जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे आश्वासन

औरंगाबाद : नाशिक जिल्ह्य़ातील पूर्वेकडून जाणारे पाणी मराठवाडय़ाला मिळावे यासाठी लक्ष घातले आहे आणि ते मराठवाडय़ाला कसे देता येईल याबाबत प्रयत्न करत आहोत. त्याचबरोबर कृष्णा-मराठवाडा प्रकल्पासाठी मंजूर करण्यात आलेला सात टीएमसी पाण्यासाठी बोगद्याचे काम प्रगतिपथावर असून त्यालाही निधी दिला जाईल, असे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले. नदीजोड प्रकल्पांतर्गत पाणी देण्यासाठी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी होणे बाकी आहे. ती मिळावी यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

जयंत महोत्सवाच्या कार्यक्रमासाठी ते औरंगाबाद येथे आले होते. दमणगंगा, पिंजाळ हा आंतरराज्यीय सिंचन प्रकल्प तसेच नार-पार-गिरणा, पार-गोदावरी व दमणगंगा-गोदावरी हे नदीजोड प्रकल्प हाती घेताना २५.७ अब्ज घनफुट पाणी मराठवाडय़ाला मिळावे, असा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. पण करार करताना नाशिक जिल्ह्य़ातील सिन्नर तालुक्याला पाणी मिळेल, अशी व्यवस्था केली. पश्चिम वाहिन्यांच्या नद्यांचे पाणी तसेच तापी खोऱ्यातील १०.७६ अब्ज घनफुट पाणी कोकणातून मिळेल असे सांगण्यात आले होते. त्या अनुषंगाने उत्तर महाराष्ट्र जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता व राष्ट्रीय जलविकास अभिकरण यांच्यामध्ये १९ जुलै २०१९ मध्ये करार करण्यात आला होता. त्यात नाशिक जिल्ह्य़ातील सिन्नर तालुक्यास पाणी देण्याचे मान्य करण्यात आले आहे. याबाबतचे आक्षेप मराठवाडय़ातील प्रशासनाने सरकार दरबारी नोंदविलेले आहे. या अनुषंगाने बोलताना ‘नाशिक जिल्ह्य़ातील पूर्वेकडील पाणी मराठवाडय़ास मिळावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही आता लक्ष घातले आहे’ असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. मराठवाडय़ाचे नाव घेत सिन्नर तालुक्याला पाणी देण्याचा घाट घातला जात असल्याबाबत आक्षेप घेतले जात होते. त्यावर जयंत पाटील यांनी सोमवारी भाष्य केले. दमणगंगा-गोदावरी व दमणगंगा-एकदरे-गोदावरी हे नदीजोड प्रकल्प आंतरराज्यीय प्रकल्प आहेत. या प्रस्तावाबाबत  महाराष्ट्र सरकार सकारात्मक आहे. मात्र, गुजरातच्या मुख्यमंत्र्यांची सही होणे बाकी असल्याचे पाटील यांनी सांगितले.

कृष्णा-मराठवाडा प्रकल्पासाठी सात टीएमसी पाणी वापरास परवानगी मिळाली असून त्यातील बोगद्याचे काम प्रगतिपथावर आहे. त्याला अर्थसंकल्पात निधी दिला जाईल, असे संकेतही पाटील यांनी दिले.