छत्रपती संभाजीनगर : पैठण शहरात २७ सप्टेंबरच्या रात्री उशिरा, २८ सप्टेंबर लागताच मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी “नागपूर करारा”ची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी भरपावसात स्वराज्य जनपरिषदेच्या वतीने निदर्शने करण्यात आली. निदर्शकांपैकी प्रमुखांनी सांगितले की, २८ सप्टेंबर रोजी मराठवाड्याच्या विलिनीकरणादरम्यान हा नागपूर करार करण्यात आला होता. यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी सभागृहात मराठवाड्याचा विकास व्हावा म्हणून या नागपूर कराराला दुजोरा दिला होता. त्यानुसार करार झाल्यापासून आजपर्यंत गेली ७२ वर्ष नागपूर कराराची अंमलबजावणीच झालेली नाही.

यासंदर्भात गेल्या पाच वर्षांपासून पाठपुरावा करून सुद्धा शासन दुर्लक्ष करत असल्याने अखेर शेवटी स्वराज्य जनपरिषदेच्या वतीने २७ सप्टेंबर रोजी रात्री बारा वाजता अर्थात २८ तारखेच्या सुरुवातीलाच भरपावसात छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शने करून शासनाचे लक्ष्य वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला.

यावेळी निवेदनाद्वारे मराठवाड्याचा अनुशेष भरुन काढण्यासाठी गाव, तालुका व जिल्हा स्तरावर तज्ञ व अनुभवी लोकांची तातडीने बैठक घ्यावी, प्रत्येक दोन महिन्याला महसूल विभागीय आयुक्तांनी सर्व क्षेत्रातील अनुशेष विभागाची आढावा बैठक घ्यावी, अनुशेष भरुन काढतांना कोणत्याही विभागातील कोणतीही योजना रखडली जाऊ नये याची दक्षता घ्यावी, मराठवाड्यातील प्रत्येक कार्यालयात अनुशेष विकास अंमलबजावणी कक्ष स्थापन करावा, मराठवाडा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीतील सर्व निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करावी, बेरोजगारांसाठी मराठवाड्याच्या प्रत्येक तालुक्यातील हर एक विभागात मोठे उद्योग, कारखाने उभारावेत, मराठवाड्याचा रेल्वे अनुशेष तातडीने भरुन काढावा, अनुशेष भरुन काढल्याची टक्केवारी वेळोवेळी अधिकृतरित्या जाहीर करुन उर्वरितांसाठी योजना निश्चित कराव्यात आदी मागण्या करण्यात आल्या.

तसेच नागपूर कराराची अंमलबजावणी करावी, मराठवाड्याचा अनुशेष भरुन काढा आदी घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी यावेळी परिसर दणाणून सोडला. याप्रसंगी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दिनेश पारिख, रमेश खांडेकर यांच्यासह स्वराज्य जनजागृती परिषदेचे विष्णू ढवळे, शेख रईस, संदीप वैष्णव, गणेश जुंजे, विष्णू सोनार, केदार मिरदे, धनराज चितलांगी, सुनील हिंगे आदी उपस्थित होते.