जीप इंडिया आपली सात सीटर एसयूव्ही लवकरच लाँच करणार आहे. या एसयूव्हीचे नाव ‘जीप मेरिडियन’ असेल. जीप मेरिडियन ही पूर्णपणे ‘मेड इन इंडिया’ एसयूव्ही असेल. ही एसयूव्ही याआधी अनेक वेळा चाचणीच्या दरम्यान पाहिली गेली आहे. मेरिडियन ही जीपची पहिली सात-सीटर एसयूव्ही असेल. कंपनीने ७० नावांपैकी ‘जीप मेरिडियन’ हे नाव निवडले आहे. जीप मेरिडियन हे नाव भारतातून जाणाऱ्या आणि काही सर्वात सुंदर राज्ये आणि संस्कृतींना जोडणाऱ्या रेषेपासून प्रेरित आहे. जीप मेरिडियनच्या अनोख्या आणि अभिनव पद्धतीने डिझाइन केलेल्या कॅमफ्लाजमध्ये भारताच्या मेरिडियनच्या ७७ अंश मार्गावर येणाऱ्या राज्यांमधील काही सर्वात प्रसिद्ध चिन्हे आणि संस्कृती आहेत. यामध्ये दिल्लीचे प्रसिद्ध इंडिया गेट, राजस्थानचा उंट, मध्य प्रदेशचा वाघ, महाराष्ट्राचा झेंडा, कर्नाटकचा हत्ती, केरळचे नारळाचे झाड इत्यादींचा समावेश आहे. काश्मीर, हिमाचल प्रदेश, राजस्थान, नवी दिल्ली, हरियाणा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, केरळ आणि तामिळनाडूमधून जीप मेरिडियनने प्रवास केला आणि सर्वात कठीण भौगोलिक आव्हाने नेत्रदीपकपणे पार केली आहेत.
जीप इंडियाचे प्रमुख निपुण जे महाजन म्हणाले, “आम्ही काश्मीर ते कन्याकुमारी या आव्हानात्मक प्रवासात एसयूव्ही घेतली आणि भारतातील सर्व प्रकारच्या भूप्रदेशात त्याची चाचणी घेतली. जीप मेरिडियनने चांगले काम केले हे सांगायला आम्हाला अभिमान वाटतो. आज आमच्या ग्राहकांसाठी मेड-इन-इंडिया आणि मेड-फॉर-इंडिया अशी कार आणताना आनंद होत आहे.”
जीप इंडियाने पुष्टी केली आहे की, मेरिडियन एसयूव्ही यावर्षी भारतात लॉन्च केली जाईल. स्टेलेंटिस इंडियाचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक रोलँड बौचारा म्हणाले, “२०२२ आणि त्यानंतरची आमची उत्पादने भारताप्रती आमची बांधिलकी दर्शवत राहतील. आम्ही भारतातील आमची बाजारपेठ मजबूत करण्यासाठी काम करत आहोत.” दुसरीकडे मेरिडियन एसयूव्हीच्या वैशिष्ट्यांबद्दल जीप इंडियाने अद्याप कोणतीही माहिती उघड केलेली नाही. परंतु अनेक अहवालांनुसार, मेरिडियन 2.0-लीटर पेट्रोल इंजिन आणि डिझेल युनिटसह येऊ शकते.