टीका नितीन सरदेसाई यांनी केली. ते शनिवारी (३० एप्रिल) औरंगाबादमध्ये पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलत होते.

नितीन सरदेसाई म्हणाले, “अजित पवार यांनी स्वतःच्या पक्षातील नेते चुकीचं बोलत आहेत. त्यांनी ते सर्वप्रथम बघावं. त्यांच्या पक्षातील लोक स्टेजवरून जे काही बोलतात आणि लोक हसतात तर त्यांना अजित पवार यांनी प्रथम सांगावं की असं बोलू नका. त्यानंतर अजित पवार यांनी दुसऱ्यांना उपदेश करावा.”

राज ठाकरे यांच्या सभेची जोरदार तयारी सुरू आहे. औरंगाबादमध्ये रेकॉर्डब्रेक सभा होईल, असा विश्वास मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधत त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही असं म्हटलं. ते म्हणाले, “ईडीच्या प्रकरणानंतर संजय राऊत काहीही बडबडायला लागले आहेत. त्यांच्या प्रत्येक गोष्टीला उत्तर देण्याची गरज नाही. महाराष्ट्रातील जनता सगळं बघते आहे. जनतेला राज ठाकरे आणि मनसेचं हिंदुत्व काय आहे हे माहिती आहे आणि लोकांना ते आवडतंय.”

उद्धव ठाकरेंकडून मनसेचं हिंदुत्व बोगस असल्याची टीका, सरदेसाईंचं प्रत्युत्तर

मनसेचं हिंदुत्व बोगस आहे असं शुक्रवारी (२९ एप्रिल) मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय यावर बोलताना नितीन सरदेसाई म्हणाले, “महाराष्ट्राच्या जनतेला कुणाचं हिंदुत्व बोगस आणि खरं आहे हे माहिती आहे. आधी हिंदुत्वाचा वसा घेतलेले लोक आज कसे उलट वागत आहेत हे महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे जनता त्यांना योग्यवेळी धडा शिकवेल. मुख्यमंत्र्यांनी दुसऱ्यांकडे बोट दाखवण्याआधी आपण कुठे होतो याचं आत्मपरीक्षण करावं.”

“औरंगाबादमध्ये उद्धव ठाकरे यांचीही सभा होणार असून प्रत्येकाला अधिकार आहे,” असं सांगत सरदेसाई यांनी यावर बोलणं टाळलं. आधी औरंगाबाद शिवसेनेचा बालेकिल्ला होता, आता नाही, असं म्हणत त्यांनी चंद्रकांत खैरे यांना टोला लगावला. राज ठाकरे औरंगाबादमध्ये ४ वाजेपर्यंत पोहचतील असंही त्यांनी सांगितलं.

हेही वाचा : “ज्या क्षणी आमचा वापर होतो असं वाटलं त्याच क्षणी लाथ मारून…”, संजय राऊत यांचं वक्तव्य

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नितीन सरदेसाई म्हणाले, “राज ठाकरे यांची सभा आणि इतरांची सभा यांची तुलना कधीच होऊ शकत नाही. आमची सभा प्रचंड मोठी होणार आहे. लोकशाहीत ज्यांना जे करायचं आहे त्यांना ते करण्याचा अधिकार आहे. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सभा घ्यावी लागतेय याचाच अर्थ राज ठाकरे जे बोलत आहेत ते लोकांना आवडतंय. त्यामुळे त्या सर्वांनी याचा धसका घेतला आहे. म्हणूनच मुख्यमंत्र्यांना हातपाय हालवावे लागत आहेत.”