-डॉ. मीरा कुलकर्णी

रोहनला आज सकाळपासूनच थोडा ताप होता. सर्दीने तर अगदी बेजार झाला होता. शिंका, डोळयातून पाणी असं सारंच एकदम होत होतं. साहजिकच शाळेला सुट्टी म्हणून थोडा आनंदही होता. आईने बिछान्यावर दामटून झोपवलं ते त्याला बिलकूल आवडलं नव्हतं. आई मोबाइलवर गेम खेळू देईल असं वाटलं होतं, पण त्यालाही आईने नकार दिला.

‘‘आई, मी डोळे मिटून काय करू? मला खूप कंटाळा आलाय.’’ गादीवर पाय आपटत रोहन कुरकुरला.
‘‘हे बघ, मी तुला एक गमतीदार खेळ सांगते आणि जरा बाहेर जाऊन येते. डोळे बंद करून आता जसा झोपला आहेस तसंच राहायचं. फक्त तुला काय काय ऐकू येतं याकडे नीट लक्ष द्यायचं. तू ऐकलेल्या आवाजावरून तुला काय काय समजलं ते मला आल्यावर सांगायचं.’’

हेही वाचा…बालमैफल : मांजरीचं प्रेम..

‘बरं’ म्हणत रोहन नीट ऐकू लागला. सगळयात पहिल्यांदा जिन्यावरून उतरणाऱ्या आईच्या पावलांचा आवाज हळूहळू दूर गेला. मग खालचं गेट वाजलं. परत कडी लावल्याचा आवाज आला. आई गेट बंद करून गेली असेल. रोहन आता आवाजाचे अर्थ लावू लागला. इतक्यात कुकरच्या शिट्टया ऐकू येऊ लागल्या. शेजारून येताहेत म्हणजे मनीषाकडच्या असाव्यात. नंतर दूरचा एक अस्पष्ट येणारा आवाज त्याने लक्ष देऊन ऐकला. तो माणूस शंभरला तीन असं म्हणत होता. म्हणजे कॉलनीबाहेरच्या रस्त्यावर हा माणूस फळं विकत असणार. नंतर एक स्कूटर बराच वेळ सुरू होत नव्हती. कोणत्या काकांची असेल बरं? इतक्यात आवाज आला, ‘‘बाबा, मी सोडतो तुम्हाला माझ्या स्कूटीवरून.’’ हा तर मनीष दादाचा आवाज. म्हणजे ही स्कूटर होती काळे आजोबांची. जुनी झाली ती आता. इतक्यात शेजारच्या झाडावरून कावळे ओरडायला लागले. ‘‘अरे! तीन वेगवेगळे आवाज येताहेत की! एक आवाज एकदम बसका होता. एक आवाज कदाचित छोटया कावळयाचा असावा. रोहनने अंदाज केला. काय बोलत असतील? त्या छोटया कावळयाची आईपण त्याला काही समजावत असेल का? त्यांची भाषा कळली असती तर किती मजा आली असती.’’ इतक्यात जिन्यावरून बॉलचे टप्पे ऐकू आले आणि नंतर कोणीतरी जिन्यावरून पळत खाली गेलं. वरचा मोंटू असावा. म्हणजे हापण आज शाळेत गेला नाही.

इतक्यात चपलांचा आवाज हळूहळू जवळ आला. दारापाशी थांबला. ‘‘आई आली.’’ रोहन ओरडला. आईने लॅच उघडायच्या आधीच त्याला आई आल्याचे कळले होते. आई आत आली. रोहन एकदम खुशीत म्हणाला, ‘‘आई, हा खेळ मस्त आहे गं. मला इथे झोपून आजूबाजूच्या कित्ती गोष्टी कळल्या.’’ आई पाणी पीत त्याच्या जवळ बसली. रोहनने तिला सगळी गंमत सांगितली आणि म्हणाला, ‘‘आई, रोजच असे काही काही आवाज येत असतील ना? मी तर कधीच असं लक्ष देऊन ऐकत नव्हतो.’’

‘‘अरे, म्हणून तर मोठी माणसं सांगतात ना नीट कान देऊन ऐक म्हणून.’’ आई पुढे सांगू लागली.

हेही वाचा…बालमैफल : पतंगांचे ते दिवस..

‘‘कान, नाक, डोळे अशी ही सगळी ज्ञानेंद्रियं आपल्या मेंदूच्या खिडक्या-दारे असतात. यातून माहिती मेंदूत जाते आणि मेंदूचे वेगवेगळे भाग ती समजून घेतात. चेहऱ्याच्या बाजूचे दोन्ही कान केवळ आवाजाच्या लहरी आत पाठवण्याचं काम करतात. खरं ऐकण्याचे काम मेंदूच करतो.

‘‘म्हणजे कसं गं आई?’’

‘‘ऐक, कानात शिरणाऱ्या आवाजाच्या लहरी एका चिंचोळया भागातून आत जातात. त्याच्या टोकाला एक पडदा घट्ट ताणलेला असतो. हा कानाचा अत्यंत नाजूक भाग. काडी, पिन अशा टोकदार वस्तू कानात घातल्या तर हा फाटू शकतो. आवाजाच्या लहरींमुळे हा पडदा कंप पावतो. पडद्याला जोडून असलेल्या कानाच्या भागात तीन इटुकली हाडे असतात. ती पडद्याची हालचाल अनेक पटींनी वाढवत कानाच्या मधल्या भागात पोचवतात. तिथल्या अंडाकृती खिडकीतून ही आवाजाची कंपनं द्रवाने भरलेल्या कानाच्या सगळयात आतल्या भागात जातात. इथल्या काही विशेष पेशी या कंपनांचे विद्युत संदेशात रूपांतर करतात. हे विद्युत संदेश नसेतून मेंदूपर्यंत पोचतात. दोन्ही कानांकडून आलेल्या संदेशांवरून कोणत्या प्रकारचा आवाज आहे हे मेंदू आपल्याला सांगतो. म्हणजे आपण कानाने ऐकतो, पण मेंदू मध्ये ते साठवलं जातं.’’

‘‘आई, म्हणजे आत्ता मी तुझं बोलणं ऐकतो आहे तेव्हा हे सगळं माझ्या आत घडतं आहे, हो ना?’’

हेही वाचा…बालमैफल : आनंद तेवढा भरून घेऊ!

‘‘हो अरे. आपण इतरांशी बोलताना त्या संभाषणात ऐकणंदेखील तितकंच महत्त्वाचं असतं. आपण आपल्या ऐकण्याच्या शक्तीचा पूर्ण उपयोगच करत नाही. दृष्टीबाधित लोक नुसता पावलांचा आवाज ऐकून कोण आलं आहे ते ओळखतात.’’

इतक्यात स्वयंपाकघरातून ताटली पडल्याचा आवाज आला आणि आई लगबगीने उठून तिकडे गेली. रोहन मात्र आजूबाजूचे आवाज नव्या उत्साहाने लक्ष देऊन ऐकू लागला.

drmeerakulkarni@gmail.com