परभणी : सुरुवातीला बारदाना नाही म्हणून सोयाबीनची खरेदी रखडली त्यानंतर शासनाने मुदत वाढवून दिली तरीही अजून नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी होऊ शकली नाही. आता आणखी किमान तीन आठवड्यांची मुदत वाढवून मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

दरम्यान, नाफेडला सोयाबीन खरेदीसाठी २० ते २५ दिवस वाढवून द्यावेत अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांकडे करण्यात आली आहे. खरीप हंगामामध्ये जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे उत्पादन शेतकरी घेतात. यात खरीप पेरणीनंतर झालेल्या अतिवृटीमुळे सोयाबीन पिकांचे नुकसान झाले त्यात मोठ्या प्रमाणात उत्पादन घटले आणि बाजारभावही पडले. यातून शेतकरी तारण्यासाठी शासनाने नाफेडमार्फत खरेदी सुरु केली जेणेकरून सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांना आधार होईल. त्यावर सोयाबीन खरेदीसाठी जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी ऑनलाईन नोंदणी केली. सरकारी काटे सुरु झाले परंतु या काट्यांवर खरेदी मात्र संथ गतीने सुरु आहे याकडे निवेदनात लक्ष वेधण्यात आले आहे. सोयाबीन खरेदीचा मुदतवाढ न मिळाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना संपूर्ण जिल्ह्यात चक्काजाम आंदोलन छेडेल असा इशारा देण्यात आला आहे.निवेदनावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, रामप्रसाद गमे, गजानन तुरे, हनुमान चांगभले, माऊली शिंदे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

पाच हजाराहून अधिक शेतकरी वंचित

केंद्र सुरु झाल्यापासून बारदाना नाही म्हणून जवळपास २० ते २५ दिवस खरेदी बंद राहिली. याचा फटका सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांना बसला. 6 फेब्रुवारीपासून सरकारने खरेदी बंद करण्याचे म्हटले आहे. जिल्ह्यातील नोंदणी केलेल्या ५ हजार १७६ शेतकर्‍यांच्या सोयाबीनची खरेदी अद्याप पुर्ण झालेली नाही म्हणून सोयाबीन खरेदीची तारीख २० ते २५ दिवस वाढविण्यात यावी. तरच बारदानाअभावी बंद राहिलेले दिवस भरून निघतील आणि नोंद झालेल्या ५ हजार १७६ शेतकर्‍यांचे सोयाबीन खरेदी होईल.

Story img Loader