मराठवाडय़ातील रुग्णांची संख्या २७
औरंगाबाद : औरंगाबाद येथे मंगळवारी आणखी तीन जणांचे अहवाल करोना चाचणीला सकारात्मक आल्याने आता करोनाबाधितांची संख्या १४ वर गेली आहे. त्यातील एक रुग्ण बरा झाला असून एकाचा मृत्यू झाला होता. मृत झालेल्या करोधाबाधित व्यक्तींच्या घरातील आणखी दोघांना लागण झाल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक सुंदर कुलकर्णी यांनी सांगितले. आता मराठवाडय़ातील रुग्णांची संख्या मंगळवारी सायंकाळपर्यंत २७ एवढी झाली. त्यात औरंगाबादमध्ये सर्वाधिक १४, लातूर येथे आठ, जालना, हिंगोली येथे प्रत्येकी एक आणि उस्मानाबाद येथे तीन रुग्णांचा समावेश आहे.
मुंबई येथे बँकेमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला करोनाची लागण झाल्यानंतर औरंगाबाद येथे त्याचा मृत्यू झाला. त्यांच्या घरातील दोघांचे अहवाल चाचणीला सकारात्मक आले. रुग्णालयात दाखल अन्य एका रुग्णाशी संबंधित व्यक्तीसही करोना झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर महापालिकेने तपासणी वाढविली आहे.
मराठवाडय़ातून मंगळवारी दुपारी एक वाजेपर्यंत पाठविण्यात आलेल्या १०४५ नमुन्यांपैकी २४ जणांना करोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे विलगीकरण वाढविण्यात आले असून मराठवाडय़ात २३९७ जणांना घरातच विलगीकरण करण्यात आले आहे. तर २४७ जणांना संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. ९९ ठिकाणी विलगीकरणाची व्यवस्था उभी करण्यात आली असून तेथे आठ हजार ३१४ खाटांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. रक्तपेढीमध्ये सध्या ८६२ रक्त पिशव्या, तसेच १४,००६ प्लाझ्मा उपलब्ध असल्याचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी सांगितले.
पर्यायांवर विचार
औरंगाबाद शहरातील घाटी रुग्णालयातील व्यक्तीला संसर्ग झाल्यानंतर मोठय़ा प्रमाणात तपासण्या करण्यात आल्या होत्या. डॉक्टरांची स्वतंत्र निवासव्यवस्था करावी अशी मागणीही पुढे आली होती. मात्र, तूर्तास घाटी प्रशासनाने पर्यायी व्यवस्था असल्याचे कळविले आहे. पण या अनुषंगाने दोनतीन पर्यायांवर विचार सुरू असल्याचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी सांगितले.