बालमित्रांनो, ‘ळ’ या अक्षरापासून शब्दांची सुरुवात होत नाही हे तर तुम्हाला माहीतच आहे. अशी गोष्ट सांगितली जाते की, काव्यामध्ये ‘ळ’ हे अक्षर फारसे वापरले जात नाही, असा शेरा एका मान्यवरांनी दिल्यावर महाराष्ट्राचे लाडके कवी ग. दि. माडगूळकर यांनी हे आव्हान स्वीकारून ‘घननिळा लडिवाळा झुलवू नको हिंदोळा’ या अप्रतिम गीताची निर्मिती केली. आज आपणही ‘ळ’ अक्षराबरोबर खेळी करूया. ‘ळी’ने शेवट होणारे शब्द शोधण्यासाठी आम्ही तुम्हाला सूचक माहिती देत आहोत.
१) सण म्हटला की देवापुढे आणि दारासमोर ही
काढायलाच हवी —
२) जुळ्यांना म्हणतात —
३) साधु- संत येती घरा तोचि — दसरा
४) गप्प बसणे या अर्थी —
५) एकमेकांची उणीदुणी काढून केलेले भांडण —
६) कृत्रिम दातांची जोडी —
७) लहानसा फोड —
८) केळ्याची एक जात —
९) तांदूळ, भाजी धुणे इ. उपयोगाची विशिष्ट आकाराची बांबूची परडी, चाळणी —
१०) बारीक दोरी —
११) गवत, दूर्वा —
१२) कॅल्शियम हायड्रॉक्साईडचे रोजच्या वापरातील नाव म्हणजे चुन्याची —
१३) फुलाचे दल —
१४) छपरावरून पडणारी पाण्याची धार —
१५) पसायदानातील ओवी : वर्षत सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची —
१६) वटवाघुळाला — असेही म्हणतात.
१७) क्रिकेटचे बाळबोध मराठी नाव —
१८) फणसाची बी —
१९) दुग्ध व्यावसायिक —
२०) कागदाची सुरळी —
उत्तरे:-
१) रांगोळी २) आवळी-जावळी ३) दिवाळी ४)अळीमिळी गुपचिळी ५) उखाळी-पाखाळी ६) कवळी ७) पुटकुळी ८) राजेळी ९) रोवळी १०) सुतळी
११) हरळी १२) निवळी १३) पाकळी १४) पागोळी
१५) मांदियाळी १६) पाकोळी १७)चेंडू-फळी
१८) अठळी १९) गवळी २०) पुंगळी.