सुहास सरदेशमुख, लोकसत्ता

औरंगाबाद : राज्यसभेच्या निवडणुकीतील यशाचे सारे श्रेय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मिळत असताना त्यांच्याविषयी मराठवाडय़ातील पंकजा मुंडे समर्थकात कमालीचा रोष दिसावा असे प्रयत्न सुरू झाले आहेत.

बीड येथे प्रवीण दरेकर यांच्या ताफ्याला अडविण्याचा प्रयत्न, औरंगाबाद येथे भाजपच्या कार्यालयात घोषणाबाजी,  केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. कराड यांच्या कार्यालयासमोरचा गदारोळ, परळी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कृपा रहावी म्हणून त्यांच्या प्रतिमेसमोर केला जाणारा दुग्धाभिषेक तसेच समाज माध्यमांमधून देवेंद्र फडणवीस यांच्यावर होणारी टीका  यातून  भाजपमधील अंतर्गत दुफळी चव्हाटय़ावर आली आहे. या घटनांच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी अद्याप काही एक भाष्य केलेले नाही. भाजपामध्ये आक्रमकपणाची किंमत मोजावी लागते, हे वारंवार सिद्ध झाल्यानंतरही पंकजा मुंडे समर्थक व त्यांच्या नेत्या आक्रमक शैली सोडण्यास तयार नाहीत, असे दिसून येत आहे. 

दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या सहकाऱ्यांपैकी काहीना खडय़ासारखे बाजूला करत पंकजा मुंडे यांनी स्वत:चा चमू उभारण्याचा  निर्णय संघर्ष यात्रेच्या निमित्ताने जाहीर केला. तेव्हा भाजपमधील अनेकजणांनी भुवया उंचावल्या होत्या. पाशा पटेल यांच्याशिवाय संघर्ष यात्रा झाली. पुढे अनेक सहकारी दुखावले जाणार हे भाजपमधील कार्यकर्त्यांनाही  समजून चुकले होते. पंकजा मुंडे यांची नवी बांधणी सुरू झाली. पण त्यांच्या आक्रमक शैलीमुळे ‘जनतेच्या मनातील मुख्यमंत्री’ या तीन शब्दांमुळे पंकजा मुंडे यांच्या खच्चीकरणासही लगेच सुरुवात झाली. पक्षीय भूमिका वेगळी आणि नेतृत्व विकास स्वतंत्र अशी कार्यशैली बीडमध्ये रुजत गेली. पंकजा मुंडे यांनीही ते संदेश पद्धतशीरपणे दिले.

एक सुप्त संघर्ष सुरू झाला. त्यामुळे भाजपच्या नेतृत्वानेही ‘ ओबीसी’ या घटकाला न दुखावता पंकजा मुंडे यांना  बाजूला करण्याचे प्रयत्न जाणीवपूर्वक  केले. पंकजा मुंडे यांच्या समर्थकांच्या मते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस याचे मुख्य कर्ते-करविते.  पंकजा मुंडे यांचे जलसंधारण खाते काढून घेण्यात आल्यानंतर हा संदेश  वेगात पसरला. तो चुकीचा आहे असे न म्हणता त्याला खतपाणी घालत पंकजा मुंडेही आक्रमक होत गेल्या. आपल्या नेतृत्वाचे खच्चीकरण होत असल्याचा संदेश त्यांनी अगदी गाव पातळीपर्यंत पोहचविला. पुढे हे संदेश पक्षस्तरावरूनही जाणीवपूर्वक दिले जाऊ लागले, परिणामी आक्रमक कार्यकर्ते आता रस्त्यावर उतरू लागले आहेत.

ऊसतोड  कामगारांचे नेतृत्वही सुरेश धस यांनी करावे असे भाजपने ठरविले. तसा त्यांचा दौराही  घडवून आणला. अगदी ओबीसीच्या मोर्चालासुद्धा पंकजा मुंडे यांना बोलविण्यात आले नाही. पंकजा  यांच्या भोवतलच्या कार्यकर्त्यांनाही डावलण्यात येऊ लागले. त्यांचा पक्ष नेतृत्वाविषयी असणारा सूर बदलू लागला. माध्यमांना सामोरे जात असताना बदलत जाणारी भाषा आक्रमक होत राहिली.  देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी माध्यमांमध्ये केली जाणारी समाजमाध्यमांमधील भाषा पंकजा समर्थकांनी बदलली. आता विधान परिषदेच्या उमेदवारीवरून पुन्हा एकदा कार्यकर्ते आक्रमक झाले असून ते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात रोष व्यक्त करीत आहेत. त्यामुळे राज्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे राज्यसभा निवडणुकीच्या यशाबद्दल कौतुक होत असतानाच मराठवाडय़ात त्यांच्याविषयीचा रोष व्यक्त होत आहे.