23 January 2021

News Flash

BLOG : धोक्याची घंटा, ऋषभ पंत आता तरी जागा होईल का??

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टी-२०, वन-डे संघात पंतला स्थान नाही

दिल्लीचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतला १५ कोटी रुपयांत रिटेन करण्यात आलं होतं. पंतला १६ सामन्यात २८७ धावा काढता आल्या. पंतची एक धाव संघाला पाच लाख २३ हजार रुपयांना पडली आहे.

युएईत आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं युद्ध ऐन रंगात आलेलं असताना बीसीसीआयने भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संघाची घोषणा केली. दुखापतीमुळे रोहित शर्माला कोणत्याही संघात स्थान मिळालेलं नाही. तर दुसरीकडे वन-डे आणि टी-२० क्रिकेटमध्ये सुनिल जोशी यांच्या निवड समितीने कठोर निर्णय घेत ऋषभ पंतला संघातून वगळत लोकेश राहुल आणि त्याच्या जोडीला संजू सॅमसन अशा दोन यष्टीरक्षकांना संघात स्थान दिलं आहे. महेंद्रसिंह धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन अजुन एक वर्षही उलटलेलं नाही. पण धोनीचा उत्तराधिकारी म्हणून चर्चेत आलेल्या ऋषभ पंतवर आज ही वेळ का आली याचा विचार करणं गरजेचं आहे.

ऋषभ पंतवर ही वेळ का आली हे जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला थोडं मागे जावं लागेल. २०१७ साली झालेल्या चॅम्पिअन्स ट्रॉफीपासून महेंद्रसिंह धोनीचा फलंदाजीतला उतरता काळ सुरु झाला. काळाची पावलं ओळखत निवड समितीने धोनीला पर्याय शोधायला हवा होता. ऋषभ पंतच्या रुपाने तो पर्याय भारताला मिळालाही, परंतू त्या काळात म्हणाव्या तश्या संधी पंतला मिळाल्या नाहीत. अपेक्षित निकाल मिळणार नाहीत हे समोर दिसत असतानाही धोनीवर विसंबून राहणं, चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला कोण येणार या प्रश्नाचा केलेला चोथा आणि चुकीची संघनिवड या सर्व गोष्टी भारतीय संघाला महागात पडत गेल्या. २०१९ च्या विश्वचषकात न्यूझीलंडने भारताला हरवलं आणि एकदम निवड समितीला जाग आली. यानंतर एम.एस.के. प्रसाद यांच्या समितीने धोनी आता पहिल्या पसंतीचा यष्टीरक्षक नसेल असं जाहीर करत पंतला संधी दिली.

वेळ वाया गेला, चाहते पंतमध्ये धोनीला शोधत राहिले –

यष्टीरक्षणात धोनीने भारतीय संघासाठी दिलेलं योगदान हे खरंतर शब्दांत मांडता येणार नाही. परंतू प्रत्येक खेळाडूचा एक काळ असतो आणि तो काळ संपल्यानंतर त्याची जागा कोणालातरी घ्यावीच लागते हा निर्णय निवड समिती आणि BCCI धोनीच्या बाबतीत विसरली. २०१७ चॅम्पिअन्स ट्रॉफीनंतर निवड समितीने कठोर निर्णय घेऊन काही सामन्यांमध्ये धोनीला सक्तीची विश्रांती द्यायला हवी होती. जर २०१९ विश्वचषकासाठी तुम्हाला धोनीवर अवलंबून रहायचं होतं तर त्यासाठी धोनीचा जपून वापर व्हायला हवा होता. यष्टीरक्षक म्हणून धोनी उत्तम कामगिरी बजावत असला तरीही फलंदाजीत त्याला आपला प्रभाव पाडता येत नव्हता. नेमका हाच कठोर निर्णय योग्य वेळेत घेण्यामध्ये निवड समिती चुकली आणि भारतीय वन-डे संघातील त्रुटी विश्वचषकात न्यूझीलंडविरुद्ध सामन्यात उघड पडल्या.

इथेच ऋषभ पंतला योग्यवेळी संधी मिळाली असती आणि त्याला फलंदाजीचा व यष्टीरक्षणाचा अधिक सराव झाला असता. धोनीची जागा घेणं ही सोपी गोष्ट नाही. त्याच्यानंतर संघात त्याची जागा घेणाऱ्या खेळाडूमध्येही चाहते धोनीलाच शोधणार आणि ऋषभ पंतच्या बाबतीत नेमकं हेच झालं. धोनी पूर्वी जशी फटकेबाजी करायचा तशीच फटकेबाजी पंतकडून चाहत्यांना हवी होती, त्याचं दर्जाचं यष्टीरक्षण चाहत्यांना पंतकडून हवं होतं. अर्थात यात काही चूक नसलं तरीही तुलनेने नवीन खेळाडूवर अपेक्षांचं ओझ लादलं की त्याची कामगिरी ढासळणार ही सोपी गोष्टी बीसीसीआयपासून भारतीय चाहते सर्वजण विसरले.

पंतने सोन्यासारख्या संधी दवडल्या –

वर म्हटल्याप्रमाणे संघात धोनीची जागा घेणं ही सोपी गोष्ट नाही. त्यामुळे मैदानात उतरताना ऋषभ पंतवर दबाव असणार हे सर्वजण धरुन चालले होते. परंतू दबाव झुगारुन देऊन तुम्हाला फॉर्मात येण्यासाठी आयुष्यभराचा कालावधी मिळणार नाही हे पंतसारख्या खेळाडूला समजायला नको?? ढिसाळ यष्टीरक्षण, बेजबाबदार फलंदाजी, संघाला गरज असताना वेडे-वाकडे फटके खेळून विकेट फेकणं अशा एक ना अनेक करामती दरम्यानच्या काळात पंतकडून पहायला मिळाल्या. मधल्या फळीतल्या फलंदाजांकडून संघाला मोठ्या अपेक्षा असतात. सुरुवातीचे फलंदाज बाद झाले तर मधल्या फळीतल्या फलंदाजावर डाव सावरुन योग्य वेळी फटकेबाजी करण्याची जबाबदारी असते. परंतू आतापर्यंत वर्षभराच्या कालावधीत ऋषभ पंत ही कामगिरी करु शकेल असं एकदाही जाणवलं नाही.

स्टम्पमागे उभं राहून निरर्थक स्लेजिंग करणं, समोरील आपल्या सहकारी गोलंदाजाला…सही जा रहे हो अॅश भाई..अशा एक ना अनेक करामती पंत स्टम्पमागे उभा राहुन करत असतो. यष्टीरक्षकाने असं करण्यात काहीच गैर नाही, पण त्याआधी स्वतःचं तंत्र सुधारण्याकडे तरी पंतने लक्ष द्यायला हवं होतं. धोनीसोबतची तुलना सोडाच…पण किमान वृद्धीमान साहा सारख्या हरहुन्नरी खेळाडूच्या तोडीचं यष्टीरक्षण पंतने करावं एवढी साधी अपेक्षा पंतकडून होती जी पूर्ण झाली नाही.

एम.एस.के. प्रसादांनी केलेली चूक सुनिल जोशींनी टाळली –

सातत्याने संधी मिळूनही खराब कामगिरी करणाऱ्या पंतला संघाबाहेर काढा अशी मागणी सोशल मीडियावर व्हायला लागली. भारतीय चाहते पंतविरोधात उघडपणे भूमिका घ्यायला लागले. सुरुवातीला विराट कोहली, रवी शास्त्री या जोडगोळीने पंतचा बचाव केला…पण मैदानातली खराब कामगिरी पाहता अखेरीस २०२० वर्षात पहिला दौरा खेळणाऱ्या भारतीय संघाने प्रयोग करत लोकेश राहुलला यष्टीरक्षणाची संधी दिली. त्याआधीही कसोटीत पंतला विश्रांती देऊन साहाचा पर्याय भारतीय संघ व्यवस्थापनाने निवडला होता. परंतू धोक्याच्या घंटेचा हा आवाज पंतच्या कानावर तोपर्यंत पोहचलाच नाही.

एकीकडे ढासळणारी कामगिरी, तर दुसरीकडे राहुल आणि सॅमसन यांनी चांगली कामगिरी करत संघाची दारं ठोठावणं यामुळे पंतवर दबाव वाढला होता. एखाद्या खेळाडूवर विश्वास दाखवण्यात काहीच गैर नाही. परंतू तो खेळाडू संधी देऊनही चांगली कामगिरी करत नसेल तर त्याला योग्य शब्दांत समज देऊन त्याच्या जागेवर दुसरा पर्याय शोधणं हेच निवड समितीचं काम असतं. सुदैवाने सुनिल जोशी यांच्या समितीने काळाची पावलं ओळखत कठोर निर्णय घेतला आणि टी-२०, वन-डे संघात पंतला स्थान दिलं नाही. एका अर्थाने निवड समितीने ऋषभला ही वॉर्निंग दिली आहे, की कामगिरीत सुधारणा झाली नाही तर तूझी जागा कोणीतरी दुसरं घेईल. आता फक्त धोक्याच्या या घंटीचा आवाज पंतच्या कानावर पडायला हवा.

मिळालेल्या माहितीनुसार, ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संघाची निवड करताना निवड समितीच पंतच्या फिटनेसवर खुश नव्हती. लॉकडाउन दरम्यान वाढलेलं पोट, आयपीएल दरम्यान झालेली दुखापत, त्यातून सावरताना कमी पडणारा फिटनेस या सर्व गोष्टी निवड समितीच्या डोळ्यासमोर घडत गेल्या. संजू सॅमसन हा खरं पहायला गेलं तर ऋषभ पंतचा समवयस्क आहे…आयपीएलमध्ये संजू सॅमसनच्या कामगिरीतही सातत्य नाही, परंतू पंतला भारतीय संघाकडून मिळालेली संधी आणि संजू सॅमसनला भारतीय संघाकडून मिळालेली संधी यामध्ये जमिन आस्मानाचा फरक आहे. त्यामुळे निवड समितीने कठोर निर्णय घेत पंतला संघाबाहेर करणं ही एका अर्थाने चांगलीच गोष्ट आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 27, 2020 4:37 pm

Web Title: selection committee denied place to rishabh pant in odi and t20 squad wake up call for him psd 91
Next Stories
1 IND vs AUS: तुम्ही चुकीचा पायंडा पाडताय- संजय मांजरेकर
2 IND vs AUS: सूर्यकुमारच्या मुद्द्यावरून हरभजनची BCCIवर सडकून टीका
3 रोहित शर्माच्या दुखापतीसंबधी माहिती द्या; IPL साठी सराव करतानाचा व्हिडीओ पाहून गावसकरांची मागणी
Just Now!
X