लक्षवेधी लढती

बिपिन देशपांडे, औरंगाबाद</strong>

परळी मतदारसंघात पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या चुलत भाऊ- बहिणीत होणाऱ्या चुरशीच्या लढतीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. गेल्या निवडणुकीत पंकजा यांनी धनंजय यांचा पराभव केला होता. नगरपालिकेत मात्र धनंजय यांनी बाजी मारली होती. विधानसभा निवडणुकीत कोण विजय मिळवितो यावर बीडवर पंकजा की धनंजय यापैकी कोणाचे वर्चस्व हे स्पष्ट होणार आहे. मुंडे बंधू-भगिनी सर्वताकदीनिशी रिंगणात उतरले आहेत.

परळी मतदारसंघातील मागील दशकभराच्या राजकारणाचा खरा पोत दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा उत्तराधिकारी म्हणून स्वतला सिद्ध करण्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांचा भाग राहिला आहे. मुंडे यांच्या कन्या पंकजा मंत्रीपदाचा उपयोग मतदारसंघाच्या विकासासाठी केल्याचा दावा करत असतात. तर अडचणीत सर्वसामान्य माणसाच्या मदतीसाठी धावून येणारा नेता म्हणून स्वतची प्रतिमा तयार करण्यावर गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे धनंजय मुंडे यांनी याकाळात भर दिलेला दिसतो.

परळी मतदारसंघाच्या राजकारणाची दिशा बदलली ती भाजपचे चाणक्य म्हणून ओळखले जाणारे प्रमोद महाजन यांच्या निधनानंतर. महाजन राष्ट्रीय नेते होते. त्यामुळे मुंडेंना दिल्लीचा आशीर्वादच असायचा. मात्र, महाजन यांच्या निधनानंतर दिल्लीत जागा निर्माण करून ओबीसींचे नेतृत्व प्रस्थापित करण्यासाठी मुंडे यांनी लोकसभेची बीडची जागा लढवण्याचा निर्णय घेतला. २००९मध्ये मुंडे दिल्लीत पोहोचले. मात्र परळी मतदारसंघात मुंडेंचा वारसदार कोण, याची चर्चा त्यानिमित्ताने सुरू झाली. मुंडेंनी पुतणे धनंजय यांना कामाला लागण्याचा आदेशही तेव्हा दिला होता, अशी चर्चा अजूनही ऐकू येते. मात्र ऐन विधानसभेच्या (२००९) तोंडावर मुंडेंनी अमेरिकेत वास्तव्य असलेल्या पंकजा यांना भाजपची उमेदवारी देत आपला राजकीय वारसदार निवडला.

येथूनच मुंडे घराण्यात काका-पुतण्यांमध्ये संघर्षांला सुरुवात झाली. परळी नगरपालिका निवडणुकीच्या माध्यमातून संघर्ष उघड झाला. धनंजय मुंडे यांनी दोन भागांत विभागलेल्या परळीतील एका भागावर लक्ष केंद्रित केले. जुन्या परळीतील मराठा समाजातील दीपक देशमुख, ब्राह्मण समाजातील बाजीराव धर्माधिकारी आणि लिंगायत समाजातील संजीवनी हलगे यांना नेतृत्वाची संधी दिली.

यातून धनंजय मुंडे यांनी जुन्या परळीतील ज्येष्ठांसह तरुण वर्गाचे पाठबळ स्वतकडे वळवले. त्या माध्यमातून इतरही समाजाच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करताना सर्वसामान्यांशी नाळ जोडली जाईल, यावर त्यांनी भर दिला. त्यातून परळीच्या एका भागावर धनंजय मुंडे यांनी पकड निर्माण केली. दरम्यानच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे विधान परिषदेत विरोधी पक्षनेतेपदाची संधी मिळाल्याने त्यांनी आपणच गोपीनाथ मुंडे यांचे वारसदार असल्याचे सिद्ध करण्यासाठी प्रत्येक लहानसहान निवडणुकीत प्रयत्न केल्याचे स्पष्ट होत गेले. काही स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात घेतल्या. राष्ट्रवादीचे नेतृत्व करत असले तरी स्थानिक पातळीवरील नाटय़गृहाचा नामविस्तार करताना त्याला गोपीनाथ मुंडे यांचे नाव देत वंजारी समाजातही जागा निर्माण करण्यासाठी पाऊल टाकले.

पंकजा मुंडे यांनी ग्रामविकास, जलसंधारण मंत्रीपदाच्या माध्यमातून ग्रामपंचायतींना भरघोस निधी दिला. राष्ट्रीय महामार्ग मतदारसंघातून नेण्यासाठी वजन खर्ची केले. सुमारे दोन हजार कोटींच्या आसपास निधी दिल्याचा दावा त्यांचे समर्थक करतात. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर भगवान गडावर भाषण करण्यातून महंतांशी त्यांचा वाद झाला. त्यातून परळीजवळ गोपीनाथगडाची निर्मिती केली. तर आता तीन वर्षांपूर्वी उभारलेला सावरघाट या भगवानबाबा यांच्या जन्मस्थळी सुरू केलेला दसरा मेळावा. हा दसरा मेळावा सुरू करून पंकजा मुंडे यांनी वंजारी समाजाला एका छत्राखाली आणले आहे. यातूनच पंकजा आणि धनंजय मुंडे यांच्यातील राजकारण टोकदार होत गेले आहे. यात समाजाची मते कोण अधिक घेतो, यावरही बरेच अवलंबून आहे.

अस्तित्वाची लढाई : धनंजय मुंडे यांच्यासाठी ही अस्तित्वाची लढाई आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून त्यांची प्रभावी कामगिरी झाली असली तरी परळीत त्यांना विजय मिळविणे आवश्यक आहे. कारण लागोपाठ दुसऱ्यांदा परळीत पराभव झाल्यास त्यंच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकते.

सर्व ताकदीनिशी मैदानात : पंकजा मुंडे यांनी दसऱ्यानिमित्त गडावर आयोजित केलेल्या मेळाव्याला भाजप अध्यक्ष अमित शहा उपस्थित होते. त्यांनी या मेळाव्यात पंकजा यांचे कौतुक केले. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची परळीमध्ये जाहीर सभा होणार आहे. यावरून भाजपने पंकजा मुंडे यांच्या विजयासाठी सर्व ताकद पणाला लावल्याचे स्पष्ट आहे.