छत्रपती संभाजीनगर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणुकींवर डोळा ठेवून वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी संघ कार्यालयावर मोर्चा काढण्याचे काहीच कारण नव्हते. ‘ जॉईन आरएसएस’ या मोहिमेस विरोध करण्याचे काही एक कारण नाही. ही केवळ सांस्कृतिक संघटना आहे.
विरोध केल्यानंतर रा. स्व संघाने कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. पोलिसांनी दोघांवर गुन्हे दाखल केले. त्या विरोधात वंचितने पोलिसांविरोधात आंदोलन करायला पाहिजे होते. पण संघ कार्यालयावर मोर्चा काढणे चुकीचे आहे. त्यांनी केलेले सर्व आरोप रा. स्व. संघ फेटाळतो, अशी प्रतिक्रिया रा.स्व. संघाचे स्वयंसेवक डॉ. निखिल आठवले यांनी व्यक्त केली.
रा. स्व. संघ ही सांस्कृतिक संघटना आहे. ‘जॉईन आरएसएस’ ही मोहीम सर्वत्र सुरू आहे. त्यास जाणीवपूर्वक विरोध करण्यात आला. फलक काढून शिवीगाळ करण्यात आली. तरीही रा. स्व. संघाच्या वतीने कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली नव्हती. मात्र, दोघांवर गुन्हे दाखल झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडीने पोलिसांकडे व जिल्हा प्रशासनाकडे दाद मागायला हवी होती. पण तसे न करता रा. स्व. संघाच्या कार्यालयावर काढण्यात आलेला मोर्चा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर डोळा ठेवून काढण्यात आला असावा, असे रा. स्व. संघाच्या वतीने सांगण्यात आले.
