– सुनीता कुलकर्णी
टाळेबंदीच्या काळात कोणाचं आर्थिक, शारीरिक, मानसिक काय किती आणि कसं नुकसान झालं याचे आकडे मोठे असले तरी एका माणसाचा मात्र जबरदस्त फायदा झाला. तो म्हणजे सोनू सूद. इतकी वर्षे हिंदी तसंच दक्षिण भारतीय सिनेमात कामं करून सोनू सूदने जेवढं नाव मिळवलं नसेल तेवढं त्याने टाळेबंदीच्या काळात मिळवलं आहे. त्याच्या या काळातल्या सगळ्याच गोष्टींचा “करविता धनी”कोण हे अजूनही स्पष्ट झालेलं नसलं तरी अवघड काळात घराबाहेर पडून, लोकांना मदतीचा हात देण्याची वृत्ती मात्र अनेकांच्या हृदयाला स्पर्श करून गेली आहे. त्यामुळेच आता सोनू सूदने काहीही केलं तरी त्याला समाजमाध्यमांमधून प्रचंड प्रतिसाद मिळतो. त्याने नुकतंच आपण एक टेलरिंग शॉप उघडत असल्याचं ट्वीटरवरून जाहीर केलं. रस्त्यावर बसून मशीनवर कपडे शिवत असल्याचा जेमतेम २० सेकंदांचा व्हिडिओ टाकला तर त्याच्या या व्हिडिओमुळेदेखील नेटिझन्सचे डोळे विस्फारले.
थांबा थांबा… अर्थातच सोनू सूद असं काही करणार नाहीये. म्हणजे तो काही रस्त्यावर बसून मशीनवर कपडे बिपडे शिवून देणार नाहीये. त्याने गम्मत म्हणून तसा एक व्हिडिओ टाकला आहे आणि ‘सोनू सूद टेलरिंग शॉप’ असं आपल्या दुकानाचं नाव असल्याचं म्हटलं आहे एवढंच. आपल्या या कपडे शिवण्याच्या दुकानात शिलाईचे पैसेबिसे घेतले जाणार नाहीत, पण पँट शिवायला दिल्यावर तिची चुकून शॉर्ट शिवली जाणारच नाही, असं नाही असंही गमतीने लिहिलं आहे. अर्थात त्याने गम्मत केल्यावर नेटविश्वातील त्याच्या चाहत्यांनीही ‘मला शर्ट शिवून नको, पण त्याची बटणं फुकटात लावून देशील का?’ यासारखे प्रश्न विचारत त्याची फिरकी घेतली आहे.
Sonu Sood tailor shop.
यहां मुफ्त में सिलाई की जाती है।
पैंट की जगह निकर बन जाए, इसकी हमारी गारंटी नहीं pic.twitter.com/VCBocpUSum
— sonu sood (@SonuSood) January 16, 2021
टाळेबंदीच्या काळात मुंबईतून वेगवेगळ्या राज्यांमधल्या आपापल्या घरी जाऊ इच्छिणाऱ्या परप्रांतीय मजुरांचे खूप हाल झाले. हजारो किलोमीटर पायपीट करत अनेकजण आपापल्या घरी निघून गेले. या काळात सोनू सूदने काही कोटी रुपये खर्च करून या मजुरांना घरी जायला मदत केली. कुणाला पैसे उपलब्ध करून दिले. बसेस उपलब्ध करून दिले. जेवण पुरवलं. अनेकांना हे मानवतेचं काम वाटलं तर काहींना राज्ययंत्रणा अस्तित्वात असताना, तिला त्या काळात काम करण्यासाठी अनेक अडचणी येत असताना एक माणूस उठून अशा पद्धतीने काम कसं करू शकतो याचा अचंबा वाटला. त्यामुळे या सगळ्यामागचा ‘करविता धनी’ कुणीतरी वेगळाच आहे, सोनू सूदची ही पुढच्या निवडणुकीत तिकीट मिळवण्याची तयारी सुरू आहे अशीही टीका झाली. अशा ‘निंदकांचे घर असावे शेजारी’ असं म्हणत सोनू सूद मात्र सध्या ही लोकप्रियता एन्जॉय करताना दिसतो आहे.