News Flash

पाताळलोक

‘तुला अजगराच्या तोंडी देईन,’ असं मी माझी खोड काढणाऱ्या उदग्याला का म्हणालो होतो?

‘तुला अजगराच्या तोंडी देईन,’ असं मी माझी खोड काढणाऱ्या उदग्याला का म्हणालो होतो? माझ्या धमक्याही माझ्यासारख्या ‘ऑड बीट’वरच्या असायच्या. ‘ऑफ बीट’ हा शब्द अपुरा ठरेल. माझं बालपण पाताळप्रेमी होतं.

जमिनीच्या खूप खाली ‘पाताळलोक’ आहे याबद्दल आम्हा पोट्टय़ांची ठाम खात्री होती. तिथूनच तो वाळूतला ‘बोआ’ म्हणजे  अजगर भूपृष्ठावर यायचा. आमच्या मुखपृष्ठावर मात्र भीती दिसायची नाही. अजगराला खेळवणारा जादुगार व्हावं असं मला फार वाटायचं. फक्त वाळवी खाण्यापुरता ‘वाळा’ नावाचा ओंजळीत मावणारा एक सापही बागेत येऊन जायचा. लहान मूल कुणाला न सांगता दूर भटकून यावं तसा तो वाटायचा.

भूगर्भातून तापलेल्या पाण्याचे झरे भुईवर येऊन चमकायचे. ती वाफाळ चमक पाहताना तिळाएवढे फुलपाखराचे डोळे दिपायचे व ते तेजाची कढत भोवळ येऊन उष्ण पाण्याच्या गंधक कुंडात कोसळायचं! सुंदर, नाजूक जीव भाजून किंवा कुजून मरणं हे देव नसल्याचेच लक्षण ना? अवघ्या सात वर्षांच्या एका बाहुलीएवढय़ा मुलीला बोन कॅन्सर झाला, तेव्हाही मला ती मरण्यापूर्वी हेच वाटले, द गॉड इज डेड!

‘मृगाचे’ किडे पाताळातून वर येऊन पाऊस पडू लागताच गायब होत. त्याचा लालम्लाल रंग मनात रेंगाळत राहायचा. डोक्यावर गंधासारखा लाल ठिपका असलेला, वरवर येणारा ‘वरुण’ खेकडा आम्हाला बघताच भुसभुशीत भूमीत चटकन् भूमिगत व्हायचा. विंचवीचं सासर मात्र खडकाळ भूमीवर असे. संभोग आटपल्यानंतर नराचा चट्टामट्टा करणाऱ्या कीटकमाद्या आमच्या कोवळ्या अंगावरची सोनेरी लव भीतीने उभी करत असत. स्त्री-जातीच्या प्रेमळपणाबद्दलसुद्धा काही प्रश्नचिन्हे माझ्या मनात होती. आत्मचरित्रातून पुढे-मागे सांगेन!

पाताळलोकातून फार चित्रविचित्र आवाज एकदा येऊ लागले. भूगोल शिकवणारे कामथ (‘तू’ नाही!) सर हा पाताळधुंडी विषयातला आमच्या गावातला एकमेव ज्ञानी माणूस. कामथ म्हणत, ‘जमिनीच्या खाली ‘प्लेटी’ सरकतायत्.. मैदानात अचानक पडलेला मोठ्ठा खड्डा थेट पाताळात घेऊन जात असणार असं वाटायचं. तो स्वप्नात यायचा.. आणि त्या भुयारातून भामी हाक मारायची.

पाताळखोल विहिरीत भामीने जीव दिला होता. माझ्या मते जीव घेऊन ती पळाली व पाताळात पोहोचली. तिच्या सासऱ्यानेच तिच्यावर हात टाकला. मग काय करेल बिचारी! नवरा अंथरुणाला खिळलेला. ‘मुंगीमार’ नावाचा छोटा किडा असतो, तसा तो भामीचा सासरा पाताळयंत्री होता. त्याला कांडर चावली. रक्ताची उलटी होऊन तो कोसळला. बायका बोलल्या, ‘सून डसली मेल्याला!’ ‘मुंगीमार’ छोटा खळगा बनवून त्यात मुंगीला गायब करायचा. तर शेणकिडा शेणाचे चेंडू बनवून त्यात अंडी घालायचा. कोकणाने विवरातून वर येऊन शॉवरसारखी उडणारी आणि हवेतच जुगून पुन्हा जमिनीवर कोसळून जीव देणारी अद्भुत वाळवीही दाखवली. पाताळलोकातच राहून कष्ट करणारी वाळवी तर आंधळी असायची. त्या ब्लाइंड कामगरांचं मला फारच कौतुक वाटायचं. डोक्यात हवा गेल्यावर संभोग कुणीही करेल! अंधारात कष्टाची वाटचाल व बेगमी करणं, आदेश पाळणं, संदेश कळणं कठीण. पाताळलोकांनी माझं जगण्याचं एकू ण आकलन खूप वाढवलं. मी पाताळाचा खूप ऋणी आहे.
माधव गवाणकर – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 11, 2016 1:11 am

Web Title: bloggers katta 23
टॅग : Blog,Bloggers Katta
Next Stories
1 मनच ते…
2 अंगणी माझ्या…
3 टिक टिक वाजते डोक्यात
Just Now!
X