गुप्तहेरकथांमध्ये हेरांनी एकमेकांना गुप्त संदेश पाठवल्याचे आपण वाचतो. असाच एक गुप्त संदेश आपणही पाठवणार आहोत. आपण लिहिल्यावर तो संदेश अदृश्य होईल आणि इतरांना जेव्हा चकित करायचे असेल तेव्हा तो पुन्हा दिसू लागेल. ही गंमत कशी करायची ते आपण या प्रयोगात पाहणार आहोत.
साहित्य : एक लिंबू, वाटी, काडी, कोरा कागद, गाळणे, पाणी, उष्णता देण्यासाठी दिवा.
कृती : लिंबाचा रस एका वाटीत काढा. त्यात थोडे पाणी मिसळून ते मिश्रण व्यवस्थित ढवळा. हे मिश्रण गाळून घ्या. ही झाली आपली अदृश्य होणारी शाई. मग काडी या शाईत बुडवून कागदावर तुमचा गुप्त संदेश लिहा. नंतर हा कागद वाळू द्या. कागद वाळल्यावर तुम्ही लिहिलेला संदेश दिसेनासा झालेला असेल.
जेव्हा हा अदृश्य संदेश पुन्हा वाचायचा असेल तेव्हा संदेश लिहिलेली कागदाची बाजू दिव्याजवळ धरून ती गरम करा. हळूहळू संदेश तपकिरी रंगात कागदावर उमटलेला दिसेल.
हाच प्रयोग तुम्ही संत्र्याचा रस, मोसंब्याचा रस, व्हिनेगर, दूध, मध, कांद्याचा रस असे वेगवेगळे द्रव वापरून करून पाहा. हे सर्व संदेशदेखील वाळल्यावर अदृश्य होतात का? तापवल्यावर ते पुन्हा दिसायला लागतात का? कोणत्या रंगात? ते पाहा.
वैज्ञानिक तत्त्व : लिंबाचा रस वाळताच त्याचे रूपांतर सायट्रिक आम्लाच्या पांढऱ्या स्फटिकांच्या पावडरीत होते. त्यांचा पातळ थर कागदावर वेगळा ओळखू येत नाही. त्यामुळे िलबाच्या रसाने लिहिलेला संदेश वाळल्यावर अदृश्य होतो. दिव्यावर धरून तापवल्यावर सायट्रिक आम्लाचा हवेतल्या ऑक्सिजनशी संयोग होऊन तपकिरी रंगामध्ये अदृश्य संदेश पुन्हा दिसायला लागतो.
संग्रहित लेख, दिनांक 5th Jan 2014 रोजी प्रकाशित
SCI फन : अदृश्य संदेश
गुप्तहेरकथांमध्ये हेरांनी एकमेकांना गुप्त संदेश पाठवल्याचे आपण वाचतो. असाच एक गुप्त संदेश आपणही पाठवणार आहोत. आपण लिहिल्यावर तो संदेश अदृश्य होईल आणि इतरांना जेव्हा चकित करायचे...

First published on: 05-01-2014 at 01:03 IST
मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Science fun