scorecardresearch

निवासस्थानावर हल्ला करणाऱ्या महिलांची वेदना समजून घेऊ; संवाद साधणे ही नैतिकताच, सुप्रिया सुळे यांचे मत

राज्य परिवहन महामंडळातील त्या महिलांना भेटून त्यांची वेदना समजून घ्यायची आहे. कारण अशा पद्धतीने वागणाऱ्या महिलांमध्ये ही मराठी संस्कृती कोठून आली, त्यांना समजून घ्यायचे आहे.

औरंगाबाद : राज्य परिवहन महामंडळातील त्या महिलांना भेटून त्यांची वेदना समजून घ्यायची आहे. कारण अशा पद्धतीने वागणाऱ्या महिलांमध्ये ही मराठी संस्कृती कोठून आली, त्यांना समजून घ्यायचे आहे. कारण हल्ला ही कृती नक्कीच त्यांची नव्हती. त्यांना समजून घेणे सत्ताधारी म्हणून असणाऱ्यांची नैतिक जबाबदारी मानत असल्याचे सांगत खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य परिवहन मंडळातील कर्मचाऱ्यांशी संवाद साधू असे औरंगाबाद येथे सोमवारी सांगितले.  त्यांच्या मते १२० जणांचे प्राण गेले. त्यांची काही यादी आहे काय, कोण होते ते, याची माहिती घेऊन त्यांच्याशी बोलायला हवे. सरकारने केलेल्या आवाहनानंतर नऊ हजार जण कामावर रुजू झालेत. कारण चर्चेतूनच प्रश्न सोडविले जाऊ शकतात. त्यामुळे संवाद सुरू राहील, असेही त्या म्हणाल्या.

दिल्ली येथे घडणाऱ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर त्याचे परिणाम गुंतवणुकीवर होतील. आता कोठे गाडे रुळावर आले आहे. अशा स्थितीमध्ये असे अस्वस्थ करणारे वातावरण निर्माण होत असेल तर ते चुकीचे ठरेल. त्यामुळे देश व राज्यावर प्रेम करणारा कोणीही अशी भाषा वापरणार नाही. एकेकाळी कोणत्याही राजकीय प्रभाव न घेता स्वायत्ता संस्थाचा गैरवापर सुरू झाल्या असून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर केंद्रीय तपास यंत्रणांनी तब्बल १०३ वेळा छापे टाकले. पण त्यांना काही मिळाले नाही. १०० कोटी रुपयांचा व्यवहार असल्याची चर्चा करण्यात आली. मग ती ५५ लाखापर्यंत आली. पुढे टंकलेखनातील चुका म्हणून ती रक्कम पाच लाख रुपयांपर्यंत खाली आली. नवाब मलिक व अनिल देशमुख यांच्यावरील कारवाई पूर्णत: चुकीची असल्याचेही खासदार सुळे यांनी पत्रकार बैठकीत सांगितले. ‘जय श्रीराम’चा नारा वाढवत आता हनुमानही राजकीय व्यासपीठावर चर्चेचा विषय झाला आहे याकडे कसे पाहता हे असे विचारले असता खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या,‘ श्रद्धावान आहेच मी पण भारतीय संस्कृतीत गीता हे वर्तणुकीचे शिक्षण देते. पण सध्या धर्माचे सादर केले जाणारे दृश्यरूप भारतीय संस्कृती नाही.’ औरंगाबाद येथे नवउद्योजकतेच्या संकल्पनांवर काम करणाऱ्या औद्योगिक संघटनेबरोबरही त्यांची चर्चा केली. तसेच पक्ष कार्यकर्त्यांशी चर्चा केली.

सेनेकडून राष्ट्रवादीची गळचेपीची तक्रार

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश देण्यात येतो. औरंगाबाद जिल्ह्यात शिवसेना राष्ट्रवादीला कमी लेखते त्यातही रोहयो मंत्री संदीपान भुमरे व महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार अशा कामात असतात. महाविकास आघाडीत होणाऱ्या अशा घटनांची माहिती संपर्कमंत्री तथा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमोरही मांडली. त्यावर घडलेल्या घटनेची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांपर्यंत सादर करण्याची सूचना सुळे यांनी केली. पत्रकार बैठकीत या घटनांच्या उल्लेखावर त्यांनी फारसे भाष्य केले नाही.

मराठीतील सर्व औरंगाबाद ( Aurangabad ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Understand pain women attack residence communication ethical supriya sule ysh

ताज्या बातम्या