करोनाची भीती अजूनही प्रवाशांमध्ये दिसून येत आहे. राज्य परिवहन महामंडळाने सुरू केलेल्या बसमधून प्रवास करण्यास अजूनही कोणी धजावत नसून २२ ते ३१ मे या कालावधीत जिल्ह्य़ात केवळ ६ हजार ७७३ प्रवाशांनी प्रवास केल्याचे महामंडळाकडून सांगण्यात आले.

औरंगाबाद रेडझोनमध्ये असल्यामुळे या शहरातून अद्याप एसटीची प्रवासी सेवा सुरू झालेली नाही. मात्र, पैठण आगारातून जिल्ह्य़ाच्या इतर ठिकाणी पाठवलेल्या एसटीच्या १७६ फेऱ्यांमधून ६ हजार ३०९ किलोमीटरच्या प्रवासात केवळ १९ हजार ३८३ एवढेच उत्पन्न हाती आले असून त्या दहा दिवसांत केवळ ७४४ प्रवाशांनी प्रवास केला. सिल्लोड आगारातून एसटीच्या ९६ फे ऱ्यांतून ४ हजार ११३ किमीचा प्रवास झाला असून १३ हजार ४२८ एवढे उत्पन्न मिळाले. तर ४७७ प्रवाशांनी प्रवास केला. वैजापूर आगारातून ३२४ फे ऱ्यांमधून १३ हजार ३९९ किमी प्रवासात १ हजार ५८५ प्रवाशांनी प्रवास केला असून ३२ हजार ५०४ रुपये उत्पन्न महामंडळाला मिळाले.

कन्नड आगारातून २३६ फे ऱ्यांतून १२ हजार ११० किमी प्रवास तर ४३ हजार ४८० रुपयांचे उत्पन्न २ हजार १३४ प्रवाशांकडून मिळाले. गंगापूर आगारातून १८० फे ऱ्या, ९ हजार १४१ किमीचा प्रवास तर २३ हजार ३४७ रुपयांचे उत्पन्न १ हजार ३१८ प्रवाशांतून मिळाले. सोयगाव आगारातून १०६ फे ऱ्यांमधून ५ हजार ५८१ किमी एवढा ५१५ प्रवाशांनी केला असून त्यातून १४ हजार १४१ रुपयांचे उत्पन्न मिळाले. औरंगाबाद विभागातील सहा आगारांतून एसटीद्वारे ६ हजार ७७३ प्रवाशांनी प्रवास केला असून त्यातून महामंडळाला १ लाख ४६ हजार ५५६ रुपयांचे उत्पन्न मिळाले.

करोनाचा विषाणूचा संसर्ग होईल, या भीतीने प्रवासी एसटीद्वारे प्रवास करण्यास पुढे येत नसून महामंडळाने एसटीमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सर्व प्रकारची काळजी घेत असल्याचे सांगितले. संपूर्ण एसटी सॅनिटायजर करणे, एकाच आसनावर एक प्रवासी बसवणे, अशी व्यवस्था केलेली असल्याचेही सांगितले.