छत्रपती संभाजीनगर : वाहनाच्या मागच्या आसनावरुन नोटा उचलून समोर ठेवणरा आणि घराच्या छाप्यात हरणाच्या कातड्यासह फासे शिकारीचे हत्यार बाळगणाऱ्या सतीष उर्फ खोक्या निराळ्या भोसले आठवतो का ? त्याच्यावर झोपडपट्टी दादा कायदान्वये करण्यात आली स्थानबद्धतेची कारवाई सबळ पुरावे नसल्याने मागे घेण्यात आली आहे. ‘खोक्या’ नावाने प्रसिद्ध असणाऱ्या या गुंडाशी आष्टीचे आमदार सुरेश धस यांचा संबंध असल्याचे आरोप करण्यात आले होते. ‘ खोक्या’ वरील ही कारवाई सबळ पुराव्या अभावी सल्लागार समितीने चुकीची ठरवली.

संतोष देशमुख यांच्या हत्यांकाडानंतर बीड जिल्ह्यात नेते कसे गुंड पाळतात याचे उदाहरण म्हणून खोक्याचा संबंध सुरेश धस यांच्याशी जोडण्यात आला होता. धस यांनीही ते संबंध नाकारले नव्हते. अनेक जण आम्हाला बोलावतात. वाढदिवसाला शुभेच्छा देतात. त्यांच्या वाढदिवसालाही आम्ही जातो. सतीश उर्फ खोक्याचा एवढाच संबंध आहे. त्याच्या घरात हरणाचे कातडे मिळणे हे काही तो गुंड असल्याचा निकष नाही. पारधी समाजात शिकार करणारे खूप आहेत. ती पारंपरिक प्रथाच आहे, त्याने कोठून पैसे आणले हे माहीत नाही. असा खुलासाही धस यांना करावा लागला होता.

आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर खोक्या ‘ एमपीडीए’ अंतर्गत करण्यात आलेली कारवाई सबळ पुराव्या अभावी रद्द करण्यात आली आहे. गृह मंत्रालयाच्या सल्लागार समितीने सबळ पुरावे नसल्याचे सांगत पोलिसांनी केलेल्या स्थानबद्ध कारवाईतून त्याची मुक्तता करावी असे म्हटले आहे. हर्सूलच्या येथील मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक यांना पत्र लिहून ‘ खोक्या’ मुक्त करण्याचे आदेश देण्यात आले आहे. शिरुर तालुक्यातील झंपेवाडी येथे खोक्या राहत असे. त्याने सुरेश धस यांना वाढदिवसाच्या दिलेल्या शुभेच्छांच्या ध्वनीफितीमुळे खोक्या चर्चेत आला होता. जून महिन्याच्या २५ तारखेला ‘खोक्या’वर झोपडपट्टी दादा कायद्यान्वये कारवाई करण्यात आली होती.

वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता गुंड आणि खुनी असेल तर सुरेश धस याचाही ‘खोक्या’ नावाचा कार्यकर्ता आहे, असे चित्र माध्यमांमध्ये रंगविण्यात आले होते. या काळत सुरेश धस धनंजय मुंडे यांचा उल्लेख आकाचे आका म्हणून करत. माध्यमांमध्ये आरोप -प्रत्यारोपाने टोक गाठलेले असताना ‘खोक्या’ चर्चेत होता. आता त्याच्यावरील कारवाई मागे घेण्यात आली आहे. रोख रकमेसह दोन चित्रफिती समोर आल्यानंतर चर्चेत आलेल्या खोक्याची आता स्थानबद्धता संपवा, असे आदेश बजावण्यात आले आहेत.