मुंबईतील काँग्रेसचे माजी आमदार आणि प्रिया दत्त यांचे निकटवर्तीय कृष्णा हेगडे यांनी रविवारी भाजपमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हेगडे भाजपमध्ये दाखल झाले आहेत.

रविवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी  कृष्णा हेगडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, आशिष शेलार आदी नेतेमंडळी याप्रसंगी उपस्थित होती. ‘२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत ज्यांनी पक्षाविरोधात काम केले त्यांना आज संधी दिली जाते आणि जे पक्षाशी प्रामाणिक राहिले त्यांना डावलले जाते. पक्षाला माझी गरज नसेल तर मी पक्ष सोडणेच योग्य’ असे हेगडे यांनी सांगितले. हेगडे यांच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेसला धक्का बसल्याचे सांगितले जाते.

काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त यांचे निकटवर्तीय आणि सर्वसामान्यांना कधीही उपलब्ध असलेला लोकप्रतिनिधी अशी कृष्णा हेगडे यांची ओळख आहे. मतदार संघात राबवलेल्या विकासकामांमुळे कृष्णा हेगडे चर्चेत असायचे. २००९ ते २०१४ या कालावधीत ते आमदार होते. २०१४ च्या निवडणुकीत हेगडे यांचा भाजपचे पराग आळवणी यांनी पराभव केला होता. हेगडे भाजपात दाखल झाल्याने मुंबईतील भाजपची ताकद वाढली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, काँग्रेस नेते गुरुदास कामत यांनी हेगडे यांच्या भाजपप्रवेशावरुन मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्यावर टीका केली आहे. हेगडे यांच्यासारख्या नेत्याने पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. संजय निरुपम किंवा अन्य कोणत्याही नेत्याने हेगडे यांना थांबवण्याचा प्रयत्न केला नाही अशी टीका कामत यांनी केली आहे. विशेष म्हणजे हेगडे हे संजय निरुपम यांच्या मतदारसंघातूनच येतात असे त्यांनी नमूद केले. निरुपम आणि मोहन प्रकाश हे दोघे राहुल गांधी उत्तरप्रदेशमधील निवडणुकीत व्यस्त असल्याचा फायदा घेत पक्षातून नेत्यांना बाहेर काढत असल्याचा आरोपही त्यांनी केला.