औरंगाबाद शहरात गेल्या आठ दिवसांपासून सरासरी करोनाबाधितांचा आकडा १५ ते १७ असा येत आहे. मालेगावहून आलेल्या राज्य राखीव दलातील जवान एकाच वेळी बाधित झाल्याने शुक्रवारी संख्या अचानक शंभराने वाढली. आज नव्याने २७ जणांना करोनाची बाधा झाली आहे. वस्त्यांमधून करोना रुग्ण पुन्हा एकदा वाढत असल्याचे दिसून येत आहे. औरंगाबाद शहरातील करोनाबाधितांची संख्या शनिवारी ५०८ एवढी झाली. दरम्यान आज दिवसभरात ३१ रुग्ण करोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले.
मालेगावहून परतलेल्या ७३ जवानांना करोनाबाधा झाल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाल्यांनतर या रुग्णांवर उपचार करण्यासाठी महापालिका, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टर पोहोचले. श्रेयस अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विलगीकरण कक्षास कोविड उपचार केंद्र घोषित करून आता तेथेच त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. दरम्यान, शनिवारी सकाळच्या सत्रात करोनाबाधितांची संख्या ४९५ वर गेली. मुकुंदवाडी परिसरातील सहा, कटकट गेट परिसरातील दोन, बाबर कॉलनी, आसेफिया कॉलनी, सिल्क मिल कॉलनी, रामगनर, भवानीनगर जुना मोंढा या भागातील हे रुग्ण आहेत. यामध्ये सात पुरुष आणि दहा महिलांचा समोवश आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात गंभीर रुग्णांवरच उपचार होतील, असे ठरविण्यात आलेले आहे. सध्या ३९ रुग्णांवर येथे उपचार सुरू असून करोनाबाधित महिला रुग्णाची प्रसूती झाली. तिला मुलगी झाली असून तिची आणि बाळाची प्रकृती स्थिर असल्याचे स्त्री व प्रसूतिशास्त्र विभागाचे प्रमुख श्रीनिवास गडप्पा यांनी सांगितले. प्रतिबंधित क्षेत्रात या महिलेचे घर असल्याने तिचा लाळेचा नमुना घेण्यात आला होता. शुक्रवारी रात्री तिला करोनाची बाधा असल्याचे स्पष्ट झाल्यांनतर तिला करोना कक्षात हलविण्यात आल्याचे रुग्णालयाच्या अधिष्ठाता कानन येळीकर यांनी सांगितले. दुपारच्या सत्रातील अहवालामध्ये पाणचक्की, सातारा परिसर व जुना बाजार भागातील प्रत्येकी एकाला लागण होती.