scorecardresearch

बालमैफल: चला, स्वयंपाक करू या

झाडांच्या पानांना छोटेसे दरवाजे असतात. त्यांना स्टोमॅटा किंवा पर्णरंध्र असं म्हणतात. ते दरवाजे उघडले की कार्बन डायऑक्साइड स्वयंपाकघरात शिरतो.

Balmaifalya photosynthesis story
बालमैफल: चला, स्वयंपाक करू या (छायाचित्र- लोकसत्ता टीम)

डॉ. स्वरूपा भागवत

‘‘ऊठ रे अर्णव. काल म्हणाला होतास ना, मला उगवणारा सूर्य बघायचा आहे. चल ऊठ बरं. झाली वेळ सूर्योदयाची.’’

Sore Throat Swelling Irritation While Eating Drink and Gargle With Warm Water Tulsi Haldi Namak And Trifala Check Amazing Use
Sore Throat: घसा खवखवतोय, गिळताना टोचल्यासारखं वाटतंय? गरम पाण्यात हे पदार्थ घालून करा गुळण्या
Terrace Garden, plants, trees, decorations, chandeliers
गच्चीवरची बाग : लोभस, सुंदर हिरवे झुंबर
best picture with supercar man wins heart of social media people watch viral video
याला म्हणतात पाय जमिनीवर असणे! करोडोंची कार रस्त्यात थांबली अन् काकांची फोटोची हौस केली पूर्ण
Avoid Eating These Foods with Eggs
अंड्यांसोबत ‘हे’ पाच पदार्थ चुकूनही खाऊ नका; नाहीतर आरोग्यावर होणार गंभीर परिणाम

‘‘हो ग आई, उठतो. पाच मिनिटं थांब,’’ असं म्हणून अर्णव पांघरूण ओढून पुन्हा झोपी गेला.

‘‘वाटलंच होतं. रात्री लवकर झोपायचं नाही. मग कसं उठावंसं वाटणार सकाळी? नाटकं नुसती.’’ आई आपल्या कामाला निघून गेली. आता अर्णव स्वप्नात एका बागेत गेला होता. हिरवीगार झाडं, मऊ-मऊ गवत. बाग खूप शांत होती. अर्णव एका झाडाजवळ गेला. तिथे त्याला कुणाच्या तरी बोलण्याचा आवाज आला.

‘‘हे पाहा, आलो मी. आता लागू या का कामाला?’’ रविकिरण धापा टाकत म्हणाला. त्यावर कर्बद्विप्रणिल म्हणाला, ‘‘काय रे, किती वेळ वाट बघायची तुझी? दररोज कसा उशीर होतो तुला यायला?’’

‘‘असं काय रे म्हणतोस कर्बद्विप्रणिल? किती लांबून येतो हा रविकिरण माहीत नाही का तुला? तब्बल साडेआठ मिनिटं लागतात त्याला आणि तू हवेमध्ये नुसता फिरत असतोस ते? आणि त्यात एवढं अवघड नाव आहे तुझं. हाक मारून बोलवायचं म्हटलं तरी कंटाळा येतो.’’ सलिल चिडवत म्हणाला.

‘‘तू काय रे बाबा सलिल, नेहमी सगळय़ांना हवासा वाटतोस. मी तेवढा नको असतो कोणाला. म्हणून सगळे जण मला बाहेर सोडून देतात. मग मी फिरत राहतो इकडे-तिकडे.’’ कर्बद्विप्रणिलला रडायला येत होतं.

त्यावर हरितकण म्हणाला, ‘‘आता तुमचं भांडण थांबवा बरं. सगळय़ांना खूप भूक लागलीय. कधी जेवायला मिळेल म्हणून थांबलेत ते. मग चला तर स्वयंपाक करू या! रविकिरण, तू तुझी सगळी शक्ती घेऊन माझ्या घरात प्रवेश कर. कर्बद्विप्रणिल, तुला थेट येता येणार नाही. मी दरवाजा उघडतो. त्यातून तू आत ये आणि हा सलिल तर आधीच चढत आला आहे माझ्या घरी.’’ आता ते चौघेही हरितकणाच्या इवल्याशा घरात होते. हरितकणाला एक कल्पना सुचली.

‘‘कर्बद्विप्रणिल, तू आणि सलिल एकमेकांना मिठी मारा आणि भांडणे विसरून जा बरं. मग बघा कशी गंमत होते ते. हरितकणाला रविकिरणांची सगळी शक्ती मिळाली आणि सलिल- कर्बद्विप्रणिल आपले भांडण विसरून हसू-खेळू लागले. मग काय गंमतच झाली. सलिल आणि कर्बद्विप्रणिल कुठे गेले होते बरं?’’ त्यांच्या जागी तिथे दुसरेच कोणी तरी होते. आता झाडातून टाळय़ा वाजवण्याचा आवाज ऐकू येऊ लागला आणि अर्णवला जाग आली.

‘‘आई, आई.’’ तो हाका मारू लागला.

हेही वाचा… बालमैफल: लक्षिमी घरा आली..

‘‘उठलास का? सूर्योदय तर केव्हाच होऊन गेला. आता थोडय़ा वेळाने शाळेसाठीच ऊठ.’’

‘‘नाही ग आई, मला आता एक स्वप्न पडलं होतं. त्या स्वप्नात जे लोक होते ना ते माझ्या ओळखीचे आहेत असं वाटतंय, पण आठवत नाहीये.’’ अर्णव विचार करायला लागला.

मग अर्णवनं सगळं स्वप्न आईला सांगितलं तेव्हा आई हसून म्हणाली, ‘‘सोप्पंय. आधी तुझ्या स्वप्नात कोणकोण मंडळी आली होती ते पाहू या. तू मला सांग. ‘रवि’ या शब्दाचा अर्थ काय होतो?’’

‘‘आई, रवि म्हणजे सूर्य ना?’’

‘‘मग रविकिरण म्हणजे..?’’

‘‘सूर्याचा किरण!’’

‘‘बरोबर. सूर्यकिरण किंवा आपण म्हणू सूर्यप्रकाश. आता सांग. ‘पाणी’ असा अर्थ असलेले दुसरे कोणते शब्द तुला माहीत आहेत?’’

‘‘जल, तोय..’’अर्णव विचार करू लागला.

‘‘सापडलं ! सलिल ! तोही होता माझ्या स्वप्नातल्या गोष्टीत.’’

‘‘छान! मजा येतेय ना तुला? आता हरित म्हणजे हिरवा रंग. सगळी झाडे, गवत आपल्याला हिरवे का दिसतात बरं?’’

‘‘आई, ते तर आम्ही आधीच शिकलंय शाळेत. झाडांच्या पानांत क्लोरोफिल असतं ते हिरव्या रंगाचं असतं. म्हणून झाडं छान हिरवी-हिरवी दिसतात.’’

‘‘आणि तोच आपल्या गोष्टीतला हरितकण.’’

‘‘किती मस्त!’’ अर्णवला आता खूप मजा येत होती.

‘‘पण आई, ते चौथं नाव खूप अवघड होतं. कर्ब..द्वि द्वि.. प्रणिल असं काही तरी.’’ तो अडखळत म्हणाला.

‘‘बरोब्बर! छान लक्षात ठेवलयस की तू नाव. आता ते नाव कसं तयार झालं ते पाहू. कर्ब म्हणजे कार्बन. द्वि म्हणजे दोन. प्रणिल म्हणजे प्राणवायू- ऑक्सिजन! म्हणजे काय असेल ते?’’

‘‘कार्बन डायऑक्साइड!’’

‘‘अगदी बरोबर! मग आता सांग ही चारही मंडळी कशासाठी एकत्र जमली असतील?’’

‘‘आई, कळलं! ‘फोटोसिंथेसिस’साठी ! म्हणजे अन्न तयार करण्यासाठी ना?’’

‘‘हो तर. हरितकण म्हणाला ना – ‘चला स्वयंपाक करू या.’ तेच. फोटोसिंथेसिसला मराठीत ‘प्रकाशसंश्लेषण’ असं म्हणतात. त्यामुळे सगळय़ा सजीवांचे पोषण होते.’’

‘‘पण आई, कार्बन डायऑक्साइड इतका का चिडला होता?’’

‘‘सूर्य उगवल्यावर सूर्याच्या किरणाला पृथ्वीवर पोहोचायला आठ मिनिटे वीस सेकंद लागतात. आणि सूर्यप्रकाश असल्याशिवाय त्यांचा स्वयंपाक कसा होईल म्हणून सगळे त्याची वाट पाहत होते. कार्बन डायऑक्साइड कसा तयार होतो माहीत आहे का तुला?’’

‘‘आपण श्वास घेतो तेव्हा ना?’’

‘‘हो सगळे सजीव जेव्हा श्वास घेतात तेव्हा ते ऑक्सिजन आत घेऊन कार्बन डायऑक्साइड बाहेर टाकतात.’’

‘‘हं! म्हणून कार्बन डायऑक्साइडला वाटलं तो कुणाला आवडत नाही; पण त्याला हे समजत नाही की तो नसेल तर अन्न कसं तयार होईल?’’

‘‘बरोबर बाळा. आता सांग, ते हे अन्न कुठे तयार करतात?’’

‘‘क्लोरोफिलमध्ये ना?’’

‘‘खरं म्हणजे क्लोरोप्लास्टमध्ये. त्याच्या आतमध्ये क्लोरोफिल असतं. ते मुख्यत: झाडांच्या पानांमध्ये असतं. ते असतं झाडाचं किचन म्हणजे स्वयंपाकघर.’’

‘‘आता कळलं आई, अन्न तयार करायला सूर्याची शक्ती लागते ना?’’

‘‘हो. आपल्या स्वयंपाकघरात कसा गॅस असतो तसंच. क्लोरोफिल सूर्यकिरणाची ऊर्जा शोषून घेते; पण हवेमधल्या कार्बन डायऑक्साइडला मात्र थेट स्वयंपाकघरात जाता येत नाही. गंमत म्हणजे, झाडांच्या पानांना छोटेसे दरवाजे असतात. त्यांना स्टोमॅटा किंवा पर्णरंध्र असं म्हणतात. ते दरवाजे उघडले की कार्बन डायऑक्साइड स्वयंपाकघरात शिरतो.’’

‘‘आई, पाणी तर मातीमधून झाडांच्या मुळांमध्ये जाते आणि पानापर्यंत म्हणजे स्वयंपाकघरापर्यंत पोहोचतं ना? पण मग पाणी आणि कार्बन डायऑक्साइडनी एकमेकांना मिठी मारल्यावर मला कुठून तरी टाळय़ा वाजवल्याचा आवाज आला होता.’’

आई हसली. म्हणाली, ‘‘स्वयंपाक करण्याचं काम पूर्ण झालं म्हणून पक्षी, कीटक, फुलपाखरं, झाडाची फुलं यांनी आनंदानं टाळय़ा वाजवल्या असणार. जेव्हा पाणी आणि कार्बन डायऑक्साइड एकत्र आले तेव्हा त्यातून ग्लुकोज आणि ऑक्सिजन तयार झालं. ग्लुकोज हेच ते अन्न. त्याच्याशिवाय आणि ऑक्सिजनशिवाय आपण सगळे प्राणी, पक्षी, वनस्पती जगू शकू का?’’

‘‘नाही आई. म्हणजे फोटोसिंथेसिस आपल्यासाठी किती महत्त्वाचा आहे ना?’’

‘‘हो. तुला आलं ना लक्षात झाडांचं महत्त्व? म्हणून झाडे लावू या. पाणी वाचवू या. प्रदूषण थांबवू या. निसर्गानं आपल्यासाठी तयार केलेल्या अन्नाचा आस्वाद घेऊ या आणि त्याचा आदर करू या.’’

bhagwatswarupa@yahoo.com

चंदेरी चांदोमामा..

चांदोमामा चांदोमामा
चंदेरी गाणे
घेऊन आले दारी
माझी सवारी
हरणाची गाडी
ससुल्याच्या परी
पाठवून दे दारी
वंदे भारत
लॅंण्डरमधली
स्वदेशी..
सोनेरी गाडी
तिरंगा ध्वज लावून
सजवून धजवून
आणलीय तुझ्या दारी
पृथ्वीचा अल्बम
आणलाय भारी
तुझ्या भोवती फेरी
मारून थकले..
चांदोमामा चांदोमामा
करंजीचा फराळ
दिलाय आईने तुला
चांदण्यांच्या ताटव्यात
लिंबोणीच्या झाडामागे
बसून खाऊ ..
वसुंधरेचे स्वप्न
दोघे मिळून पाहू!

-सानवी पारगावकर, इयत्ता- पहिली, विद्या प्रतिष्ठान नांदेड सिटी पब्लिक स्कूल, पुणे</p>

‘ट्टी’ची कविता

कट्टी बट्टी
शाळेला सुट्टी
आता रोज
खेळाशी गट्टी

मीठा संगे
कैरीशी गट्टी
जीभ माझी
आहेच हट्टी

मारामारी
धट्टी नि कट्टी
तोंडाचीही
सुरूच पट्टी

गप्पा गाणी
जमेल भट्टी
करा चेष्टा
जरी मी बुट्टी

मस्त जावी
अशी ही सुट्टी
पुन्हा शाळेशी
व्हावी बट्टी

-नरेश महाजन

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Balmaifalya what is photosynthesis it inclueds sunlight carbon dioxide water oxgyen sugar glucose dvr

First published on: 19-11-2023 at 01:15 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×