टाळेबंदीमुळे रुतलेल्या राज्य परिवहन बसला मालवाहतुकीचा आधार मिळाला आहे. बसगाडय़ांना पाठीमागे दरवाजा करून केल्या जाणाऱ्या मालवाहतुकीतून ७२ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. येत्या वर्षभरात अशा दोन हजार मालवाहतूक गाडय़ा तयार करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले असून जुन्या बसमधून केल्या जाणाऱ्या मालवाहतुकीचा चांगला परिणाम दिसत असल्याचे सांगण्यात येत आहे. औरंगाबाद शहरात अशा नऊ बस बांधण्यात आल्या. त्यातील एक जालना आणि एक गाडी जळगावला पाठविण्यात आली असल्याचे वाहतूक विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. दुसरीकडे शहरातील विभागीय बस बांधणी कार्यशाळेतील प्रतिदिन दीड बस बांधणीचा वेग आता अर्धी गाडी बांधणीपर्यंत खाली घसरला आहे. कर्मचाऱ्यांच्या एकूण संख्येच्या ३३ टक्केच कर्मचाऱ्यांना कामावर बोलावण्याची टाळेबंदीमध्ये अट असल्याने त्याचा परिणाम होत असल्याचे विभागाचे प्रमुख सांगलीकर यांनी सांगितले.
राज्य परिवहन मंडळाचे चाक टाळेबंदीमुळे पूर्णत: थांबले असल्यासारखेच आहे. जेथे बस सेवा सुरू आहे तेथे प्रवासी येण्यास तयार नाहीत. त्यामुळे चाक रुतून बसले आहे. त्यावर मात करण्यासाठी बसमधून मालवाहतूक करण्याचे ठरविण्यात आले.
बसच्या पाठीमागच्या बाजूस दरवाजा करण्यात आला तर खिडक्यांना आतून पत्रा मारण्यात आला. प्रवासी बसण्याचे आसन काढून टाकण्यात आले. परिणामी बसचे मालवाहतुकीमध्ये रूपांतर करण्यात आले. औरंगाबादमध्ये अशा प्रकारच्या नऊ मालमोटारी तयार करण्यात आल्या. या गाडय़ा तयार करताना कोणतीही नवी वस्तू वापरली नाही. जुना पत्रा वापरून मालमोटारी बांधल्यानंतर त्यातून मालवाहतूक करणे सुरू करण्यात आले आहे.
सरकारी सामानाची ने-आण करण्यासाठी या गाडय़ांचा उपयोग होत आहे. गेल्या एक महिन्यात एक हजार ९०७ फेऱ्यामधून ७२ लाख रुपयांचा महसूल मिळाला असल्याचे परिवहन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, औरंगाबाद शहरातील विभागीय कार्यशाळेत बस बांधल्या जातात. पत्र्याची बस बांधण्यासाठी पूर्वी ९७२ तास लागत नव्या पद्धतीच्या बसबांधणी करताना त्यात वाढ झाली होती. त्यामुळे बस बांधणीचा वेग तसा कमी झाला होता. पुढे कर्मचाऱ्यांनी त्यावर मात केली.
मात्र टाळेबंदी झाल्याने सारे गणित बिघडले. आता जेथे बस पाठविली जाते तेथे प्रवासी नसतात. त्यामुळे मालवाहतूक हाच टेकू असेल असे मानून राज्य परिवहन महामंडळात काम सुरू करण्यात आले. त्याचे चांगले परिणाम होऊ लागले आहे.
‘‘मालवाहतुकीच्या निर्णयाचा लाभ झाला आहे. ७२ लाखांपेक्षा अधिकचा महसूल आहे.
– शिखर चेन्ने, परिवहन आयुक्त