कल्पना करा की तुम्ही मित्रांसोबत सहलीला जाता, रस्त्यावर प्रवास करताना तुम्ही काही अविस्मरणीय क्षण एकत्र घालवता. मात्र सर्व नियोजन यशस्वी होण्यापूर्वीच दुर्दैवाने, जर रस्त्यावर तुम्हाला अडचणीला सामोरे जावे लागले तर…अशीच परिस्थिती तन्मय राजू नावाच्या व्यक्तीसोबत घडली असल्याची माहिती समोर आली आहे. हा व्यक्ती आपल्या मित्रांसोबत कारनं ट्रिपला जाण्याच्या तयारीत होता पण कारनं अचानक त्याचा विश्वासघात केला. नेमकं काय घडलं जाणून घेऊया..
मध्य प्रदेशातील तन्मय राजू नावाच्या व्यक्तीने अलीकडेच त्याचा भयानक अनुभव सोशल मिडियावर शेअर केला आहे. त्याचे दोन मित्र २३ डिसेंबरला त्याला ट्रिपला घेऊन जाण्याकरिता टाटा नेक्सान कारने त्याच्याकडे येत होते. या कारला खरेदी करुन दीड वर्ष झाल्याची माहिती आहे. या कारमधून दोघेही मित्र तन्मय नावाच्या व्यक्तीला प्रयागराज विमानतळावर घेण्यासाठी येत होते. ते मध्य प्रदेशातील सिधी येथून रस्त्याने प्रयागराजला निघाले होते पण अचानक त्यांच्या कारमध्ये काहीतरी बिघाड होऊ लागला. सुरुवातीला त्यांना काहीच समजले नाही, नंतर कारचा एक टायर निघून गेल्याचे त्यांनी पाहिले. त्यांचा व्हील हब तुटला. टाटा नेक्सानचे टायर वेगळे झाल्यानंतर रस्त्यावरून घसरले. सुदैवाने, घटनेनंतर कारमधील दोघेजण सुरक्षित होते.
(हे ही वाचा: पुढील वर्षात ‘या’ ५ स्वस्त कार रस्त्यावरुन धावताना दिसणार नाहीत, कंपनीने केली विक्री बंद, यादीत मारुतीचाही समावेश)
तन्मय राजू यांच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीला त्यांच्या मित्रांना या समस्येबद्दल माहिती नव्हती, परंतु लवकरच त्यांच्या लक्षात आले की कारच्या पुढील बाजूस एक टायर फिरत आहे आणि त्यानंतर त्यांचे वाहन रस्त्यावरून घसरले आणि शेतात पडले. तन्मय राजू माहिती मिळताच प्रयागराजहून कॅबने आपल्या मित्रांकडे गेले. जे एका शेतात थांबले होते. त्यांचे दोन मित्र २८ तासांपासून शेतात अडकले होते आणि शेतात घुसलेल्या कारला बाहेर काढण्यासाठी हाइड्रा क्रेनची आवश्यकता होती. मदतीसाठी त्यांनी टाटा मोटर्सची संपर्क साधला.
टाटा मोटर्सने मदत करण्याचे आव्हान त्यांना दिले आणि टाटा मोटर्सने टो ट्रकसाठी पैसे मागितले. पण त्यानेही काम जमलं नसल्याने प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर त्यांना एक खाजगी टो ट्रक सेवा मिळाली, जी कार रीवा टाटा मोटर्सच्या वर्कशॉपमध्ये घेऊन गेली. ही घटना २८ तासांहून अधिक काळ चालली आणि कारमधील लोकांसाठी पाणी आणि जेवणाची काहीही सोय नव्हती. ते शेतात थंडीत होते त्यामुळे त्यांच्या जीवास धोका होऊ शकत होता. तन्मय राजूने टाटा मोटर्सच्या या वृत्तीवर ट्विट करत नाराजी व्यक्त केली आहे. “या घटनेमुळे जीवास धोका निर्माण होऊ शकत होता. आंशिक बिघाडामुळे झालेल्या या घटनेची संपूर्ण जबाबदारी टाटा मोटर्सने घेतली पाहिजे,” असे राजू यांनी ट्विट केले.
टाटा मोटर्सचे उत्तर
तन्मय राजूने लिहिले की, टाटा मोटर्सने हा मुद्दा गांभीर्याने घ्यावा. अशा अपघातात कुणाला जीव गमवावा लागला असता. तन्मय राजूच्या या ट्विटवर टाटा मोटर्सनेही ट्विट केले असून ते याकडे गांभीर्याने पाहणार असल्याचे लिहिले आहे. तसेच त्यांचा ईमेल आयडी आणि संपर्क क्रमांक देण्याची विनंती केली जेणेकरून आम्ही तुमच्याशी पुढील सहाय्यासाठी संपर्क साधू शकू, असे टाटा मोटर्सनी नमूद केले.