छत्रपती संभाजीनगर येथील एका रुग्णालयात दोन गटामध्ये हिंसक हाणामारी झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेत एक रुग्ण जखमी झाला असून महिला डॉक्टरच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. रुग्णालयात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला असतानाही तत्काळ कार्यवाही न केल्यामुळे उपस्थित असलेल्या महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या (एमएसएफ) चार कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. फ्री प्रेस जर्नलने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक गट रुग्णालयाच्या वॉर्डमध्ये घुसताना दिसत आहे. त्यानंतर ते रुग्णांसाठी असलेल्या पलंगाकडे चालत जातात. जिथे एक जखमी व्यक्ती उपचार घेत असल्याचे दिसून येते. काही क्षणातच ते त्या व्यक्तीवर रॉडने हिंसक हल्ला करतात. या गोंधळात शेजारी उभ्या असलेल्या एका महिला डॉक्टरला रॉडचा फटका बसून मोठी दुखापत झाली.
या घटनेवर तात्काळ कारवाई करत, रुग्णालयात तैनात असलेल्या महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या चार अधिकाऱ्यांना रुग्णालयाने तडकाफडकी निलंबित केले. पुढे, घाटी हॉस्पिटलचे डीन डॉ शिवाजी सुक्रे यांनी स्थानिक माध्यमांना सांगितले की, या प्रकरणातील दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल. याप्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या भीषण घटनेच्या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X अधिकृत खात्यावर सुळे यांनी रुग्णालयांमधील निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली. “छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात घुसून एका टोळक्याने निवासी डॉक्टरांना रॉडने मारहाण केल्याची घटना घडली. हि अतिशय गंभीर बाब आहे. रुग्णालयात सेवा देणारे डॉक्टर्स देखील सुरक्षित नसतील तर रुग्णसेवा सक्षम कशी राहिल? मूळात या राज्याला पुर्णवेळ गृहमंत्री नाही. त्यामुळे हे प्रकार घडत असून कायदा सुव्यवस्था ढासळली आहे.शासनाने या प्रकरणी सखोल चौकशी करुन हुल्लडबाजी करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करणे गरजेचे आहे”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
अमोल कोल्हे काय म्हणाले?
दरम्यान, अमोल कोल्हेंनीही याबाबत एक्सवर संतप्त पोस्ट केली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात निवासी डॉक्टरांना झालेली अमानुष मारहाण निंदनीय आहे. सेवाभावी वृत्तीने रुग्णांची सुश्रुषा करणारे डॉक्टर्सही सुरक्षित नाहीत ही बाब राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची दयनीय परिस्थिती सांगण्यास पुरेशी आहे. राज्यभरात गुन्हेगारांचे राज्य असून कुठे कोयता गँगची दहशत आहे तर कुठे दिवसाढवळ्या गोळीबार होताय. राज्यातील जनता सातत्याने भीतीच्या छायेत असताना राज्याचे गृहमंत्री केवळ सभा-समारंभात, प्रचारात व्यस्त आहेत ही बाब निंदनीय आहे, असं अमोल कोल्हे म्हणाले.