अफगाणिस्तान परिस्थितीचा टोमॅटो उत्पादकांना फटका

कॅरेटमागे सध्या टोमॅटोला ८० रुपये दर वेगवेगळ्या बाजारपेठेत मिळतो आहे.

निर्यात थांबल्याने दर गडगडले

औरंगाबाद : अफगाणिस्तानात उद्भवलेल्या राजकीय परिस्थितीचा भारतातील आणि त्यातही महाराष्ट्रातील टोमॅटो उत्पादकांना फटका बसलेला असून खरेदीदारांअभावी स्पर्धा थांबून स्थानिक बाजारपेठेत दर  गडगडले आहेत.

औरंगाबाद आणि नाशिक भागातून दररोज दहा हजार कॅरेटने भरलेले टोमॅटो जयपूर, दिल्ली, कोटा येथील बाजारपेठेत पाठवला जायचा. तेथून पुढे अफगाणिस्तानात निर्यात होणारा टोमॅटो थांबला आहे. या व्यवहारामुळे जयपूर, दिल्लीसह उत्तर भारतातील टोमॅटो व्यापारी औरंगाबाद, नाशिक भागात येणे थांबले आहे. परिणामी खरेदीदारच नसल्याने आणि खरेदीची स्पर्धाही थांबल्याने दर गडगडले आहेत. आता ८० रुपये कॅरेटने टोमॅटोची नागपूर, दिल्ली, जबलपूर, कटणी, कोटा, जयपूर, प्रयागराज आदी भागातून खरेदी होत आहे.

औरंगाबादसह परिसरातील २५ ते ४० गावांमधून सध्या १६ ते २० हजारच्या आसपास कॅरेट टोमॅटोची आवक होत असून ३५ ते ४० ट्रकमधून तो पाठवला जात आहे. औरंगाबादजवळील वरुडकाझी या केवळ टोमॅटोचे उत्पादन घेणाऱ्या गावात ६ ते ७ हजार कॅरेट माल निघत असल्याचे स्थानिक शेतकरी व निर्यातीच्या व्यवसायातील व्यापारी कैलास राजे दांडगे यांनी सांगितले.

कॅरेटमागे सध्या टोमॅटोला ८० रुपये दर वेगवेगळ्या बाजारपेठेत मिळतो आहे. एका कॅरेटमध्ये २५ किलो माल असतो. किलोमागे केवळ २ रुपये दर मिळतो.

या मिळणाऱ्या पैशातून फवारणीचाही पैसा शेतक ऱ्यांच्या हाती येत नाही. शिवाय इंधन दरवाढीचाही फटका शेतक ऱ्यांना बसला असून नागपूरपर्यंत माल नेण्यासाठी पूर्वी १६ ते १७ हजार रुपये भाडे आकारले जात होते. आता २२ हजार रुपयांवर गाडीभाडे द्यावे लागत आहेत. हा पैसा थेट शेतक ऱ्यांच्या खिशातूनच जात आहे.

वरुडकाझी हे टोमॅटोचे माहेरघरच आहे. बहुतांश येथील शेतकरी हे टोमॅटोचेच उत्पादन घेतात. येथील टोमॅटो पूर्वी पाकिस्तानलाही पाठवला जायचा. पाकिस्तानशी व्यवहार थांबल्यानंतर अफगाणिस्तानमधून चांगली मागणी होती. तेथून पुढे इराण-इराकशीही व्यवहार चालायचा. आता हे व्यवहारचक्र थांबले आहे. परिणामी औरंगाबाद, नाशिक, पिंपळगावचा टोमॅटो दिल्ली, जयपूर, कोटापर्यंतच जात आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडींचा परिणाम स्थानिक शेतक ऱ्यांवर झाला आहे. – कैलास राजे दांडगे, शेतकरी व निर्यात व्यावसायिक

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Situation in afghanistan hit tomato growers akp

ताज्या बातम्या