22 January 2021

News Flash

चुकीची संघ निवड भारतीय संघाला भोवली का?

निवड समितीच्या ही गोष्ट लक्षात आली नाही का?

– नामदेव कुंभार

India tour of australia 2020 : पहिल्या एकदिवसीय सामन्यात पराभवाचं तोंड पाहिल्यानंतर कर्णधार विराट कोहलीनं कोणतंही कारण न देता पराभव मान्य केला. त्यानं पराभव होण्यामागील कारणही स्पष्ट सांगितलं… विराट कोहलीची संपूर्ण पत्रकार परिषद ऐकल्यानंतर तुम्हीही त्याच्या मताशी सहमत व्हाल… भारतीय संघ फक्त पाच गोलंदाजच घेऊन मैदानात उतरला होता. एखाद्या गोलंदाजाचा दिवस खराब असल्यास त्याची जागा कोणीतरी दुसरा गोलंदाज घेईल ही परिस्थिती कालच्या सामन्यात दिसून आली नाही. पहिल्या एकदविसीय सामन्यात तर शमी वगळता एकाही गोलंदाजाला लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. विराट कोहली संघ निवड करताना चुकला का? जर एकदिवसीय सामन्यासाठी निवडण्यात आलेल्या चमूवर नजर फिरवल्यास जाडेजा वगळता एकही अष्टपैलू खेळाडू दिसणार नाही. कारण हार्दिक पांड्या दुखापतीमुळे गोलंदाजी करु शकत नाही. परंतू हार्दिकची मधल्या फळीतली फलंदाजी पाहता त्याला संघाबाहेर करणंही टीम इंडियाला जड जाऊ शकतं. हार्दिक पांड्या गोलंदाजी करत नसल्यामुळे संघाचं संतुलन बिघडल्याचं पहिल्याच सामन्यात दिसून आलं. विराट कोहलीनेही तसं मान्य केलं. तो म्हणाला हार्दिकला फलंदाजीत तोड नाही. मात्र गरज पडल्यास पाच-सहा षटकं टाकणारा अष्टपैलू खेळाडू भारतीय संघात नाही. मला एक प्रश्न पडतो की, मग ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड करताना खरेच निवड समितीच्या ही गोष्ट लक्षात आली नाही का?

(आणखी वाचा : रोहित शर्माचे ३० कोटींचे आलिशान घर पाहिलेत का? )

पहिल्या सामन्यातील पराभव बाजूला ठेवून विराट आणि कंपनीनं दुसऱ्या लढतीची तयारी सुरु केली असेल. रविवारी होणाऱ्या सामन्यात संतुलीत संघाची निवड करावी लागणार आहे. भलेही सध्या तुमच्याकडे पार्टटाइम गोलंदाजी करणारे कोणते फलंदाज आहेत, याचा विचार करावा लागेल. सध्या भारतीय संघात श्रेयस अय्यर लेगब्रेक गोलंदाजी करु शकतो, शिखर धवन ऑफ ब्रेक गोलंदाजी करु शकतो आणि स्वत: विराट कोहलीही गोलंदाजी करु शकतो. दुसऱ्या सामन्यात गरज पडल्यास विराटनं यांना काही षटकं द्यायला हवीत. २०१० च्या आधी भारतीय संघात सचिन, सेहवाग, रैना आणि युवराजसारखे फलंदाज होते जे वेळप्रसंगी पाच ते सहा षटकं टाकत होते. पण आताच्या संघात ती कमी जाणवते. विराट कोहलीनं याकडे लक्ष द्यायला हवं. तुमच्याकडे चांगला अष्टपैलू खेळाडू उपलब्ध नसल्यास पर्यायी गोलंदाजा विचार करावा लागणार आहे.

(आणखी वाचा : रोहित शर्माच्या अनुपस्थितीचा भारताला फटका बसेल का? )

आणखी एक मुद्दा म्हणजे, रोहित शर्माच्या अनुपस्थितीत के. एल राहुल हा सलीमीसाठी सर्वोत्तम पर्याय आहे. नव्या चेंडूवर राहुलची फलंदाजी मन सुखावणारी आहे. याचा ट्रेलर आयपीएलमध्ये पाहिला असेलच. शिखर धवनसोबत राहुलला सलामीला संधी द्यायला हवी. मी काही पिंच हिटर नाही, असं म्हणत राहुलनं सलामीला खेळवावे असे अप्रत्यक्ष संकेतही दिले होते. राहुल जर सलामीला आला तर पाचव्या क्रमांकावर मनिष पांड्ये किंवा संजू सॅमसन हे दोन पर्याय विराटकडे आहेत. मयांक अग्रवालनं पहिल्या सामन्यात चांगली फलंदाजी केली पण चांगल्या सुरुवातीनंतरही खराब फटका मारून बाद झाला. न्यूझीलंड दौऱ्यातही पहिल्या तीन एकदिवसीय सामन्यात मयांकला अपयश आलं होतं. तुम्हाला मयांकला खेळवायचं असल्यास तिसऱ्या क्रमांकावर खेळवता येईल. विराट कोहली चौथ्या आणि श्रेअस अय्यर पाचव्या क्रमांकावर खेळू शकतो. त्याशिवाय गोलंदाजीचा विचार केल्यास कुलदीप यादव याला तुम्ही किती दिवस संघाच्या बाहेर ठेवणार आहात? कुलदीपनं अनेकदा आपलं महत्व सिद्ध केलं आहे, असं असतानाही त्याला अंतिम अकरामध्ये संधी मिळत नाही, हे थोडं मनाला न पटणारं आहे.

पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाचं क्षेत्ररक्षणही सर्वसामान्यच वाटलं. भारतानं महत्वाचं चार झेल सोडले. त्याचा फटका बसलाही. आता विराट कोहली अँड ब्रिगेडला दुसऱ्या सामन्यात चुका सुधारण्याची संधी आहे. पाहुयात पहिल्या सामन्यातून भारतीय संघ काय बोध घेतोय….. की पुन्हा त्याच चुका करतोय… हे येणारा काळच सांगेल…

(namdeo.kumbhar@loksatta.com)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2020 11:43 am

Web Title: india tour of australia 2020 indian team squad selection mistake virat kohli bcci blog by namdeo kumbhar nck 90
Next Stories
1 ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टीम इंडियाचा सर्व मालिकांमध्ये पराभव होईल !
2 Ind vs Aus : पांड्या-शिखर धवनच्या ‘त्या’ भागीदारीने केला अनोखा विक्रम
3 SA vs ENG : बेअरस्टोचा झंजावात, पहिल्या टी-२० सामन्यात इंग्लंडची बाजी
Just Now!
X