छत्रपती संभाजीनगर : कर्जमुक्ती मिळेपर्यंत सरकारला दाराबाहेर उभा करा, असे आवाहन करत शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी अतिवृष्टीचे ‘ पॅकेज’ मान्य नाही. ‘ परदेशी’ समिती आता स्वदेशी शेतकऱ्यांची वाट लावणार आहे, अशा शब्दात त्यांनी कर्जमाफीच्या समितीची खिल्ली उडवली. पैठण तालुक्यातील नांदर येथे शेतकऱ्यांशी ‘ दगा बाज रे’ असे घोषवाक्य फलकावरुन शेतकऱ्यांशी संवाद साधला. शिवसेना नेते अंबादास दानवे, चंद्रकांत खैरे याची या वेळी उपस्थित होते.

ही पॅकेज मान्य आहे का, असा प्रश्न विचारत ठाकरे म्हणाले, ‘ हेक्टरी ५० हजार रुपये मदत मिळायला पाहिजे, अशी मागणी आहे. मराठवाड्यात मोठे संकट आले आहे. पण सरकार नुसते अभ्यास करत आहे. कसलीही मागणी नसताना मुख्यमंत्री असताना कर्जमुक्तीचा निर्णय कर्तव्य म्हणून घेतला. राज्य सरकारकडे कर्जमुक्तीसाठी संपूर्ण यंत्रणा आहे. पण सरकारने जूनपर्यंतची मुदत देऊन ‘परदेशी’ समिति स्वदेशी शेतकर्यांची वाट लावणार आहे. पॅकेज ही थट्टा आहे.

नुकसान भरपाई कोणालाच मिळाली नाही.’ अशी घणाघाती टीका त्यांनी केली. दोन किंवा ३ रुपयांचा पीक विमा देऊन शेतकर्यांची थट्टा सुरू आहे . आता कर्जमुक्ती केली तर बॅंकांना फायदा होईल असा अजब शोध मुख्यमंत्र्यांनी लावला आहे. बँकाना मदत न करता कर्जमाफी कशी करतात, हे जरा समजून सांगा असे म्हणत ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. दिवाळीअगोदर नुकसान भरपाई देऊ असे सरकार म्हणाले होते. पण मदतीच्या नावाने आळस करतात, असेही ते म्हणाले. कर्जमुक्ती होईपर्यंत हा विषय सोडणार नाही. पण आंदोलनात साथ द्या, असेही ते म्हणाले. पाच हजार लोकसंख्येच्या नांदर गावातील पहिल्या दौऱ्यात ठाकरे यांनी कर्जमुक्तीचा आवाज अधिक उंच केला.