छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे जुन्या काळातील नायक होते, या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. काही संघटनांनी राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यपालांना हटवण्याची मागणी केली आहे.‘‘तुमचा आदर्श कोण आहे, असे जेव्हा पूर्वी विचारले जात असे तेव्हा, ‘जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस आणि महात्मा गांधी’ अशी उत्तरे दिली जात असत. परंतु महाराष्ट्रात मात्र तुम्हाला तुमचे आदर्श अन्यत्र शोधण्याची गरज नाही, कारण इथे खूप आदर्श आहेत. छत्रपती शिवाजी महाराज जुन्या काळातील, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि नितीन गडकरी हे नव्या काळातील नायक आहेत,’’ असे वक्तव्य राज्यपाल कोश्यारी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ६२ व्या दीक्षान्त समारंभात शनिवारी केले. या कार्यक्रमात शरद पवार आणि नितीन गडकरी यांना सन्माननीय डी. लिट. ही पदवी प्रदान करण्यात आली.

राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केल्याचा आरोप करीत काही संघटनांनी राज्यपालांवर टीकेची झोड उठवली आहे.‘‘सतत वाद निर्माण करणारी विधाने करणाऱ्या घटनात्मक पदावर असलेल्या या व्यक्तीला (राज्यपाल) पदावरून हटवण्याबाबत राष्ट्रपतींनी गांभीर्याने विचार करावा. मराठी नागरिकांच्या भावना दुखावणाऱ्या राज्यपालांच्या अवमानकारक विधानांवर भाजप नेहमीच मौन का बाळगतो,’’ असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी उपस्थित केला आहे. शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी औरंगाबाद येथे बोलताना, ‘‘आम्हाला केंद्राचा प्रतिनिधी नव्हे, तर राज्यपाल हवे आहेत,’’ असे भाष्य केले.

संभाजी ब्रिगेडनेही राज्यपालांच्या वक्तव्यावर टीका केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास म्हणजे केवळ ढाल-तलवारीचा इतिहास नाही, तर तो परिवर्तनाचा आणि जगाला हजारो वर्षांचा आदर्श घालून देणारा इतिहास आहे. त्यामुळे गडकरीच काय तर कुणाचीही तुलना त्यांच्याशी होऊच शकत नाही, असे संभाजी ब्रिगेडने म्हटले आहे. ‘‘राज्यपाल कोशारी हे जाणीवपूर्वक वारंवार वादग्रस्त विधाने करतात. आज त्यांनी जे विधान केले ते जाणीवपूर्वक आणि विकृत मानसिकतेतून खोडसाळपणे केले आहे,’’ असा आरोप संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी केला आहे.

पवार आणि गडकरी ध्येयवादी
शरद पवार आणि नितीन गडकरी यांनी विशिष्ट ध्येयाने झपाटून काम करत सर्वासमोर आदर्श निर्माण केल्याचे सांगताना, कोश्यारी म्हणाले, की पवार यांचे कृषी, उसाच्या क्षेत्रातील योगदान मोठे असून त्यामुळेच ते कधी-कधी अधिकच गोड बोलतात. त्या वेळी आपल्याला त्यांचा राग येतो. गडकरी पक्के मिशनरी अर्थात ध्येयवादाने काम करणारे असून त्यांची ओळख आता रोडकरी म्हणून झाली आहे, अशी टिप्पणीही राज्यपालांनी केली.

मातृभाषेतील शिक्षण महत्त्वाचे
हिंदूीतील बोलीविषयी बोलतानाही हिंदूी एक प्रकारची राष्ट्रभाषा असली, तरी मातृभाषेतील शिक्षणही महत्त्वाचे आहे, असेही राज्यपाल म्हणाले.नालंदा विद्यापीठाचे कुलपती डॉ. विजय भटकर, कुलगुरू डॉ. प्रमोद येवले या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. राज्यपाल कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांचा एकेरी नावाने केलेल्या उल्लेखावरून राज्यभरातून टीकेची झोड उठली आहे.

संघवाले ‘पागल’
राज्यपालांनी अध्यक्षीय भाषणादरम्यान, झपाटलेपणाने काम करण्याच्या संदर्भात दिवंगत सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या शिकवणुकीचे उदाहरण दिले. गोळवलकर गुरुजींना अनेक जण म्हणायचे की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक पागल आहेत. तेही म्हणायचे, आम्ही पागल आहोत. मात्र, पागल शब्दाविषयी बोलताना त्यांनी पंजाबी भाषेत त्याचा अर्थ काय, हे समजावून सांगितले होते. ‘गल’ या शब्दाचा अर्थ रहस्य आहे, तर ‘पा’ म्हणजे प्राप्त करणे, असा मिळून अर्थ काढला तर रहस्य प्राप्त करणाऱ्यांना ‘पागल’ म्हणतात, असे गोळवलकर गुरुजी सांगायचे, असे राज्यपाल कोश्यारी यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वक्तव्य काय?
महाराष्ट्रात मात्र तुम्हाला तुमचे आदर्श अन्यत्र शोधण्याची गरज नाही, कारण इथे खूप आदर्श आहेत. छत्रपती शिवाजी महाराज जुन्या काळातील, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि नितीन गडकरी हे नव्या काळातील नायक आहेत, असे विधान राज्यपाल कोश्यारी यांनी केले.