औरंगाबाद : औरंगाबाद येथील सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयातील दहा वाघांची मंगळवारी करोनाच्या विषाणूचा फैलाव होत असल्याच्या वातावरणाच्या पार्श्वभूमी तपासणी करण्यात आली. अमेरिकेतील प्राणिसंग्रहालयातील वाघिणीला करोनाची लागण झाल्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून देशभरातील सर्व प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांची तपासणी करण्यात यावी, असे आदेश संबंधित प्राधिकरणाने सोमवारीच काढले होते. त्यासंदर्भाने मंगळवारी डॉ. नितीसिंग यांनी सिद्धार्थ उद्यानातील वाघ-वाघिणींची करोना विषाणूची लक्षणे तपासण्याच्या पार्श्वभूमीवर तपासणी केली. यामध्ये त्यांना कुठलाच त्रास, करोनाची लक्षणे दिसून आली नाहीत. यावेळी महापौर नंदकुमार घोडेले यांनी परिस्थितीचा आढावा घेत दररोज सिद्धार्थ उद्यानातील प्राण्यांची तपासणी करण्याचे आदेश दिले. शिवाय कर्मचारी, अधिकाऱ्यांनी सॅनिटायझर करूनच पिंजऱ्याजवळ जावे तसेच हातमोजे, गम बुट वापरण्याचे निर्देश दिले. सर्व प्राण्यांच्या शरीराचे तापमान सर्वसाधारण असून पुरेसा आहार घेत आहेत. तसेच मोकळेपणाने श्वास घेत आहेत. त्यामुळे प्राणी सुरक्षित असून निरोगी आहेत. वाघांना देण्यात येणारे अन्न (मटण) मिठाच्या पाण्यात उकडून देण्यात येत असल्याचे प्राणिसंग्रहालयातील सूत्रांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 9th Apr 2020 रोजी प्रकाशित
Coronavirus : दहा वाघांची ‘करोना’ची तपासणी
सर्व प्राण्यांच्या शरीराचे तापमान सर्वसाधारण असून पुरेसा आहार घेत आहेत.

First published on: 09-04-2020 at 00:42 IST
Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ten tigers tested for coronavirus zws