पंकजा मुंडे यांची मागणी
औरंगाबाद : मराठवाडय़ातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी मंत्रिमंडळाची बैठक घेतली जावी, अशी मागणी पंकजा मुंडे यांनी सोमवारी उपोषणाच्या समारोपप्रसंगी केली. मराठवाडय़ातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी म्हणून भाजप व गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आलेल्या आंदोलनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे आदींनी सहभाग नोंदवला. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी हे उपोषण म्हणजे एक प्रकारचे नाटक असल्याची टीका केली, तर उपोषणाच्या पार्श्वभूमीवर बोलताना शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी पाणीप्रश्नी लोकप्रतिनिधींची स्वतंत्र परिषद घेणार असल्याचे जाहीर केल्यामुळे त्यांच्यावरही सहभागी नेत्यांनी टीका केली.
जलयुक्त शिवार योजना कायमस्वरुपी सुरू ठेवावी, वॉटर ग्रीड योजनेला चालना द्यावी तसेच समुद्रात वाहून जाणारे पाणी विविध नद्याजोड प्रकल्पातून मराठवाडय़ास उपलब्ध करून द्यावे, आदी मागण्यांचे निवेदन भाजपच्यावतीने विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांना उपोषणानंतर सुपूर्द करण्यात आले. सकाळी ११च्या सुमारास पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली उपोषणास सुरुवात झाली. भाजपच्या बहुतांश नेत्यांनी उपोषणस्थळी हजेरी लावली. पाणी विषयात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनीही या उपोषणाला पाठिंबा दिला. या वेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, हे उपोषण सरकारवर टीका करण्यासाठी किंवा आक्षेप घेण्यासाठी नाही, तर सरकारला वेळीच जाग आणण्यासाठीचे आहे. संवेदनशील मुख्यमंत्री या आंदोलनाची दखल घेतील. मराठवाडय़ाच्या मागासपणाचा प्रश्न पाण्याशी संबंधित आहे. तो सोडविण्यासाठी मंत्रिमंडळाची बैठक औरंगाबाद येथे घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
सरकारला शंभर दिवस पूर्ण होण्याआधी हे आंदोलन का घेतले जात आहे यावरून होणाऱ्या टीकेला खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी उत्तर दिले. त्या म्हणाल्या, ‘विरोधक म्हणून तुम्हाला आंदोलन करायला कोणी रोखलेले नव्हते. त्यांनी केलेली संघर्ष यात्राही कशी होती, हे आपण पाहिले आहे. चांगले काम पुढे जावे म्हणून सरकारच्या लक्षात आणून देण्यासाठी हे आंदोलन केले आहे.’
आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, की राज्य जल परिषदेच्या बैठका पूर्वी घेतल्या जात नव्हत्या, त्या घेण्यास सुरुवात केली. कृष्णा-मराठवाडा प्रकल्प तसेच नदीजोड प्रकल्प मार्गी लावण्यासाठी तरतूद केली. त्याचबरोबर जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून मराठवाडा दुष्काळमुक्त व्हावा, यासाठी प्रयत्न केले. या प्रयत्नांना स्थगिती द्याल तर आता केवळ लाक्षणिक उपोषण केले आहे, भविष्यात रस्त्यावर उतरूनही संघर्ष करू. प्रवीण दरेकर यांनीही सभागृहात आणि रस्त्यावर मराठवाडय़ाच्या पाणीप्रश्नासाठी उतरू असे नमूद केले. पंकजा मुंडे यांच्यामध्ये गोपीनाथ मुंडे यांचा संघर्षांचा डीएनए असल्याचे सांगत त्यांच्या पाठीशी पक्ष उभा असल्याचे त्यांनी सांगितले.
आजी-माजी खासदारांवर टीका
पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने पाणीप्रश्नासाठी केलेले आंदोलन म्हणजे नाटकच आहे, अशी टीका खासदार इम्तियाज जलील यांनी केली. या टीकेवरून आंदोलनात खासदार जलील यांच्यावरही टीका करण्यात आली. चांगले काम रोखून धरण्यासाठी ते पाठिंबा देत आहेत, असे भाजपच्या नेत्यांनी सांगितले. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी मराठवाडय़ातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांबरोबर पाणी परिषद घेतली जाईल, असे जाहीर केले. त्यामुळे त्यांच्यावरही टीका झाली. या पूर्वी अशा परिषदा घेण्यासाठी त्यांना कोणी रोखले होते, असा सवाल उपस्थित करण्यात आला. आजी-माजी खासदारांनी केलेली टीका आणि त्यांच्यावरील टीका आंदोलनस्थळी चर्चेचा विषय होता.