काही देशांमध्ये ड्रायव्हिंग उजवीकडे तर काही देशांमध्ये डाव्या बाजूला का असतं?; तुम्ही केलाय का कधी विचार?

आजच्या २१ व्या शतकातील या फरकाचा संबंध तलवारीशी आहे असं सांगितल्यास तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल, नाही का?

why some countries drive on the right and some on the left
अनेक देशांमध्ये यासंदर्भात वेगवेगळे नियम आहेत (मूळ फोटो रॉयटर्सवरुन साभार)

जगभरामधील वेगवगेळ्या देशांचे वाहतुकीसंदर्भात वेगवेगळे नियम आहेत. अर्थात त्या त्या देशांमधील लोकांना तेथील नियमांची सवय झालेली असते. मात्र परदेशामध्ये गेल्यानंतर अनेकांना हे नियम थोडे गोंधळात टाकतात किंवा ते समजून घेण्यासाठी बराच वेळ जावा लागतो. असाच एक सर्वाधिक परिणाम करणारा नियम म्हणजे गाडी कोणत्या बाजूने चालवायची. जगातील अनेक देशांमध्ये गाड्या डाव्या बाजूने चालवतात तर काही देशांमध्ये गाड्या उजव्या बाजूने चालवण्याचा नियम आहे. मात्र असं का आणि याचा काय परिणाम होतो हे तुम्हाला माहितीय का?, त्याचबद्दल आपण या लेखातून जाणून घेऊयात…

वर्ल्ड स्टॅण्डर्ड्स वेबसाइटनुसार जगातील ३५ टक्के लोकसंख्या असणाऱ्या देशांमध्ये डाव्या बाजूने गाड्या चालवल्या जातात. यापैकी अनेक देश हे असे देश आहेत ज्यांच्यावर पूर्वी ब्रिटीशांनी राज्य केलं होतं, जिथे ब्रिटीशांची सत्ता होती. ब्रिटीश काळामध्ये गाड्या डाव्या बाजूने चालवण्याची पद्धत होती. बरं हे असं का असा प्रश्न पडला असेल तर त्याची कारणंही भन्नाट होती. यावरच नजर टाकूयात…

नक्की पाहा हे फोटो >> उदयनराजे भोसलेंनी घेतली नवी BMW, गाडीचा नंबरही आहे खास; जाणून घ्या किती आहे किंमत

पहिलं कारण…
पूर्वीच्या काळी जेव्हा राजे-राजवाड्यांची प्रथा होती तेव्हा तलवारबाजी करणारे रस्त्याच्या डाव्या बाजूने चालायचे. तलवार कंबरेवर लावता ती ज्या हाताने काढणार किंवा वापरणार त्याच्या उलट बाजूला लावली जाते. त्यामुळेच बरेच तलावरबाज हे उजव्या हाताने तलवारीचा वापर करायचे म्हणून ते डाव्या बाजूने तलवार ठेवायचे. डावीकडे लावलेली तलवार उजव्या हाताने म्यानामधून काढणं अधिक सोयीस्कर असायचं. वापरत्या हाताला सोयीचं पडेल अशा हिशोबाने हत्यार ठेवल्याने आपत्कालीन परिस्थितीमध्ये त्यांना लगेच प्रतिकार करणं शक्य व्हायचं. ते जर उजव्या बाजूने चालत असते आणि उजवीकडे तलवार लावली असती तर उजव्या बाजूची तलवार उजव्या हाताने काढून लढाईसाठी किंवा अचानक झालेलं आक्रमण परतवून लावण्यासाठी सज्ज होण्यास अधिक वेळ गेला असता.

नक्की वाचा >> पेट्रोलियम मंत्री सामान्य नागरिकप्रमाणे इंधन भरण्यासाठी पंपावर गेले; मात्र तिथे असं काही दिसलं की पेट्रोल पंपच सील करुन आले

दुसरं कारण…
आणखीन एक कारण म्हणजे पूर्वी घोडेस्वारही घोड्यावर डाव्या बाजूने स्वार व्हायचे. कारण त्यांच्या कंबरेला डाव्या बाजूला तलवार लटकलेली असल्याने त्यांना अशापद्धतीने घोड्यावर स्वार होतं सोयीस्कर ठरायचं. डावीकडे तलवार आणि उजवीकडून घोड्यावर चढण्याचा प्रयत्न करणे फार कठीण असतं. तसेच अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे राणी एलिझाबेथच्या काळात ब्रिटनच्या राजघराण्यामधील लोकही डाव्या बाजूनेच चालायचे. सर्वसामान्य लोक उजव्या बाजूचा वापर करायचे. त्यावेळी गाड्या ही गरज नव्हती तर श्रीमंतीचं लक्षण होतं. त्यामुळे आताच्या तुलनेत मोजक्या लोकांकडे गाड्या होत्या. याच कारणामुळेच गाड्या डाव्या बाजूने चालवण्याचा नियम बनवण्यात आला.

नक्की पाहा हा व्हिडीओ >> Video: उभंही राहता येणार नाही एवढ्याशा जागेतून गाडी बाहेर काढली; व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल, ‘ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट’

उजवीकडून चालवण्यास सुरुवात कधी आणि कशी….
मात्र उजवीकडून गाडी चालवण्याची पद्धत राणी एलिझाबेथ आणि राजघरण्याच्या नियम मोडण्यात आल्यानंतर सुरु झालं. १७८९ मध्ये फ्रेंच राज्यक्रांतीच्या वेळेस सर्वसामान्यांनाही सत्ताधाऱ्यांप्रमाणे हक्क मिळू लागले तेव्हा राजघराण्यातील लोकांनाही उजवीकडून चालण्याचे नियम करण्यात आले. कोणी डाव्या बाजूने चालल्यास त्याला राजघराण्यातील व्यक्ती किंवा श्रीमंत समजलं जायचं आणि लोक त्याच्यावर हल्ला करायचे. त्यामुळेच या रोषाचा सामना करावा लागू नये म्हणून अनेक श्रीमंत लोक त्यावेळी उजव्या बाजूने चालू लागले. त्यानंतर अनेक देशांनी गाड्यांच्या मूळ रचनेमध्ये सोयीनुसार बदल करुन घेत उजव्या किंवा डाव्या बाजूला स्टेअरिंग ठेवण्यास सुरुवात केली. म्हणूनच आज काही देशांमध्ये रस्त्याच्या उजव्या किंवा डाव्या बाजूने गाडी चालवण्याच्या नियमांबरोबरच गाडीचं स्टेअरिंग कोणत्या बाजूला असणार यामध्येही फरक दिसून येतो.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Why some countries drive on the right and some on the left scsg