आयपीएलचा तेरावा हंगाम आता प्ले-ऑफच्या दिशेने झुकत चालला आहे. पहिल्या चार स्थानांवर येण्यासाठी प्रत्येक संघ जिकरीने प्रयत्न करतोय. काही दिवसांपूर्वी गुणतालिकेत तळातल्या स्थानावर असलेल्या पंजाबनेही जोरदार मुसंडी मारत लागोपाठ ३ विजयांची नोंद केली आणि स्पर्धेतलं आपलं आव्हान कायम राखलं. चेन्नईचा संघ यंदा फॉर्म गमावून बसलेला आहे, त्यामुळे यंदा ते गुणतालिकेत तळातल्या स्थानावर फेकले गेले आहेत. परंतू गेल्या काही दिवसांपासून KKR च्या संघाची कामगिरी आणि पडद्यामागे होणाऱ्या गोष्टींमुळे संघाची घडी पूर्णपणे विस्कटलेली दिसते. बुधवारी अबु धाबीच्या मैदानावर झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सच्या फलंदाजांची खराब कामगिरी पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली. २० षटकांत कोलकाता नाईट रायडर्सचा संघ ८ गडी गमावत ८४ धावांपर्यंत मजल मारु शकला. गुणतालिकेत KKR चा संघ १० गुणांनिशी चौथ्या स्थानावर आहे. प्ले-ऑफच्या शर्यतीत KKR अजूनही कायम आहे. पण सध्या स्पर्धेत वाढलेली चूरस पाहता KKR आपल्यासमोर असणाऱ्या समस्यांचं निवारण केलं नाही तर त्यांचा प्ले-ऑफसाठीचा रस्ता अवघड होऊ शकतो. पहायला गेलं तर अनुभवी आणि तरुण अशा खेळाडूंचा मिलाप आपल्याला कोलकाता नाईट रायडर्स संघात पहायला मिळतो. शिवम मवी, कमलेश नागरकोटी, प्रसिध कृष्णा, राहुल त्रिपाठी, शुबमन गिल यासारखे तरुण तर रसेल, मॉर्गन, नारायण, कार्तिक, कमिन्स यासारखे अनुभवी खेळाडू KKR कडे आहेत. परंतू गेल्या काही सामन्यांपासून या संघाचं काहीतरी बिनसल्यासारखं वाटत आहे. काय असू शकतात यामागची कारणं, पाहूयात. १) सुनिल नारायणवर गरजेपेक्षा जास्त विश्वास - २०१९ च्या हंगामात KKR नारायणला फलंदाजीत सलामीला बढती देण्याचा प्रयोग केला. सुदैवाने हा प्रयोग त्यावेळी चांगला चालला. २०२० च्या हंगामातही KKR ने हाच प्रयोग राबवायचा ठरवलं. परंतू करोनामुळे सुमारे ३-४ महिन्यांचा काळ क्रिकेटपासून दुरावलेल्या सर्व खेळाडूंसाठी यंदाची आयपीएल ही अग्नीपरीक्षाच होती. तर नारायणला फलंदाजीत बढती देण्याचा KKR चा प्रयोग यंदा पूरता फसला. सुरुवातीच्या २-३ सामन्यांमध्येच नारायण चालत नसल्याचं लक्षात येऊनही KKR चा संघ त्याला संधी देत राहिला. ज्यामुळे KKR ची सलामीची जोडी कधीही सेटलच झाली नाही. बरं फलंदाजीतला आपला प्रयोग फसला हे समजल्यानंतर नारायणचा KKR ने गोलंदाजीत खुबीने वापर व्हायला लागला. परंतू तोपर्यंत पुन्हा एकदा त्याच्या वादग्रस्त शैलीने डोकं वर काढलं आणि तो संघाबाहेर गेला. या सर्व घडामोडींमध्ये संघाची घडी बसवण्यात KKR चा संघ कमी पडला. मधल्या काही सामन्यांमध्ये KKR ने चांगला खेळ केला, परंतू कामगिरीत नसलेलं सातत्य यामुळे ते गुणतालिकेत आजही काठावर आहेत. २) नेतृत्वबदलाचा विनाकारण प्रयत्न - तेराव्या हंगामात KKR ने इंग्लंडच्या ओएन मॉर्गनला संघात स्थान दिलं. खरं पहायला गेलं तर विश्वचषक विजेत्या संघाचा कर्णधार म्हणून मॉर्गनकडे संघाची सूत्र जाणं अपेक्षित होतं. परंतू तसं झालं नाही, KKR ने दिनेश कार्तिककडेच संघाचं नेतृत्व सोपवलं. अर्धा हंगाम दिनेशने संघाचं नेतृत्व केलं. परंतू या काळात एक-दोन सामन्यांचा अपवाद वगळता त्याची फलंदाजीतली कामगिरी ही यथातथाच होती. त्यातच काही महत्वाच्या सामन्यांमध्ये मोक्याच्या क्षणी काही निर्णय घेताना दिनेश कार्तिकच्या चेहऱ्यावर दबाव जाणवत होता. सोशल मीडियावर चाहत्यांनी आणि काही माजी खेळाडूंनी तक्रार करायला सुरुवात केल्यानंतर KKR मध्ये नेतृत्वबदलाचे वारे वहायला लागले.आणि ठरल्याप्रमाणे हंगामाच्या मध्यावधीत दिनेश कार्तिक कर्णधारपदावरुन पायउतार झाला. मॉर्गनकडे संघाचं नेतृत्व आलं.परंतू स्पर्धेच्या मध्यावधीत असा बदल करणं हे कधीही धोकादायक ठरु शकतं. नेतृत्व बदल झाल्याने संघातील खेळाडूंमध्ये असुरक्षिततेची भावना तयार होते. वरकरणी KKR चं संघ व्यवस्थापन सर्व काही आलबेल असल्याचं दाखवत असलं तरीही प्रत्यक्ष मैदानात काही वेगळचं चित्र दिसतंय. ओएन मॉर्गनही अद्याप संघावर पूर्णपणे पकड बसवू शकलेला नाही. आंद्रे रसेलचं फलंदाजीतलं स्थान, RCB विरुद्ध सामन्यात लॉकी फर्ग्युसनला पॉवरप्लेनंतर दिलेली गोलंदाजी असे मॉर्गनचे काही निर्णय आजही बुचकळ्यात पाडणारे आहेत. ३) दुखापतींचा ससेमिरा आणि फलंदाजीच्या क्रमाचं कोडं - आंद्रे रसेल हा KKR चा महत्वाचा खेळाडू. फलंदाजीत धडाकेबाज फटकेबाजी करण्याची ताकद या खेळाडूत आहे. तसेच गोलंदाजीमध्येही तो महत्वपूर्ण बळी मिळवून देतो. परंतू दिनेश कार्तिक आणि रसेल यांच्यातलं द्वंद्व, पहिल्या सामन्यांमध्ये रसेलचा फलंदाजीतला क्रम न ठरणं आणि संपूर्णपणे फिट नसतानाही त्याच्यावर अवलंवून रहाणं या सर्व गोष्टी चाहत्यांना पहायला मिळाल्या आणि त्या चांगलं चित्र निर्माण करणाऱ्या नक्कीच नव्हत्या. काही सामन्यांमध्ये रसेलने चक्क चालत येऊन गोलंदाजी केली. मैदानावर धावा घेताना त्याला होणारा त्रास पाहता तो पूर्णपणे फिट नाहीये हे प्रेक्षकांना कळत असेल तर KKR च्या टीम मॅनेजमेंटला का कळू नये. रसेलवर अवलंबून राहण्यापेक्षा त्याच्या जागेवर दुसऱ्या खेळाडूला संधी देता नसती आली का?? काही दिवसांपूर्वी राहुल त्रिपाठीबद्दलही संघात असाच सावळा गोंधळ दिसत होता. याव्यतिरीक्त अनेक समस्या कोलकाता नाईट रायडर्स संघासमोर आ वासून उभ्या आहेत. दिनेश कार्तिक आणि नितीश राणाचं वारंवार अपयशी ठरणं, महागडी बोली लावून संघात स्थान दिलेल्या पॅट कमिन्सचं गोलंदाजीत अपेक्षित कामगिरी न करणं, टॉम बँटनसारख्या खेळाडूला वरच्या फळीत फलंदाजीला संधी न मिळणं यासारख्या अनेक गोष्टींवक KKR ला ठाम तोडगा काढावा लागणार आहे. अद्याप वेळ गेलेली नाही, परंतू या प्रश्नांचं घोंगड भिजत ठेवल्यास आज काठावर असलेला KKR चा संघ प्ले-ऑफच्या शर्यतीतून बाहेर फेकला जाईल यात काही शंका नाही.