|| डॉ. नंदा हरम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एखादी गोष्ट टाळण्याकरिता माणूस या म्हणीचा वापर नेहमीच करतो. पँगोलिन म्हणजे खवल्या मांजर हा सजीवही स्वसंरक्षणार्थ या म्हणीला न्याय देताना दिसतो.

पँगोलिन हा जगातला एकमेव सस्तन प्राणी आहे, ज्याचे शरीर नखशिखांत खवल्यांनी आच्छादलेले असते. हे खवले केरॅटिन या प्रथिनापासून बनलेले असतात. आपली नखे व गेंडय़ांचे शिंगसुद्धा केरॅटिनचेच असते. सरपटणाऱ्या प्राण्यांच्या खवल्यापेक्षा ते पूर्णपणे वेगळे असतात. याच्या एकूण ८ प्रजाती अस्तित्वात आहेत. प्रत्येकी ४ याप्रमाणे आशिया आणि आफ्रिकेच्या उष्ण कटिबंधीय जंगले, गवताळ प्रदेश तसेच झाडाझुडपांत ते आढळतात. ते आपला बराचसा वेळ झाडावर किंवा जमिनीखालील बिळात घालवतात. ते आकाराने छोटय़ा मांजराएवढे असते. तोंड छोटेसे, पण शेपूट लांब व मजबूत असते, जिचा उपयोग ते एखाद्या हत्याराप्रमाणे करते.

त्यांचे पँगोलिन हे नाव, मलय शब्द ‘पेनग्ग्यूलिंग’ या वरून प्रचलित झाले आहे. या शब्दाचा अर्थ आहे ‘गुंडाळणे.’ त्याचा संदर्भ असा की जेव्हा त्याला भक्षकाकडून धोका निर्माण होतो, तेव्हा स्वसंरक्षणार्थ स्वत:च्या शरीराचं वेटोळे तयार करून एखादा घट्ट, कठीण चेंडूच तयार करतो. वेटोळे केल्यावर पँगोलिन आपले खवले उंचावू शकते. त्यामुळे खवल्यांच्या धारदार कडा बाहेरच्या दिशेला रोखल्या जातात. हे वेटोळे इतके कठीण, अणकुचीदार व अभेद्य असते की वाघ, सिंह, चित्ता यासारख्या हिंस्र प्राण्यांच्या जबडय़ांनाही ते भीक घालत नाही. पण दुर्दैव असे की, याचमुळे ते माणसाच्या हाती सहज लागते. एखादा चेंडू उचलावा तसे त्याला उचलता येतं. केवढा विरोधाभास नाही!

भक्षकांना पळवून लावण्याकरिता स्कंक या सजीवाप्रमाणे पँगोलिनही अपायकारक, विषारी आम्ल बाहेर सोडते. पँगोलिनचे वैशिष्टय़ म्हणजे, त्याची लांब, चिकट जीभ. ती त्याच्या शरीराच्या लांबीपेक्षाही जास्त म्हणजे जवळ-जवळ ४० सेंमी लांब असते. या जिभेमुळेच त्याला कीटक पकडणे सुलभ होते. वर्षांला तो ७ कोटी कीटक पकडतो. आहात कुठे! त्याला दात नसल्यामुळे तो चघळू शकत नाही. पण जठरात असलेल्या केरॅटिनच्या काटय़ांमुळे ते कीटकांचा लचका तोडू शकते.

पँगोलिन हा क्षीण दृष्टी असलेला निशाचर आहे. पण वास आणि आवाज ग्रहण करण्याची त्याची शक्ती तीक्ष्ण असते. त्यामुळे ते वाळवींची वसाहत आणि मुंग्यांचे वारुळ बरोबर शोधून काढतं. पँगोलिनची मादी एकावेळी १ ते ३ पिल्लांना जन्म देते. पहिले ३ महिने ही पिल्ले आईच्या शेपटीवरच वास्तव्य करतात. ती ५ महिन्यांची होईपर्यंत आई त्यांची काळजी घेते.

पँगोलिनप्रमाणे आणखीही काही सजीव ‘वेड पांघरण्यात’ हुशार आहेत. काढाल का तुम्ही शोधून?

nandaharam2012@gmail.com

मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Moral stories for kids mpg 94
First published on: 11-08-2019 at 03:13 IST