कोल्ह्य़ाचं पिलू, नाव त्याचं टुलू
बोलायचं फार अन् चालायचं हळू
खाऊन पिऊन गलेलठ्ठ
डोक्याने मात्र फारच मठ्ठ
असंच एकदा फिरायला गेलं
जंगलामधून वाटच चुकलं
फिर फिर फिरलं
खूप खूप दमलं
वाटेत लागलं छोटंसं तळं
पाणी त्यातलं निळं निळं
टुलूने पाण्यात मारली उडी
तळापर्यंत घेतली बुडी
पाण्यामधून आला डुंबून
निळ्या रंगात गेला रंगून
टुलू झाला फारच खूश
‘बरंय’ म्हणून केलं हुश्श्
काळोख जसा पडू लागला
जंगलात तेव्हा परत आला
सगळे प्राणी बघत बसले,
‘कोण बुवा हे नवे आले?’
मनातल्या मनात हसला टुलू
जागच्या जागी लागला झुलू
उंच टेकाड पाहून नीट
टुलूने त्यावर ठेवली वीट
‘जंगलचा राजा’ म्हणे मीच
सिंहाचं नाव नको उगीच!
तुम्ही सगळे माझे गुलाम
साऱ्यांनी मला करा सलाम!
सिंहाने ठोकली आरोळी
वाघाने फोडली डरकाळी
टुलूची उडाली घाबरगुंडी
विटेवरून घेतली उडी
जीव खाऊन पळत सुटला
म्हणे, ‘जंगलचा राजा कुठला!
होतं तेच बरं आहे
फुकाचं सोंग नकोच आहे!’
तात्पर्य : उगाच आव आणू नये.
खोटी बढाई मारू नये.