औरंगाबाद, सांगली, नाशिक, नांदेडचा समावेश

राज्यातील चार ठिकाणच्या महानगरपालिकांच्या शहरातील बससेवा ही राज्य परिवहन महामंडळाकडून चालवली जात आहे. शहर बस चालवण्याची जबाबदारी मनपाकडे असतानाही आर्थिक तरतुदीअभावी महामंडळच ही सेवा देऊन तोटा सहन करीत आहे. या चार मनपात औरंगाबाद, नाशिक, नांदेड सांगली शहरांचा समावेश आहे. त्यातही महिन्याकाठी सर्वाधिक तोटा हा नाशिक महानगरपालिकेच्या ठिकाणी सोसावा लागत असल्याची माहिती रा. प. महामंडळातील सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

औरंगाबादची शहर बससेवा येत्या १ फेब्रुवारीपासून बंद होणार, अशी चर्चा मागील पंधरा दिवसांपासून सुरू आहे. मात्र तूर्त ही बससेवा बंद न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामागे मागील दहा वर्षांपासून औरंगाबाद महानगरपालिकेकडे असलेली रा. प. महामंडळाची १५ कोटींची थकबाकी. दिवसागणिक येणे वसुलीचा आकडा वाढत जात असल्याने मध्यंतरी शहर बससेवा ही मनपाने चालवण्यास घ्यावी, असे महामंडळाकडून कळवण्यात आले होते. मात्र मनपातून आर्थिक तरतुदीची गोळाबेरीज ही शहर बससेवा सुरू करण्याच्या अवस्थेत येत नसल्याने आयुक्तांनी महामंडळानेच शहर बससेवा आणखी काही काळ सुरू ठेवावी, असे परिवहन अधिकाऱ्यांना सांगितले होते. त्यावरून १ फेब्रुवारीपासून शहर बससेवा बंद होईल, अशी शक्यता तयार झाली होती. ती तूर्त टळली असली तरी औरंगाबादसारखीच सांगली, नाशिक व नांदेड शहरातील बससेवेची अवस्था तोटय़ातच सुरू असल्याची माहिती आहे. त्यातही सर्वाधिक तोटा हा नाशिक महानगरपालिकेच्या ठिकाणी सहन करावा लागत आहे. दिवसभरात ४४ हजार किलोमीटरचा प्रवास, असा महिन्याकाठचा खर्च पाहता राज्य परिवहन महामंडळाला चार ते पाच कोटींचा तोटा सहन करावा लागत आहे.

वास्तविक शहर बससेवा ही स्थानिक महानगरपालिकेची असते. मुंबईत बेस्ट, पिंपरी चिंचवडमध्ये पीएमसी अशी सेवा देत आहे. राज्यातील इतरही ठिकाणी मनपाच बससेवा शहरात देते. अशा परिस्थितीत औरंगाबाद, नाशिक, नांदेड व सांगली महानगरपालिकांच्या ठिकाणी राज्य परिवहन महामंडळाला शहर बससेवेतील आर्थिक ओझे वाहावे लागत असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.