घराकडून स्टेशनला जाताना माझ्या वाटेत दोन झाडं माझा नेहमी खोळंबा करतात. येणाऱ्या पाहुण्याच्या स्वागतासाठी आपण जसे सुसज्ज उभे राहतो, अगदी तसंच ही झाडं आपल्या सुंदर आणि सुगंधी फुलांची पखरण करून जणू माझीच वाट पाहत असतात असं वाटतं. याची सफेद रंगाची सुंदर छोटी छोटी सुगंधी फुलं माझी ऑल टाइम फेवरेट. मी सांगतोय ते बकुळीच्या फुलांविषयी.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बकुळ हे भारतीय वंशाची वृक्षवर्गातील सदाहरित वनस्पती. साधारण उंची १२ -१५ मीटर ट्रे४२स्र्२ी’ील्लॠ्र (मिमूसोप्स इलेन्गी) हे त्याचं शास्त्रीय नाव. याच्या भारदस्त आणि गच्च पर्णसंभारामुळे हे झाड खूप सुंदर दिसतं.

बकुळीच्या झाडाला वर्षभर फुलं येतात. परंतु पावसाळ्यात विशेष बहर दिसतो. फुलं आकाराने लहान- म्हणजे शर्टाच्या बटाणाएवढी. रंग सफेद. हलकीशी पिवळी झाक असणारी. पाकळ्यांची रचना चांदणीसारखी. इतकी सुंदर, की टक लावून पाहत बसावं. आणि याचा सुगंध तर केवळ अप्रतिम. याच्या फुलांचं वैशिष्टय़ म्हणजे ती झाडावरून गळून पडतात आणि देठ झाडावर तसाच राहतो. फक्त पाकळ्यांचा भाग गळून पडतो. यांचा रंग आधी सफेद असतो आणि नंतर जशी सुकत जातील तसा चॉकलेटी होत जातो. पण फुलं सुकली तरी सुगंध बरेच दिवस कायम राहतो. फक्त पाकळ्यांचा भाग गळून पडत असल्याने याला नैसर्गिकरीत्याच एक छिद्र असतं. या छिद्रात सहज दोरा ओवता येतो आणि बकुळाचे गजरे तयार करता येतात. या गजऱ्यांना बाजारात खूप मागणी आहे. सुगंधी असणारी फुलं अत्तर बनविण्यासाठी तसंच पुष्पौषधीमध्ये- देखील वापरली जातात. बकुळीची फुलं झाडावर पाहायला मिळणं थोडं कठीणच. कारण ती गळून पडतात. रात्री किंवा पहाटे झाडाखाली गेलात तर फुलांचा सडा पडलेला असतो आणि वातावरणात सुगंध भरभरून राहिलेला असतो. बुद्धिवर्धक औषधांमध्ये या फुलांचा वापर केला जातो.

बकुळीची फुलं गळून पडली की याला फळं येतात. लहान लहान चिकूसारखी दिसणारी  ही फळं चवीला गोड असतात. याची साल जाड असते. ती थोडी कडवट लागते. त्यामुळे साल काढून खाणं उत्तम. फळं आधी हिरवी आणि पक्व झाली की भगव्या रंगाची होतात. कच्ची फळं तुरट, तर पिकली की गोड लागतात. पक्षीदेखील आवडीने ही फळं खातात. फळाच्या आत एक किंवा दोन बिया असतात. नवीन रोपांची निर्मिती याच बियांपासून केली जाते. बिया अगदी सहज रुजतात.

भारतीय आयुर्वेदात पूर्वापार काळापासून बकुळाचा वापर होत आलाय. असंख्य औषधी गुणधर्म असणारा, सुंदर सुगंधी आणि मनमोहक फुलं असणारा हा बकुळ वृक्ष आपल्याही सोसायटी, शाळा परिसराची नक्कीच शोभा वाढवेल यात काही शंका नाहीच.

bharatgodambe@gmail.com

मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article on bakula flower
First published on: 18-06-2017 at 02:39 IST