श्रीनिवास बाळकृष्ण

पूर्वी हिंदी सिनेमात नेहमी एक अशी वेंधळी ‘माँ’ असायची- जी चित्रपट सुरू होताच आपल्या दोन पैकी एका किंवा दोन्ही मुलांना एकाचवेळी जत्रेत किंवा रेल्वेस्टेशनवर विसरायची. असे सिनेमे पाहून लहानपणी पोटलीबाबा कुठल्याही गर्दीला जाम घाबरायचा हो. उगाच हरवलो बिरवलो तर थेट मोठेपणी भेट!

तू हरवला आहेस का असा कधी? चुकामूक? शॉपिंगच्या नादात पाच मिनिटांसाठी? किंवा एक तासासाठी?

हेही वाचा >>> दखल : पोटलीबाबा : या टोपीखाली..

मित्रा खूपच भयानक अनुभव असतो तो. असाच अनुभव एका छोटय़ा मुलाला आलाय ‘अम्मा’ नावाच्या पुस्तकात. हिमाचल प्रदेशातल्या स्थानिक जत्रेत तो हरवतो आणि त्याच्या अम्माला शोधण्याचा प्रयत्न करतो. १८ पानांत मावणारी गोष्ट आणि सातेक इंचाचं छोटंसंच पुस्तक.. गोष्टही साधीच, पण कविता सिंह काले हिच्या चित्रांनी परिस्थिती आणि मन:स्थिती अचूक चितारली आहे.

फोटोत दिसणाऱ्या चित्रांप्रमाणे केवळ लाल, काळा आणि राखाडी या तीन रंगांनीच सर्व चित्र भरली आहेत. ‘अम्मा’ हा शब्द सोडल्यास पुस्तकभर एकही दुसरा शब्द नाही.

हेही वाचा >>> पोटलीबाबा : चोरी झालीच नाही..

गर्दीत हरवणं, आपलं माणूस दिसलं नाही तर नजर कावरीबावरी होणं, त्या व्यक्तीला शोधणं.. भीतीने, पाणावलेल्या डोळ्यांनी ती व्यक्ती दिसतही नाही आणि अजूनच गोंधळायला होतं. मुलाचा हा गोंधळ दाखवणारं चित्रण फारच प्रभाव टाकतं. चित्रांत स्थानिकांचा हिमाचली पोशाख आहे. हिमाचल मधल्या कुठल्या तरी राज्यात अजूनही अशा जत्रा लागतात.  गावातल्या सर्वासाठी ही एक मनोरंजनाची हमखास हमी असते. जत्रेनिमित्त गावातले सर्वच त्याठिकाणी आल्याने गर्दी वाढते. गर्दीत लोकांचा गोंधळ उडू नये म्हणून स्थानिक पोलिस बंदोबस्ताला असतात. कुणी लहान मूल एकटं दिसलं तर त्याच्या हरवलेल्या आई-बाबाला शोधावं लागतं ना!

त्याची अम्मा मिळेपर्यंत तू असे तीनच रंग वापरून काही नक्षीकाम करू शकतोस का? आणि ते मला नक्की कळव हं!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

shriba29@gmail.com