औरंगाबाद : करोनाकाळात ढासळलेल्या गुणवत्तेत आता वाढ होत असल्याने नव्याने केलेल्या सर्वेक्षणात दिसून येत आहेत. भाषा विषयातील गुणवत्तेत वाढ दिसून आली असून मराठी माध्यमांच्या १ली ते ५वी वर्गासाठी २६.७२ टक्के एवढी आहे. २२ ते २४ डिसेंबरदरम्यान घेण्यात आलेल्या अध्ययन पातळी तपासणीच्या कार्यक्रमात प्राथमिक स्तरावरील ७० टक्के विद्यार्थी कमालीचे कच्चे असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे त्यांच्या शिक्षणाचा दर्जा वाढावा म्हणून गुणवत्ता वाढीचा १०० दिवसांचा कार्यक्रम हाती घेण्यात आला. त्यातून भाषा विषयाची गुणवत्ता वाढलेली दिसून येत असली तरी गणितच्या अध्ययन पातळीत फारशी वाढ झाली असल्याचे दिसून आलेले नाही.

औरंगाबाद जिल्ह्यात गुणवत्ता तपासणीसाठी ११ ते २३ एप्रिल दरम्यान विशेष मोहीम आखण्यात आली होती. औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिकामधील मराठी व उर्दू माध्यमांची अध्ययन क्षमता अलीकडेच तपासण्यात आल्यानंतर त्याचे निकष जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या तज्ज्ञांनी तयार केले आहेत.

पहिले ते पाचवी या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी शब्दस्तर ते वाचन उतारा या क्षमतांवर १ली ते ८वीपर्यंतची अध्ययन स्तर तपासण्यात आले. करोनामुळे अनेक दोन वर्षे शाळा जवळपास बंदच होत्या. त्यामुळे २२ ते २४ डिसेंबर दरम्यान करण्यात आलेल्या मूल्यमापनात भाषा विषयात प्रगती असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्येची टक्केवारी केवळ ३०.२७ टक्के एवढाच होता. म्हणजे ७० टक्के विद्यार्थी शिक्षणात चाचपडत होते तर गणितामध्ये अध्ययनस्तर अधिक घसरलेला होता. अध्ययन क्षमता पूर्ण करणाऱ्या विद्यार्थाची संख्या केवळ २८.३६ टक्के एवढीच होती. पहिली ते ५वीपर्यंतची अध्ययन गळती अधिक होती खरी आणि ६वीमध्ये थोडी बरी स्थती होती. ५७.४८ टक्के भाषा विषयात तर ४५.४९ टक्के विद्यार्थ्यांना त्या-त्या इयत्तांची गणिते येत होती. वर्गातील अर्ध्यापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना बेरीज- वजाबाकी, गुणकार- भागाकार या क्रियाही करता न येणाऱ्या विद्यार्थ्यांचे काय करणार, असा प्रश्न निर्माण झाल्यानंतर जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य व विद्या प्राधिकरणाचे संचालक कलीमोद्दीन शेख यांनी १०० दिवसांचा गुणवत्ता विकास अभियानाचा प्रयोग सुरू केला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे यांनीही या उपक्रमाला साथ देण्यासाठी शिक्षकांना प्रोत्साहित केले. १०० दिवसांत काय आणि कसे शिकवायचे याचे साहित्य व प्रयोग यांची माहिती शिक्षकांना देण्यात आली. त्यानंतर ११ ते १३ एप्रिलदरम्यान पुन्हा विद्यार्थ्यांना कळाले काय, त्यांच्यात प्रगती झाली काय याची तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये आलेले निष्कर्ष नुकतेच हाती आले आहेत.

अजूनही ३७.३ टक्के ६वी ते ८वी इयत्तेमधील मराठी माध्यमांच्या ३७.०३ विद्यार्थ्यांना भागाकार, शाब्दिक भागाकार येत नसल्याचे निष्कर्ष आहे.

मराठी माध्यमांपेक्षा उूर्द माध्यमांची गुणवत्ता अधिक घसरलेली आहे.  किती विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासणी झाली?  १ली ते ५वी च्या २२३६ शाळांमधील एक लाख ५४ हजार ७५० जणांची अध्ययन स्तर तपासणी करण्यात आली. यात गणितात विद्यार्थी मागे असल्याचे दिसून येत आहे.

डिसेंबरमधील अध्ययन स्तर

    भाषा   गणित

१ली ते ५वी  ३०.२७   २८.२६

६वी ते ८वी  ५७.४८   ४५.४९

ही तपासणी २२ ते २४ डिसेंबर या कालावधीमध्ये करण्यात आली

एप्रिलमधील अध्ययन स्तर

१ली ते ५वी ५८.४१   ५०.३४

६वी ते ८वी  ७१.७८   ६३.११

शंभर दिवसांचा गुणवत्तेच्या कार्यक्रमामुळे अध्ययनस्तरामध्ये वाढ झाली आहे. औरंगाबाद शहरातील शाळांमध्ये मात्र सुधारणा होण्याची आवश्यकता असल्याचे  दिसून आले आहे.

 – शेख कलिमोद्दीन, संचालक विद्या प्राधिकरण