•  प्रशांत बंब, सत्तार, शिरसाट, अमित देशमुख, ज्ञानराज चौगुलेंची हॅटट्रिक
  • पंकजा मुंडे, हर्षवर्धन जाधव, डी. पी. सावंत यांची संधी हुकली

मराठवाडय़ातील ४६ मतदार संघांतून सलग तिसऱ्यांदा विजय साजरे केलेले पाच आमदार असून ही संधी हातून हुकलेले तिघे जण आहेत. संधी हुकलेल्यांमध्ये पंकजा मुंडे, हर्षवर्धन जाधव व डी. पी. सावंत यांचा समावेश आहे.

तिसऱ्यांदा विजय साजरे करणाऱ्या आमदारांमध्ये औरंगाबाद पश्चिम मतदार संघातील संजय शिरसाट, गंगापूर-खुलताबादचे भाजपचे प्रशांत बंब व आता शिवसेनेकडून निवडून आलेले सिल्लोड मतदार संघातील अब्दुल सत्तार, असा औरंगाबाद जिल्ह्य़ातील तिघांचा समावेश आहे. यातील प्रशांत बंब हे पहिल्या वेळी अपक्ष म्हणून निवडून आले होते. मागील निवडणूक त्यांनी भाजपकडून लढवलेली होती. तर सत्तार यांनी यापूर्वी दोन वेळा काँग्रेसकडून निवडणूक लढवलेली होती.

आमदार संजय शिरसाट यांना तिसऱ्या विजयासाठी मोठे झगडावे लागले. भाजपच्याच बंडखोर उमेदवारामुळे शिरसाट यांच्यापुढे मोठे आव्हान उभे होते. बंडखोर राजू शिंदे हेच निवडून येतील, अशीच चर्चा होती. मात्र संजय शिरसाट यांनी जवळपास ४० हजारांच्या मताधिक्याने विजय साजरा केला. आघाडी सरकारच्या काळात राज्यमंत्री असलेल्या अब्दुल सत्तार यांनी अलिकडे विधानसभेच्या तोंडावर शिवसेनेत प्रवेश केला होता.

काँग्रेसकडून सलग तिसऱ्यांदा विजयी होणाऱ्यांमध्ये लातूरचे अमित देशमुख यांचा समावेश आहे. उमरगा मतदार संघातून ज्ञानराज चौगुले हे तिसऱ्यांदा शिवसेनेकडून आमदार झाले आहेत. लातूरमधून अमित देशमुख यांनाही स्थानिक पातळीवर तिसऱ्या विजयासाठी झगडावे लागले. राज्यात सर्वत्र भाजपचा बोलबाला असताना अमित देशमुख यांच्यापुढे प्रतिस्पर्धी शैलेश लाहोटी यांचे आव्हान होते.

तिसऱ्यांदा विजय साजरा करण्याची संधी परळीतून पंकजा मुंडे, कन्नड मतदार संघातून हर्षवर्धन जाधव तर नांदेडमधील डी. पी. सावंत यांना साधता आली नाही. या तिघांनीही २००९, २०१४ या निवडणुकांमध्ये सलग विजय प्राप्त केला होता. मात्र तिघांचाही पराभव मराठवाडय़ातील राजकारणात धक्कादायक मानला जात आहे. सावंत यांची ओळख माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचे कट्टर समर्थक म्हणून आहे तर पंकजा या राज्याच्या मंत्रिमंडळात महिला व बालविकास व ग्रामविकासमंत्री होत्या.

कन्नड मतदार संघातून २००९ साली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून व २०१४ साली शिवसेनेकडून विजयी झालेले हर्षवर्धन जाधव हे तिसऱ्यांदा विजय साजरा करण्याच्या तयारीनेच अपक्ष म्हणून रिंगणात उतरले होते. मात्र, स्थानिक पातळीवरील नेतृत्वासोबत झालेले मतभेद व पक्षनेतृत्वावर केलेल्या टीकेमुळे शिवसैनिकांसह प्रमुख नेत्यांनीही जाधव यांच्या पराभवासाठी कंबर कसून काम केले होते. शेवटी जाधव यांना तिसऱ्यांदा विजय साजरी करण्याची संधी साधता आली नाही.

भुमरे, टोपेंचा सलग पाचवा विजय

पैठण मतदार संघातून शिवसेनेचे संदिपान भुमरे व जालना जिल्ह्य़ातील घनसावंगी मतदार संघातील राष्ट्रवादीचे राजेश टोपे यांनी सलग पाचवा विजय संपादन केला. पैठणमधून भुमरे यांच्यापुढे राष्ट्रवादीचे दत्ता गोर्डे तर घनसावंगीतून टोपे यांच्यापुढे शिवसेनेचे हिकमत उढाण यांनी आव्हान उभे केले होते.