What to Do If Brakes Fail: रस्त्यावर गाडी चालवताना अपघात कधी, कुठे अन् कसा होईल याचा काही नेम नसतो. अनेकदा आपली थोडीशी बेपर्वाई किंवा वाहनातील तांत्रिक बिघाड यांमुळे क्षणात जीवावर बेतणारी दुर्घटना घडते. त्यातही जर गाडीचे ब्रेक फेल झाले, तर त्यामुळे स्वाभाविकत:च चालकाचा जीव भीतीने कासावीस होतो आणि त्यामुळे बहुतांश वेळी मोठा अपघात घडतो. पण, तुम्हाला माहीत आहे का की, खरं तर ब्रेक फेल झाल्यानंतर न घाबरता, स्वत:वर संयम ठेवून वागणं जास्त आवश्यक असतं. हीच बाब लक्षात घेऊन अशा प्रसंगी करावयाच्या काही सोप्या; पण अत्यंत महत्त्वाच्या ट्रिक्स लक्षात ठेवल्या, तर जीवघेणा प्रसंग टाळता येऊ शकतो.

ब्रेक फेल झाल्यानंतरच्या आपत्कालीन परिस्थितीत करावयाच्या उपायासंदर्भातील महत्त्वाची माहिती चंद्रपूर आरटीओ ऑफिसचे सहायक निरीक्षक शिवाजी विभुते यांनी एका व्हायरल व्हिडीओद्वारे दिली आहे. त्यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या या व्हिडीओनं हजारो लोकांचे लक्ष वेधलं असून, या व्हिडीओवर वाहनचालकांनी अक्षरशः कौतुकाचा वर्षाव केला आहे.

गाडी चालवत असताना अचानक ब्रेक फेल झाले तर? क्षणात जीव धोक्यात येऊ शकतो… मग अशा प्रसंगी अपघात होईल की तुम्ही सुरक्षित बाहेर पडू शकाल यावर सगळं काही अवलंबून असतं. अशा वेळी नेमकं काय करावं हे अगदी कमी लोकांना माहीत असतं. पण, एका आरटीओ अधिकाऱ्यानं असा भन्नाट उपाय सांगितलाय की, तो ऐकल्यानंतर तुम्हीही म्हणाल – “हे तर खरंच जीव वाचवणारं गुपित आहे.”

ब्रेक फेल झाल्यानंतर नक्की काय कराल?

आरटीओ अधिकारी विभुते या व्हिडीओमध्ये सांगतात की – सर्वांत आधी घाबरायचं नाही आणि गाडी बंद करायची नाही. लगेच गाडीचं हॅजार्ड बटण सुरू करा, जेणेकरून इतर वाहनचालकांना धोका ओळखता येईल. गाडीचं हॅजार्ड बटण हे एक सुरक्षा फीचर आहे, जे दाबल्यावर गाडीचे सर्व इंडिकेटर दिवे एकाच वेळी चालू-बंद होत राहतात. या फीचरचा उपयोग आपत्कालीन परिस्थितीत, जसे की गाडीमध्ये बिघाड झाल्यास किंवा रस्त्यावर थांबण्याची गरज असल्यास, इतर वाहनचालकांना धोक्याची सूचना देण्यासाठी होतो.

वाहन लगेच सुरक्षित जागेकडे वळवा. नंतर गाडी हळूहळू लोअर गिअरमध्ये शिफ्ट करा – चौथ्या गिअरवर असाल, तर तिसऱ्या, मग दुसऱ्या आणि शेवटी पहिल्या गिअरवर. स्पीड कमी झाल्यानंतरच हँडब्रेक वापरा; पण तोही सरळ ओढू नका. अप-डाउन, अप-डाउन असा हळूहळू हँडब्रेक ऑपरेट करा. त्यामुळे गाडीचा वेग कमी होत जाऊन, गाडी सुरक्षितरीत्या थांबेल.

या व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना एका युजरने लिहिलं- “साहेब, तुमच्यामुळे खूप काही शिकायला मिळालं, मनापासून धन्यवाद.” तर दुसऱ्या एका युजरनं म्हटलं – “पहिल्यांदा योग्य ठिकाणी योग्य व्यक्ती निवडली गेली आहे. अशा अधिकाऱ्यांची खरंच गरज आहे.”

अनेक युजर्सनी हा व्हिडीओ शेअर करताना, “हा RTO अधिकारी ड्रायव्हर लोकांसाठी प्रत्यक्षात उपयोगी माहिती देतोय, हे महाराष्ट्रातलं पहिलं उदाहरण आहे”, असं मत नोंदवलं आहे.

रोज गाडी चालवणाऱ्या प्रत्येकानं ही ट्रिक लक्षात ठेवणं आवश्यक आहे. कारण- अपघाताची वेळ सांगून येत नाही. क्षणभरात जीवावर बेतू शकणाऱ्या परिस्थितीत RTO अधिकाऱ्यानं सांगितलेली ही पद्धत लक्षात ठेवली, तर तुम्ही स्वतःचा आणि इतरांचा जीव वाचवू शकता.

येथे पाहा व्हिडीओ


अजूनही व्हिडीओ पाहिला नसेल, तर नक्की पाहा – कदाचित उद्या याच ट्रिकमुळे तुमचा जीव वाचेल!