प्रिय मित्रा,

पतंगाच्या देशाला विमानानं मागे सोडलं तोच खाली एक मोठ्ठी लांबलचक भिंत दिसली. त्यावर सेल्फी काढणाऱ्या टुरिस्टांची गर्दी पाहून ती पाहायला खाली उतरलोच नाही. क्रिकेट, फुटबॉल मॅचसारख्या काही गोष्टी टीव्हीवरच पाहून जास्त चांगल्या समजतात, म्हणून मी ही भिंत टीव्हीवर जवळून पाहिली. आपल्या देशातही अशी एक भारी भिंत असावी, असा फुकटचा उदास विचार माझ्या मनात आला. म्हणून बाहेर पडतो तोच समोरची लाल जांभ्या दगडाची भिंत दिसली. त्याच्या प्रत्येक चिरेत चमकणाऱ्या पाचूसारखे शेवाळ, छोटी छोटी हिरवी रोपे फुटलेली. लघु जंगल झालेलं. त्यावर पिवळी दोन फुलपाखरं झटापटी खेळत होती. आहा.. किती सुंदर भिंत! मग त्या बाजूच्या घरावर मातीनं लिंपलेल्या भिंतीवर बोटांच्या रेघाची सुंदर नक्षी दिसली. काही भिंतींचे पोपडे निघून रंग बदलल्यानं अपघाती नक्षी झालेली. काहींमध्ये मातीसोबत लाकडी खांब व विटा असल्याचं दिसत होतं. आठवलं की, काल जिथे उतरलो तिथली घरे काळय़ा चौकोनी दगडांची होती. तेही सुंदर.

तर चित्रास कारण की, अशा कित्येक सुंदर भिंती माझ्या आजूबाजूलाच असताना मी त्याकडे साफ दुर्लक्ष केलेलं. फक्त टीव्हीवर दाखवतात तेच भारी, असं वाटत होतं. आता वेगवेगळय़ा गावी जाईन अन् तिथल्या बंगला, जुना वाडा, झोपडी, चाळ, शाळा, किल्ला, देवळाच्या भिंती पाहीन. त्यांची विशिष्ट रचना समजून घेईन.

मित्रा, तुझ्या आजूबाजूलादेखील असंच भारी असूही शकेल ना? त्या भिंती तू नीट पाहिल्यास का? या पत्रासोबत तुला भिंतीचित्र पाठवत आहे. पण मला तुझ्या गावातील तुला आवडणारी भिंत पाहायची आहे. त्याचे चित्र काढून मला ई-मेल कर.

तुझा खासमखास मित्र,

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

श्रीबा
shriba29@gmail.com