बाजारात आंबे दिसायला लागल्यापासून संजीवचा आंबे विकत घेण्यासाठी धोशा सुरू झाला. पण बाबांना माहीत होतं की कधी आंबे विकत घ्यायचे व कोणाकडून घ्यायचे ते. त्यामुळे ते संजीवची समजूत घालायचे. त्याला खाण्यासाठी दुसरी फळं आणून द्यायचे. परीक्षा संपल्या आणि संजीवची सुट्टी सुरू झाली. भरपूर खेळायचं आणि आईनं केलेलं पन्ह, लिंबू सरबत, कोकम सरबत अशी वेगवेगळी सरबतं प्यायची. त्यामुळे त्याला आंब्यांची आठवण मागे सरली. अचानक एक दिवस संध्याकाळी बाबा दोन पेट्या आंबे घेऊन आले. संजीवचा आनंद गगनात मावेनासा झाला. बाबांनी पेट्या ठेवताच त्यानं भराभरा उघडल्या. आंबे मोजले आणि म्हणाला, ‘‘आई, एका पेटीत २४ आंबे आहेत. मला व दादाला एक पेटी. तुला, बाबांना व घरी येणाऱ्या पाहुण्यांसाठी एक… मी माझे आंबे काढून ठेवू का?’’

‘‘अरे संजीव, आंबे सगळ्यांसाठी आहेत. आमरस केला की तो सगळेच खाता की नाही. मग जसे आंबे पिकत जातील तसे आपण सगळे खाऊ. तुला हवं त्यावेळी तू खा.’’
‘‘बरं,’’ असं म्हणत एक छान पिकलेला आंबा संजीवने उचलला व धुऊन मजेत खाऊन टाकला. स्वत: खाल्लेल्या गोष्टींचा कचरा स्वत: उचलून फेकायचा या घरच्या नियमानुसार त्यानं आंब्याच्या साली व कोय फेकण्यासाठी उचलली. तेवढ्यात दादा क्लासवरून घरी आला. त्यानं संजीवला आंब्याच्या साली व कोय फेकायला जाताना पाहिलं. तो म्हणाला, ‘‘संजीव, सालं फक्त टाक, कोय टाकू नकोस.’’

हेही वाचा…बालमैफल : भाषा… आपलं अस्तित्व

हे ऐकून गोंधळलेला संजीव म्हणाला, ‘‘दादा, हे बघ. मी चाटूनपुसून कोय साफ केली आहे. आता खाण्यासारखं काही नाही रे.’’
‘‘अरे माहीत आहे मला. मला ती कोय हवी आहे.’’

आता संजीवचे कान आणि डोळे टवकारले. आंब्याच्या ऐवजी दादा चाटून साफ केलेली कोय पाहिजे म्हणतो आहे. काय गौडबंगाल असावं बरं? दादानं सांगितल्याप्रमाणे संजीवनं सालं कचऱ्याच्या डब्यात टाकली व कोय प्लेटमध्ये तशीच ठेवून तो दादा फ्रेश होऊन यायची वाट बघत थांबून राहिला. थोड्या वेळात दादा फ्रेश होऊन आला. प्लेटमधली कोय त्यानं स्वच्छ धुतली व वाळण्यासाठी दुसऱ्या प्लेटमध्ये घालून खिडकीजवळ उन्हात ठेवून दिली. दादाच्या मागेमागे जात संजीव सगळं बघत होता. त्याला अनेक प्रश्न पडले होते. दादा शांतपणे सोफ्यावर बसताच संजीवनं प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. दादा म्हणाला, ‘‘संजू, किती प्रश्न रे… सांगतो तुला. मी काल यू ट्यूबवर एक व्हिडीओ पाहिला. त्या यू ट्यूबरला एक करोड झाडं लावायची आहेत आणि तीही आंबा, फणस अशी मोठमोठी. एवढी झाडं लावायची तर त्याला बिया हव्यात. म्हणून त्यानं आपल्या चाहत्यांना आवाहन केलं की, तुम्ही आंबा खाल्ल्यानंतर कोयी कचऱ्याच्या डब्यात न टाकता सुकवून माझ्याकडे द्या.’’

‘‘ दादा, पण त्यात आपला काय फायदा?’’
‘‘अरे, तो झाडं फक्त स्वत:साठी लावत नाहीए, सगळ्यांसाठी लावणार आहे. बरं तो झाडं एकाटाही लावणार नाहीए. त्याची मित्रमंडळी, चाहते असे सगळे मिळून लावणार. ही लावलेली झाडं मोठी झाली की आपल्याला छान सावली देणार, आंबे देणार, वातावरणातला कार्बनडाय ऑक्साइड शोषून घेणार. आज जागतिक तापमानवाढीमुळे होणारे दुष्परिणाम आपण अनुभवतो आहोत ना. यावर्षीचा उन्हाळा किती भयंकर आहे. हवामानातले होणारे बदल जर थांबवायचे असतील तर आपल्याला जागतिक पातळीवर तापमानवाढ थांबवावी लागेल. त्यासाठी भरपूर झाडं लावावी लागतील. आपल्याला जर अशी झाडं लावणं शक्य नसेल तर जे लावत आहेत त्यांना आपण मदत करू शकतो ना.’’

हेही वाचा…बालमैफल : मराठमोळा वाढदिवस

‘‘हो रे दादा. भूगोलाच्या बाईंनी बदलत जाणाऱ्या हवामानाविषयी आम्हाला सांगितलं होतं. मलाही आता मदत करायची आहे. तू नको टेन्शन घेऊस. घरात जेवढे आंबे आपण खाऊ त्या तर कोयी तुला मी सुकवून देईनच, त्याबरोबरच आपल्या सोसायटीत जेवढे लोक आंबे खातात त्यांच्याकडून रोज कोयी गोळा करून त्याही छान सुकवून तुला देईन. मग तू त्या सगळ्या आरामात पाठवं.’’

हेही वाचा…बालमैफल : नावात काय आहे

संजीवचं हे गोड आश्वासन ऐकून दादा भारावला. त्यानं लगेच त्याचा गालगुच्च्या घेऊन एक मस्त सेल्फी काढला व लगेच समाजमाध्यमावर पोस्ट करत मेसेज टाकला, ‘‘वृक्षवल्ली आम्हां सोयरे मोहिमेत आम्हीही सहभागी.’’

mukatkar@gmail. com