छत्रपती संभाजीनगर : वाहननिर्मितीत देश-परदेशांतील कंपन्या भारतीय बाजारपेठेत उतरलेल्या आहेत. त्यात चारचाकी उत्पादन करणाऱ्याही अनेक आहेत. परंतु या स्पर्धेतील चारचाकी वाहनांचे उत्पादन करण्यात बजाज उद्योगसमूहाचा इतक्यात तरी विचार नाही, असे स्पष्ट करत बजाज उद्योगसमूहाची बाजारपेठेत १५ लाख कोटी रुपयांची बाजार उलाढाल असल्याचा दावा नीरज बजाज यांनी केला.
बजाज उद्योगसमूहाला पुढील वर्षी शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. बजाज ऑटो कंपनीचे १०८ देशांमध्ये उत्पादन सुरू आहे. ३३ देशांमध्ये कंपनी अग्रस्थानी आहे, असा समूहाचा पटही नीरज बजाज यांनी मांडला. रेल्वे स्टेशन मार्गावरील औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्याचे ‘मधुर बजाज मार्ग’ असे नामकरण करण्यात आले. या नामकरण मार्गाच्या लोकार्पणानिमित्त ते येथे आले होते.
छत्रपती संभाजीनगरमधील बीड वळणरस्त्यावरील कमलनयन बजाज रुग्णालयाचा विस्तार ३०० वरून ६०० खाटांपर्यंत करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी कुमुद मधुर बजाज, उद्योजक ऋषी बागला, उत्सव माछर, मिहीर संदलगेकर आदींची उपस्थिती होती.
