22 February 2020

News Flash

हाताने नाही म्हणा!

त्या प्रत्येक वस्तूतून येणारा आठवणींचा सुगंध मन उल्हसित करत होत्या.

घरातल्या कपाटाची आवराआवर करत होते. सगळ्या जुन्याच जिनसा होत्या. बालपणी मिळालेल्या भेटवस्तू, त्या काळी आवडलेली लालगुलाबी मोत्यांची माळ, आजीनं दिलेली ती लाकडी भावली, आजीकडून मागून आणलेली लाकडी फणी असंच खूप काही सापडत होतं. त्या प्रत्येक वस्तूतून येणारा आठवणींचा सुगंध मन उल्हसित करत होत्या. माझ्यासारखं त्यांचं वय वाढलं नव्हतं, मात्र त्यांची नवलाई टिकून राहिली होती. त्या सगळ्यांना प्रेमानं कुरवाळलं; मलाही त्यांच्या उबदार प्रेमाचा गहिरा अनुभव आला. अन् तेवढय़ात एका पाकिटात गुंडाळलेला एक फोटोही मला दिसला. त्या फोटोतल्या सगळ्या स्त्रियांना मी ओळखलं खरं पण केव्हाचा हा फोटो हे काही केल्या लक्षात येत नव्हतं. माजघरात ओळीनं बसलेली मुलंमुली त्यात मीही होते. समोर उभ्या होत्या दोन माम्या, माझी आई नि मावशी यांनासुद्धा मी ओळखलं. त्यांच्या शेजारी उंच, गोरीपान माझी आजीही दिसत होती. जरा निरखून पाहिलं तेव्हा तिच्या डोळ्यातून वाहत असलेलं पाणी स्पष्ट दिसत होतं. गोव्याला राहणाऱ्या आमच्या तात्यानं नवीन कॅमेरा आणला होता आणि त्यानं आमचे फोटो काढले होते, हेही लक्षात आलं पण हा फोटो का काढला असेल बरं मला आठवत नव्हतं. मी, मामेभावंडं, मावसभावंडं सगळ्यांचे त्या काळातल्या वेशभूषेतले फोटो पाहताना मला गंमत येत होती. मी केव्हाच आजगावला- आजोळी पोचले होते. ‘‘आजगाव मराठी शळा इली. कोणाक उतरूचा हा? आपले सगळे नग घेऊन उतरा माझ्या लेकिनो आन् सुनांनो तुम्ही खाली उतरल्याशिवाय गाडी हलुची नाय. नग मोजून घ्या. बोलके आन् न बोलणारे.’’ कंडक्टरची प्रेमळ सूचना आठवली. घरासमोरचं वेतोबाचं मोठं देऊळ अन् पांढरी, गुलाबी देवचाफ्याची झाडं, मातीचा रस्ता, आजगावला आजोळी स्वागताला उभी असायची आमची आजी. ती दिसली की आनंदाला भरतं यायचं. हे सगळं डोळ्यांसमोर साकारलं अन् मग आठवला या फोटोचा खासपणा.

तो फोटो होताच तसा खास. ‘‘चला गो, चला रे आता जेवायला.’’ झोपल्यावर एकाच वेळी वारा घालणाऱ्या आजीच्या नातवंडांना मग थांबावं लागत होतं. माजघरात केळीच्या पानावर वाढलेला वरणभात दरवळत असायचा. एक पंगत आमची म्हणजे नातवंडांची असायची. समोर मामांची पंगत असायची. आम्ही सगळे ‘नग’ – नातवंडं बारा ते चौदा होतो. आमची झुंड जेवतानासुद्धा वेगवेगळ्या विश्वात – कलकलाट करत असतानाच, ‘‘जेवायला सुरुवात करा आता, नाहीतर झोपाळा बंद’’ असं अप्पा बोलला की एकदम शांतता पसरायची. मामांच्या पंगतीत पानात अख्खे आंबेच सुरुवातीला दिसायचे. ‘‘आमच्या कुणाच्याच पानात आंबे का नाहीत?’’ असा आरडाओरडा सुरू झाला की, ‘‘पानातला भात आधी संपवा. मग येणारेत आंबे.’’ एखादी मामी  खरखरीत आवाजात बोलत असायची. भराभर भाताचे घास कोंबायची स्पर्धा सुरू व्हायची. ‘‘अरे दुष्काळातून आलात काय रे. हळू खा रे’’ अशी सूचना सगळ्या आया आलटूनपालटून द्यायच्या खऱ्या पण काहीच उपयोग होत नसायचा.  हे भोजनयुद्ध चालू असताना आजी जपमाळ ओढत असायची आमच्या समोरच्या बाकडय़ावरच. मामांच्या पंगतीला एकदा, दोनदा, तीनदा आंबे वाढले जायचे. ‘‘संपले हा आता. तुम्हाला आज नाहीच गो. आता परत भात घ्या.’’ असं आम्हाला अप्पा सांगायचा की लगेच आमच्या पंगतीत एकदम रडारडी, आक्रोश सुरू व्हायचं. सूर वेगळे, ताल नाही आणि लय? ती नसायचीच. ‘‘कशाला आरड मारताहात रे? काय गो, काय झालं गो रडायला?’’ असे प्रश्न विचारत आजी पंगतीजवळ यायची. जपाची माळ उंचावून देवांशी काहीतरी बोलत असावी.

‘‘मला दोन अख्खे आंबे हवे.’’  ‘‘आम्हाला नकोत आंबे खायला?’’ ‘‘माझी आई नेहमी असंच करते.’’ ‘‘हो हो. गप्प बसा आधी. गो शांते अढीतून आंबे घेऊन ये.’’ माझी आई म्हणजे शांता, ती आंबे घेऊन यायची. ‘‘दोन पराती आणा, आंबे घ्या लेकरांना वाढायला’’ असं आजी सांगायची. माम्याना, मावशीबरोबर ती हळूच काहीतरी कुजबुजायची. प्रत्येक नातवंडाच्या पानात आंब्याच्या दोन दोन फोडी यायच्या. एकमेकांना चिडवत, त्या फोडी संपायच्या. ‘‘आणा गो आंबे कापून.’’ पुन्हा एकदा आंब्याच्या फोडी यायच्या. सगळ्या नातवंडांच्या चेहऱ्यांवरचं आंब्यांचं समाधान ओघळून वाहायचं सगळ्या लेकी-सुनांना आजी बोलवायची ‘‘ उभ्या रहा लेकरांच्या पंगतीसमोर. मी काय सांगते ते ऐका.’’ आजीचा स्वर चढा व्हायचा. चुळबुळत, घायाळ झालेल्या सगळ्या आया अर्धचंद्राकृतीत उभ्या राहायच्या. ‘‘कशाचा विध्वंस केलेनी तर ओरडा गो लेकरांना. जेवताना कोणी लेकरू रडता नये.’’  ‘‘खाणार कमी आणि टाकणार पानात आंबे.’’ एक मामी बोलली. आजी म्हणाली, ‘‘दोन दोन लेकरांच्या आया झल्यात म गो? हातानं नाही म्हणा त्यांना.’’ ‘‘म्हणजे कसं?’’ ‘‘सुरुवातीला त्यांच्या पानात आंब्याच्या दोन फोडी वाढा. भातसुद्धा संपवतील आनंदात.’’ तेवढय़ात तात्या आला. ‘‘आई, तशीच थांब. फोटो काढतो सगळ्यांचा. बघतो हां राहतात काय एकावेळी.’’ आणि तो ऐतिहासिक फोटो प्रत्येकाला त्यानं दिला. किती र्वष निघून गेली. ‘‘हाताने नाही म्हणा’’ हे शब्द आठवणीत राहून गेलेत.
सुनीती पेंडसे – response.lokprabha@expressindia.com

First Published on November 25, 2016 1:09 am

Web Title: bloggers katta hatane nahi mhana
Next Stories
1 वेडय़ा मना
2 खरेदी पाहावी करून!
3 बिलगलेलं जुनं काही…