औरंगाबाद, जालन्यातील प्रत्येकी पाच विद्यार्थ्यांना पकडले
औरंगाबाद : माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येत असलेल्या दहावीच्या परीक्षेला मंगळवारपासून सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी कॉप्यांचे प्रकार समोर आले आहेत. मंडळाच्या वतीने सायंकाळपर्यंत देण्यात आलेल्या माहितीनुसार औरंगाबाद व जालना जिल्ह्य़ात पाच विद्यार्थ्यांना कॉपी करताना पकडण्यात आले आहे. उर्वरित जिल्ह्य़ातील माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. मात्र ग्रामीण भागात जवळपास बहुतांश ठिकाणीच कॉप्यांचे प्रकार सुरू असून केंद्राबाहेर तपासणी करण्याची केवळ औपचारिकता पार पाडली जात होती. तर केंद्रामध्ये एकाच बाकावर दोन-दोन विद्यार्थी बसून परीक्षा देत असल्याचे चित्र असल्याने कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडाला असल्याचे दिसून आले आहे.
परीक्षेच्या पहिल्याच दिवशी शेनपुंजी, नागद, लाडसावंगी आदी गावांमध्ये परीक्षेच्या कालावधीत गैरप्रकार होत असल्याचे उघड झाले. विशेष म्हणजे शिक्षकांकडून विद्यार्थ्यांंना मदत केली जात असल्याचे दिसून आले. परीक्षा केंद्राच्या प्रवेशद्वारावर विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आल्यानंतर वर्गात मात्र कॉपीसाठी अनुकूल वातावरण निर्माण करून दिले जात असल्याचा प्रकारही उघडकीस आला आहे. औरंगाबाद जिल्ह्य़ातील २२२ केंद्रांवर ६९ हजार ७०६ विद्यार्थी दहावीची परीक्षा देत आहेत.
भरारी पथकाला पोलीस बंदोबस्त?
बारावी विज्ञान शाखेची सोमवारी जीवशास्त्राची प्रश्नपत्रिका होती. यादिवशी फर्दापूर येथे गेलेल्या शिक्षण विभागाचे भरारी पथकाला गैरप्रकार आढळून आले. त्यामुळे तेथील केंद्रांवर तळ ठोकून बसलेल्या भरारी पथकामुळे गैरप्रकार काही काळ थांबले. मात्र त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये गोंधळ सुरू झाला. त्यातील काहींनी भरारी पथकातील अधिकाऱ्यांवर शेरेबाजी सुरू केली. त्यामुळे भरारी पथकाला चक्क पोलीस बंदोबस्तात पाठवण्यात आल्याचे वृत्त शिक्षण विभागातूनच सांगण्यात आले.